व्हिडिओ : भारत- इंग्लंड मॅचचा आनंद घेण्यास पोहोचला विजय माल्ल्या
भारत-इंग्लंड टेस्ट मॅचचा आनंद घेण्यासाठी माल्ल्या पोहोचल्याचा व्हिडिओ समोर
नवी दिल्ली : भारतीय बॅंकांमधून 9 हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्या भारतात येणं महत्त्वाचं आहे. कमावलेल्या संपत्तीवर टाच येऊ नये म्हणून त्याला भारतात यायचयं. तो भारताच्या ताब्यात आल्यास त्याने घेतलेल्या कर्जमाफीच्या प्रकरणाचा छडा लागण्यास मदत होणार आहे. पण भारतातील तुरूंग व्यवस्था, कैदी वागणूक ठिक नसल्याची कारण तो इंग्लडच्या कोर्टासमोर देत आहे. अशातच भारत-इंग्लंड टेस्ट मॅचचा आनंद घेण्यासाठी पोहोचल्याचा व्हिडिओ समोर आलायं. केनिंगटनमध्ये सुरू असलेल्या मॅचचा आनंद घेताना माल्ल्याला पाहिलं गेलं.
फरार घोषित
सफेद ट्राउजर आणि काळा कोट घातलेला माल्ल्या आपल्या ट्रेडमार्क अंदाजात स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसला. माल्ल्याचं क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. आयपीएलमध्ये खेळणारी आरसीबी ज्याचा कॅप्टन विराट कोहली आहे ती माल्ल्याचीच टीम आहे. हजारो कोटींचा घोळ करुन माल्ल्या गेल्या दीड वर्षांपासून देशातून फरार आहे. त्याला भारतीय न्यायालयानं फरार घोषित केलंय.
संपत्तीवर टाच
विजय माल्ल्याची भारतामध्ये मोठी संपत्ती आहे. या संपत्तीवर तपास यंत्रणांनी टाच आणली आहे. या संपत्तीवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्यासाठी माल्ल्याची भारतात परतण्यासाठी धडपड सुरू आहे. फरार आर्थिक अपराधी विधेयक २०१८ पास झाल्यामुळे भारतातली संपत्ती हातातून जाण्याची भीती माल्ल्याला वाटत आहे. लंडनच्या न्यायालयामध्ये माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची केस सुरु आहे.
फरार आर्थिक अपराधी विधेयक
फरार आर्थिक अपराधी विधेयक २०१८ नुसार आर्थिक अपराधी घोषित केल्यानंतर त्याच्या संपत्तीवर टाच येते. एकदा संपत्तीवर टाच आल्यानंतर ही जमीन पुन्हा मिळत नाही. त्यामुळे माल्ल्याला त्याची भारतातली संपत्ती गमावण्याची भीती वाटत आहे.
विजय माल्ल्याला आर्थिक फरार अपराधी घोषित करण्यासाठी मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याची पुढची सुनावणी ३ सप्टेंबरला सुरु आहे.