कराकस: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. निकोलस मादुरो एका लष्करी कार्यक्रमात उपस्थित जवानांना संबोधित करत होते. यावेळी हा हल्ला झाला. मात्र, निकोलस मादुरो आणि वरिष्ठ अधिकारी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात लष्कराचे सात जवान जखमी झाले. हल्ला झाला त्यावेळी निकोलस मादुरो यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण सुरु होते. त्यामुळे हल्ला झाल्यानंतर जवान सैरावैरा पळताना अनेकांनी पाहिले. यानंतर लगेचच थेट प्रक्षेपण थांबविण्यात आले. 


या हल्ल्यामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही, मात्र राष्ट्रपतींवर हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर सरकारकडून आरोप केले जात आहेत.


२०१३ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष हयुगो चावेझ यांच्या निधनानंतर मादुरो यांच्याकडे व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली होती.