चक्कं पोलिसावर स्वत:च्या मुलांना रस्त्यावर विकण्याची वेळ, संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ पाहा
सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जेथे आपल्याला व्हिडीओ, फोटो आणि बरीच काही माहिती मिळते.
कराची : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे नेहमीच आपले मनोरंजन करतात. सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जेथे आपल्याला व्हिडीओ, फोटो आणि बरीच काही माहिती मिळते. सध्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा असाच काहीसा आहे. हा व्हिडीओ आपला शेजारील देश पाकिस्तानमधील आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला काही वेळासाठी धक्का बसेल. कारण या व्हिडीओमधील दृश्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती आपल्या दोन मुलांसोबत रस्त्यावर उभा आहे आणि ओरडत आहे. तो व्यक्ती त्याच्या मुलांना 50 हजार रुपयांना विकत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातील तुरुंग विभागात काम करणाऱ्या निसार लाशारीचा आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला, परंतु आपल्या मुलांना विकणाऱ्या या पोलिसाबद्दल लोकं रागावण्याऐवजी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे.
जेव्हा रजेसाठी लाच मागितली होती
पोलीस शिपाई निसार यांनी सांगितले, 'मला खूप असहाय्य वाटत होते.' पोलीस कर्मचाऱ्याने दावा केला की त्याचा बॉस (वरिष्ठ अधिकारी) रजेच्या बदल्यात लाच मागत होता. वास्तविक, त्या व्यक्तीला आपल्या मुलाच्या उपचारासाठी सुट्टीची गरज होती. मात्र, त्यासाठी त्याचा बॉस त्याच्याकडून लाच मागत होता. परंतु तो लाच देऊ शकला नाही, ज्यामुळे त्याला सुटीही देण्यात आली नाही.
एवढेच नाही तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याची शहरापासून 120 किमी अंतरावर असलेल्या लारकाना येथे बदली केली. ज्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढल्या.
'मला ही शिक्षा का देण्यात आली?'
तो माणूस पुढे म्हणाला, "त्यांनी मला शिक्षा का दिली, फक्त मी त्यांना लाच देऊ शकलो नाही म्हणून? मी खूप गरीब आहे, इतका की मी कराचीला जाऊन कारागृह महानिरीक्षकांकडे तक्रारही करू शकत नाही. येथील लोक इतके ताकदवान आहेत की, त्यांच्यावर सहसा कोणतीही कारवाई होत नाही. मी लाच द्यायला हवी होती की माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे ठेवायला हवे होते? आता मी लारकानामध्ये काम करायला जावे की माझ्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जावे?"
हा पोलिस पुढे म्हणाला, "माझे मन सुन्न झाले आहे. काय करावे समजत नव्हते. त्यामुळे ही हे पाऊल उचलले. अशा वेळी, माझ्या परिस्थितीशिवाय, मी इतर कशाचाही विचार करू शकत नाही. पण जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटले नाही की हा व्हिडिओ व्हायरल झाला. हे सोशल मीडियाचे युग आहे, ज्यात बातम्या वेगाने पसरतात."
सिंधच्या मुख्यमंत्र्यांकडून कारवाई
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र परिस्थीती बदलली. कारण या पोलिसांच्या कथेने नुसतेच लोकांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांचेही लक्ष वेधून घेतले. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, त्यानंतर निसार घोटकी कारागृहात नोकरीवर राहिला. तसेच, त्याला 14 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती, जेणेकरून त्याला त्याच्या मुलावर उपचार करता येतील.
पाकिस्तानी पत्रकार हमीद मीरच्या म्हणण्यानुसार, घोटकी तुरुंगातील अधिकाऱ्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असा निसार यांनी वाइस वर्ल्ड न्यूजला दुजोरा दिला.
हा व्हिडीओ ट्विटर यूजर @ShSarmad71 ने 13 नोव्हेंबरला शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'घोटकी शहरातील या पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी सुट्टी देण्यात आली नाही आणि त्यांची लारकाना येथे बदली करण्यात आली. प्रत्यक्षात रजा घेऊन त्यांची बदली थांबवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली गेली होती. कुठे आहे माणुसकी?
ज्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून या पोलिस कर्मचाऱ्याची बाजू घेण्यात आली आणि त्याच्या या परिस्थितीचा विचार करण्यात आला. ज्यामुळे त्याला न्याय मिळण्यात मदत मिळाली.