माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांची जगभरात एक वेगळी प्रतिष्ठा होती.
नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जोय बिडेन यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे एक समर्पित लोकसेवक होते, असे बिडेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार जोय बिडेन म्हणाले की, प्रणव मुखर्जी यांचा ठाम विश्वास होता की, दोन्ही देश एकत्रितपणे जगातील आव्हाने सोडवू शकतात. त्यांच्या निधनाच्या बातमीने मी आणि जिल खूप दु:खी झालो आहोत. या कठीण काळात, आमच्या प्रार्थना त्याच्या कुटुंबासोबत आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुतीन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, 'प्रणव मुखर्जी जेव्हा भारताचे राष्ट्रपती होते आणि इतर पदांवर होते तेव्हा त्यांनी उच्च स्तरावर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविली आणि ते आपल्या भागातील लोकांमध्ये लोकप्रिय राहिले. रशियाचे खरे मित्र म्हणून प्रणव मुखर्जी यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यात वैयक्तिक योगदान दिले.'
बांगलादेशनेही प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बांगलादेश सरकारने 2 सप्टेंबर रोजी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे. 2 सप्टेंबरला बांगलादेशचा ध्वज प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करत अर्धा झुकलेला राहील. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, 'प्रणव मुखर्जी यांच्याशी अनेक दशकांपासून संबंध होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यात प्रणव मुखर्जी यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.'
इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष रयूवेन रिवलिन यांनीही प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, 'इस्राईल भारतीय आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कुटुंबासोबत उभा आहे. ते एक असे राजकारणी होते ज्यांना त्यांच्या देशासह परदेशात देखील खूप प्रतिष्ठा होती. ते इस्रायलचे खरे मित्र होते. ज्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ केले. ओम शांती.'