Women Attacked for not wearing Hijab: हिजाब (Hijab) न घातल्याने दोन तरुणींच्या डोक्यावर योगर्ट (yoghurt) फोडत हल्ला करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. इराणमध्ये (Iran) हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणींनी आपले केस झाकले नसल्याने प्रशासनाने त्यांच्यावरच कारवाई केली असून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुणी दुकानात काहीतरी विकत घेण्यासाठी आलेल्या दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती येऊन त्यांच्याशी हिजाब न घातल्याबद्दल वाद घालण्यास सुरुवात करतो. काही वेळाने तो तेथील फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं Yoghurt बाहेर काढून त्यांच्या डोक्यावर फोडतो. यावेळी तिथे उपस्थित इतरांनाही धक्का बसतो. यादरम्यान दुकानाचा मालक हल्ला करणाऱ्याला मागे ढकलतो. 



BBC च्या वृत्तानुसार, या घटनेनंतर इराणच्या न्यायालयाने दोन्ही तरुणींना देशातील हिजाबच्या नियमाचं पालन न केल्याने ताब्यात घेतलं आहे. याशिवाय हल्ला करणाऱ्या व्यक्तीलाही सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. दरम्यान नियमांचं पालन व्हावं यासाठी संबंधित दुकानादाराला नोटीस पाठवण्यात आली असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. इराणमध्ये सात वर्षांहून अधिक तरुणी, महिलांना हिजाब घालणं बंधनकारक आहे. 


इराणच्या न्यायव्यस्थेच्या प्रमुखांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणाऱ्या महिलांवर “दया न दाखवता” खटला चालवणार असल्याची धमकी दिल्याने ही अटक करण्यात आली आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने सरकारच्या अनिवार्य हिजाब कायद्याला बळकटी दिल्यानंतर त्यांनी ही विधान केलं. 


शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी देशातील महिलांनी धर्माची गरज म्हणून हिजाब घालायला हवा असं म्हटलं होतं. हिजाब ही कायदेशीर बाब असून त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.


मागील काही महिन्यांपासून हिजाब कायद्याबद्दल राग आणि असंतोष व्यक्त केला जात आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये 22 वर्षीय कुर्दिश महिलेचा मृत्यू झाल्यापासून अनेक इराणी महिला बुरखा घालण्यास नकार देत आहे. महसा अमिनीला हिजाबच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.