UK Election Results: भारतात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपला चांगलाच दणका मिळाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता भारतामागोमाग ब्रिटनमध्येही सत्ताबदल होणार असल्याची चिन्हं अगदी स्पष्ट दिसू लागली आहेत. 4 जुलै 2024 रोजी ब्रिटनमध्य निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर आता इथं मतमोजणीसुद्धा सुरु करण्यात आली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार देशातील जवळपास 40 हजार मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू असून इथं मतदारांनी कामगार नेते अर्थात ब्रिटनमधील लेबर पार्टीचे उमेदवार कीर स्टार्मर यांच्या नावे जवळपास शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिट पोलमधून समोर आलेल्या माहितीनुसार लेबर पार्टीला इथं 650 पैकी 410 जागा मिळण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर, ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटीव्ह पार्टीला इथं 131 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. एक्झिट पोलची आकडेवारी बहुतांशी अशीच आली, तर ब्रिटनमध्ये सत्तापालट अटळ आहे. असं झाल्यास लेबर पार्टीला गेल्या 14 वर्षांपासूनचा वनवास संपण्याचीही चिन्हं असून, सुनक यांच्या हातून सत्तेच्या चाव्या स्टार्मर यांच्याकडे जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. 


हेसुद्धा वाचा : RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?


सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार लेबर पार्टीनं 186 सह बहुमताचा जादुई आकडा ओलांडला आहे. त्यामुळं आता ब्रिटनमध्ये भाकरी फिरणार हे जवळपास नक्की झालं आहे. एप्रिल 2020 मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्याकडून नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्टार्मर यांनी आपल्या पक्षाला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणत देशात यदूही विरोधी (ज्यू विरोधी) भावना नष्ट करण्यासाठी प्रशंसनात्मक कार्य केल्याचं म्हटलं जातं. एक व्यावहारिक आणि विश्वासार्ह नेता अशी स्टार्मर यांनी जनमानसात प्रतिमा असून, ब्रिटनला आर्थिक मंदीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ते आणि त्यांचा पक्ष पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. 


कीर स्टार्मर यांचा अल्प परिचय... 


कीर स्टार्मर यांचा जन्म 1963 मध्ये एका मजदूर कुटुंबात झाला.  बालपणापासूनच कुटुंबाचा संघर्ष पाहत ते मोठे झाले. त्यांचे वडील अवजार निर्मितीचं काम करायचे, तर आई परिचारिका होती. स्टार्मर यांना त्यांच्या वडिलांनी कीर हे नाव दिलं. लेबर पार्टीचे संस्थापक कीर हार्डी यांना श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी हे नाव निवडलं होतं. 


तुलनेनं कीर स्टार्मर राजकारणात काहीसे उशिरानं पोहोचले. वयाच्या 52 व्या वर्षी 2015 मध्ये त्यांनी होलबोर्न आणि सेंट पॅनक्राससाठी संसदीय सदस्यपदाची जबाबदारी सांभाळली. वकिली पेशामध्ये सक्रिय असल्यामुळं त्यांना या ज्ञानाची राजकारणात कायमच मदत होताना दिसली. येत्या काळात आता कीर स्टार्मर यांच्या हाती सत्ता गेल्यास ते ब्रिटनपुढं असणारी आव्हानं कमी करण्यात नेमकं कसं योगदान देणार याकडे फक्त देशाचं नव्हे, तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.