माणसाला त्याचा आवडते प्राणी विचारलं तर त्यात हत्तीचा उल्लेख नक्की केला जातो. याचं कारण हत्ती हा माणसाचा मित्र म्हणूनच पाहिला गेला आहे. जर हत्तीला प्रेमाने वागवलं तर तो माणसावर नितांत प्रेम करतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. पण जर त्याला त्रास दिला तर त्याच्याइतका वाईट प्राणी नाही हेदेखील तितकंच खरं आहे. सोशल मीडियावर हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा यामध्ये हत्ती जंगलात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा पाठलाग करताना दिसतो. तर काहीजण विनाकारण हत्तीच्या जवळ जाण्याचं धाडस करत असतात. दरम्यान, असं धाडस करणं एका तरुणीला महागात पडलं असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्तीच्या जवळ गेल्यावर तो हल्ला करु शकतो याची कल्पना असतानाही काहीजण त्याच्याजवळ जाऊन फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत असतात. एका तरुणीने अशाच प्रकारे हत्तीच्या जवळ जाऊन त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तिला आयुष्यभराचा धडा मिळाला आहे. यानंतर ती पुन्हा कधी असलं धाडस करणार नाही. 


व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, तरुणी हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. हत्ती खाण्यात व्यग्र असताना तरुणी त्याच्या शेजारी जाऊन उभी राहते. यावेळी ती कॅमेऱ्यात हे क्षण कैद करण्याचा प्रयत्न करत असते. पण पुढच्याच क्षणी चिडलेला हत्ती सोंडेने तरुणीला खाली पाडतो. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्याने घाबरलेली तरुणी जमिनीवर कोसळते. यानंतर ती सर्वात आधी तेथून पळ काढते. 


Non-aesthetic things या एक्स अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'तरुणी हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते आणि अखेर समजलं,' अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. 



हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "तिच्या नशिबाने हत्तीच्या पिलाने तिला मोठा हत्ती येण्याआधी घाबरवून दूर पाठवलं". तर एकाने जंगली प्राण्यांना एकटं सोडा असा सल्ला दिला आहे. 


"शेपूट हालत असताना हत्तीच्या जवळ जाऊ नका. त्याला धोका वाटत असतो," असं एकाने म्हटलं आहे. 


केरळमध्ये गेल्या तीन आठवड्यांत हत्तींच्या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना शेकडो नवीन कॅमेरे आणि गस्त या समस्येचा सामना करण्यात मदत करतील अशी आशा आहे. नुकतंच जंगली भागात वायनाड प्रदेशातील पुलपल्ली शहरात शुक्रवारी 52 वर्षीय टुरिस्ट गाईडवर हत्तींच्या कळपाने प्राणघातक हल्ला केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं होतं.