फाटलेलं पॅराशूट घेऊन जवानांनी उड्या मारल्या, काही रस्त्यावर पडले, काही झाडात अडकले... Video व्हायरल
नागरिकांचा आवाज आणि किंकाळ्यांनी परिसर हादरला, जवानांना वाचवण्यासाठी नागरिक धावले
Nigeria Torn Parachutes: 1 ऑक्टोबरला आफ्रिकी देश नायजेरिया (Nigeria) आपला स्वातंत्र्य दिवस (independence day) साजरा करतो. नायजेरीयाची राजधानी अबुजामध्ये (nigeria capital abuja) स्वातंत्र्यदिनानिमित्ताने जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचा एक भाग म्हणून नायजेरियन सैन्यातील (Nigeria Army) जवान पॅराशूट घेऊन विमानातून उडी मारत हवेत कसरती दाखवणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी या सर्व कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरु होती. ठरल्याप्रमाणे पॅराशूट (Parachute) घेऊन जवानांनी उड्या मारल्या. पण यातले अनेक जण ठरलेल्या जागेच्या बाहेर गेले, काही जण रस्त्यावर पडले तर काही जणं झाडावर अडकले.
याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक सैन्यातील जवानांनी जे पॅराशूट घेऊन विमातून उड्या मारल्या ते पॅराशूट चक्क फाटलेले होते. कदाचित खराब क्वॉलिटीमुळे पॅराशूट हवेत फाटले असतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ (Video) वेगाने व्हायरल होत आहे.
खराब किंवा फाटलेल्या पॅराशूटनंतरही जवान सुरक्षित उतरण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसत आहेत. पण अनेक जवान रस्त्यावर लँडिंग करताना दिसत आहेत. जवान रस्त्यावर पडल्यानंतर परिसरात नागरिकांच्या आवाज आणि किंकाळ्यांनी परिसरात दणाणून गेला. जवानांच्या मदतीसाठी नागरिकांनी धाव घेतली. व्हिडिओत एक जवान नागरिकांना दुखापत होऊ नये म्हणून एका कारवर लँडिंग करताना दिसत आहे.
काही जवान रस्त्यावरच्या बिलबोर्डवर आपटतानाही दिसत आहेत. तर एक जवान पॅराशूटसकट एका झाडावर अडकलेला पाहिला मिळत आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही जवानाचा मृत्यू झालेला नाही. काही जवांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.