PM Narendra Modi : पाकिस्तानात (Pakistan) सध्या महागाईने (inflation) उच्चांक गाठला असून देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तान सध्या इंधन, वीज, इतर देशांचे कर्ज, महागाई अशा अनेक संकटांचा एकाच वेळी सामना करत आहे. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान  शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यांच्याकडे एकत्र बसून चर्चा करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मला सांगायचं आहे की आपण एकत्र बसूयात आणि काश्मीरसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर उत्तर शोधण्यासाठी गांभीर्याने आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे शरीफ यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक व्हिडीओने पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घातला आहे. विरोधकांनी सरकारला या व्हिडीओवरुन चांगलेच घेरले आहे. शहबाज शरीफ यांच्या सरकारवर निशाणा साधण्यासाठी नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. पाकिस्तानच्या माजी मंत्र्यापासून पत्रकारांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. "आम्ही पाकिस्तानचा सर्व अहंकार काढला आहे. त्यांना वाडगे घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले आहे," असे पंतप्रधान मोदी व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.


माध्यमांच्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ 2019 सालचा आहे. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ पाकिस्तानातील पीटीआय पक्षाचे नेते आझम खान स्वाती यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांनी शेअर केला आहे. आझम खान स्वाती यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला आहे. "पाकिस्तानच्या सत्ताधारी सरकारला आपण बदल घडवून आणत आहोत हे सांगताना लाज वाटली पाहिजे. सत्ता परिवर्तनाचा विचार जनतेने करायला हवा. या देशाला फक्त इम्रान खानच वाचवू शकतात," असे आझम खान यांनी म्हटले आहे.



दुसरीकडे पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडीओ 2019 मधला आहे म्हणत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरच निशाणा साधला आहे. "मजेदार गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करून पीटीआय नेते शाहबाज सरकारला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की मोदी त्यांच्या सरकारबद्दल काय बोलत आहेत? हा व्हिडिओ 2019 चा आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये इम्रान खानचे सरकार होते," असे नायला इनायत यांनी म्हटले.



दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी 'अल अरबिया' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतासोबत चर्चा करण्याबाबत भाष्य केले आहे. "आम्हाला गरीबीवर मात करायची आहे. समृद्धी प्राप्त करण्याची आमची इच्छा आहे. आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याची आमची इच्छा आहे. दारुगोळा, बॉम्ब यासारख्या गोष्टींवर खर्च करण्याची आमची इच्छा नाही. हेच मला पंतप्रधान मोदींना सांगायचं आहे," असे पंतप्रधान शरीफ म्हणाले.