दुबई : 'झी मीडिया' समूहाच्या 'विऑन' आंतरराष्ट्रीय वाहिनीतर्फे दुबईमध्ये जागतिक परिषदेचे बोलावण्यात आली आहे. विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना भारताचे माजी लष्करप्रमुख बिक्रम सिंह यांनी म्हटले की, आम्ही बराच काळ आदर्शवादी धोरण स्वीकारले होते. मात्र, तुम्ही सतत एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करता कामा नये, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाचा रोख पाकिस्तानच्या दिशेने होता. या परिषदेत दहशतवादासंदर्भात एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. दक्षिण आशियाई देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाचे समूळ उच्चाटन कसे करता येईल, यावर परिसंवादात विचारमंथन झाले. या परिसंवादात भारताचे उच्चायुक्त जी.पार्थसारथी, हुसैन हक्कानी, कंवल सिब्बल आणि मायकल कुगेलमन उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी म्हटले की, एखादा देश दुसऱ्या देशावर दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करतो. मात्र, वेळ पडल्यावर इतर देशांच्या तशाच कृत्यांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करतो. त्यामुळे याविषयीच्या धोरणात सातत्य असणे गरजेचे आहे. आपल्याला या समस्येकडे दीर्घकालीन दृष्टीकोनातून बघितले पाहिजे, असे हक्कानी यांनी सांगितले. 


यावेळी भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त जी.पार्थसारथी यांनी पाकिस्तानवर टीका केली. त्यांनी म्हटले की, प्रत्येक देशाकडे लष्कर असते. मात्र, पाकिस्तानातील परिस्थिती पाहता लष्कराकडे एक देश आहे, असे म्हणावे लागेल. आज बांगलादेशचा विकासदर पाकिस्तानच्या विकासदरापेक्षा जास्त आहे. बांगलादेशाने त्यांच्या विकासावर भर दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या परिसंवादात कंवल सिब्बल यांनी १९९० पासून पाकिस्तानमधील दहशतवादात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला एक चांगला देश म्हणून काम करायचे आहे. परंतु, जेव्हा गरज पडेल तेव्हा जोरदार प्रत्युत्तर देणे ही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.