नवी दिल्ली : नेपाळच्या तारा एअरलाइनचे वेपत्ता झालेले 9 NAET डबल इंजिन असलेले विमान मस्तंगच्या कोवांग गावात सापडले आहे. खराब हवामानामुळे कोवांग गावात विमान कोसळल्याचे नेपाळ विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रमुखांनी विमानाच्या अपघाताला दुजोरा दिला आहे. विमान आणि प्रवाशांची स्थिती अद्याप समजू शकलेली नाही. घटनास्थळी बर्फवृष्टी होत असल्याने बचावकार्य काही काळ थांबवावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरलाईनचे विमान मानपती हिमाल भूस्खलनाच्या खाली लामचे नदीच्या मुखाशी कोसळले. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे. रविवारी सकाळी, तारा एअरलाइन्सच्या 9 NAET डबल-इंजिनयुक्त विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. या विमानाचे पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले होते. विमान मस्तंगला पोहोचताच संपर्क तुटला.


मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी पुष्टी केली की, विमान मस्तंगमधील जोमसोम एअरफील्डवर दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताकडे वळले. त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तंग जिल्ह्यातील टिटी भागात विमान क्रॅश झाल्याचा संशय आहे.


मस्तंगचे जिल्हा पोलीस कार्यालय डीएसपी राम कुमार दाणी यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी आम्हाला कॉल केला आणि आम्हाला सांगितले की त्यांनी स्फोट झाल्यासारखा असामान्य आवाज ऐकला. शोध मोहिमेसाठी आम्ही परिसरात हेलिकॉप्टर तैनात करत आहोत. गृह मंत्रालयाने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मस्तंग आणि पोखरा येथून दोन खाजगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणी पोखरेल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर शोध घेण्यासाठी तैनात करण्याची तयारी सुरू आहे.