नवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये बदलणाऱ्या प्रत्येक ट्रेंडमागे काही कारणं दिसून आली आहेत. पेहराव असो किंवा मग आणखी काही, समाजातील काही घटकांनी या गर्दीत स्वत: काहीतरी वेगळं करत आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे. सध्या अशाच एका तरुणाची हटके स्टाईल सर्वांच्याच नजरा कुतूहलानं वळवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्पक सेन या मुळच्या कोलकाता येथील तरुणानं नुकतेच इंटरनेटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. जिथं तो मिलान, या फॅशनची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात चक्क साडी नेसून वावरताना दिसत आहे. 


काळ्या रंगाची साडी आणि त्यावर ब्लेझर असा एकंदर लूक तो सुरेखपणे फ्लाँट करताना दिसत आहे. बरं, त्याच्या या लूकला कपाळावर असणारी ठसठशीत टिकली परिपूर्ण करत आहे. 


'साडीमध्ये चारचौघात वावरून मी कुठेच पोहोचू शकणार नाही, असं ते म्हणत होते... पाहा जगातील फॅशनची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी आज कोण वावरतंय...?' असं कॅप्शन त्यानं साडीतील फोटो पोस्ट करत लिहिलं. 


साडीमधले हे फोटो पोस्ट करत त्यामागे एक तितकाच परिणामकारक संदेश पुष्पकनं दिला आहे. त्याचा हा अंदाज आणि जागतिक पातळीवर साडीमध्ये देशाचं प्रतिनिधीत्वं करणं अनेकांची मनं जिंकून गेला आहे. 



एकिकडे देशाच्या राजधानीमध्ये साडी नेसलेल्या महिलेला प्रवेश नाकारला जात असतानाच दुसरीकडे जागतिक स्तरावर फॅशनची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शहरात भारतीय तरुणानं साडीमध्ये वावरणं ही संकुचित विचारसरणीला मिळालेली सणसणीत चपराकच आहे.