नवी दिल्ली : कुवेतमधील सुलैबिया क्षेत्र (Sulaibiya Area of Kuwait) येथे असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या टायर ग्रेवयार्डला (World’s Biggest Tyre Graveyard) नुकतीच आग लागण्याची घटना घडली. ज्याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना घडली त्या ठिकाणी रेतीप्रमाणं पोत असणारी माती खोदून एक महाकाय खड्डा खणण्यात आला आहे. यामध्य़े जवळपास 70 लाख टायर आहेत. एक एकर इतक्या भूखंडावर पसरलेल्या या जागेला आग लागली तेव्हा आगीचं स्वरुप इतकं भीषण होतं की याची दृश्य थेट अंतराळातूनच दिसली. 


माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार सुलैबिया येथील अयंख्य टायर असणाऱ्या या ठिकाणाला टायरचं कब्रस्तान म्हणून ओळखलं जातं. कुवेत आणि काही राष्ट्रांचे हे टायर असल्याचं म्हटलं जातं. येथे डिस्पोजलची जबाबदारी चार कंपन्यांना देण्यात आली आहे. तर, आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर आता अशा प्रकारचे ज्वलनशील पदार्थ अशा देशात स्थलांतरित करण्यावर चर्चा होत आहेत आणि प्रश्नही उपस्थित केले जात आहेत जिथं तापमानाचा पारा 50 अंशांवर पोहोचतो. 


2012 मध्येही घडली होती अशी घटना 
कुवेत सरकारने 30 वर्षांमध्ये जमा झालेल्या टायरची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. रिसायकल करण्यात येणाऱ्या 95 टक्के टायर हटवण्याची योजना आहे. 2012 मध्ये कुवेतमध्ये अशीच घटना घडली होती. तर, ब्रिटनमध्येही वापरात आलेल्या टायरबाबतचा हा प्रश्न अडचणीचा ठरु लागला आहे. 




जगभरातील देशांमध्ये वापरलेल्या टायरची विल्हेवाट कशी लावायची हाच मोठा प्रश्न आहे. टायर जाळल्यामुळे हवेत कार्सिनोजेनिक डाइऑक्साइन्स (Carcinogenic Dioxins) मिसळले जातात. ही प्रदूषकं अस्थमा आणि अनेक गंभीर आजारांना वाव देण्यास कारणीभूत ठरतात. तेव्हा आता या समस्येशी सर्व राष्ट्र कसे दोन हात करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.