World News : असं म्हणतात की, सावित्रीनं सत्यवानाला यमाच्या दारातून अर्थात मृत्यूच्या दाढेतून परत आणलं होतं. पती- पत्नीचं नातं हे असंच असतं. कितीही रुसवेफुगवे आले, कितीही चढ-उतार किंवा आव्हानं आली तरी या नात्यात एकमेकांची साथच ते नातं टिकवून ठेवायला आणि ते आणखी दृढ करायला हातभार लावत असते. अशा या नात्याची कैक कमाल आणि प्रेरणादायी उदाहरणं अनेकांनीच पाहिली असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही जोडप्यांचं नातं हे प्रेमापलिकडे जाऊन प्रेरणास्त्रोत असतं, कित्येकांसाठी आदर्शस्थानी असतं. अशाच एका नात्याची गोष्ट काही वर्षांपूर्वी समोर आली आणि नकळत ती वाचणाऱ्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. ही गोष्ट आहे जपानमधील एका अशा व्यक्तीची, ज्यानं 2011 मध्ये इथं आलेल्या भीषण त्सुनामीमध्ये पत्नीला गमावलं. हा माणूस जवळपास दशकभराहून अधिक काळापासून त्याच्या पत्नीचता शोध घेणयासाठी खोल समुद्रात जात होता. 


कोण आहे पत्नीवर नितांत प्रेम करणारा हा माणूस? 


यासुओ ताकामात्सु (Yasuo Takamatsu) असं या व्यक्तीचं नाव असून, त्यानं जपानच्या ओनागावा इथून त्सुनामीच्या संकटात पत्नीला गमावलं. या नैसर्गिक आपत्तीनंतर युको ताकामात्सु ( Yuko Takamatsu) पुन्हा कधीच सापडल्या नाहीत. पण, त्यांचे पती मात्र अगदी 2013 पर्यंत पत्नीच्या मृतदेहाता शोध घेताना दिसले. दर आठवड्यात पत्नीचा शोध घेण्यासाठी यासुओ ताकामात्सुनं समुद्रात उडी मारली आणि हाती अपयशच लागलं. पण, या अपयशानं खचेल तो हा माणूस कसला... 


एका मुलाखतीदरम्यान या प्रयत्नाविषयी सांगताना, आपल्या वाट्याला अपयश येणार याची कबुली खुद्द यासुओनंच दिली. अथांग समुद्रामध्ये पत्नी सापडावी असं वाटतं पण, ती सापडणार नाही, हेसुद्धा खरं. कारण इतक्या महाकाय समुद्रामध्ये तिला शोधावं लागेल हा शोध संपणार नाही... असं तो म्हणाला.


हेसुद्धा वाचा : घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे' भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात


 या मोहिमेमध्ये यासुओ एकटा नसून यामध्ये त्सुनामीच्या संकटानं प्रभावित झालेल्यांचा शोध घेणाऱ्या तज्ज्ञांची त्याला मदत मिळत होती. या साऱ्यामध्ये पत्नीवरील प्रेम, प्रेमावरील विश्वास आणि नियतीचा खेळ अशा त्रिकोणात अडकलेल्या यासुओचा संघर्ष अनेकांच्याच डोळ्यात पाणी आणून जातो. 


2011 मध्ये जपानमध्ये त्सुनामीनं हाहाकार... 


जपानमध्ये 11 मार्च 2011 मध्ये भीषण त्सुनामीनं हाहाकार माजवला होता. या आपत्तीदरम्यान समुद्राच्या गर्भातून 40.5 मीटर उंच लाटा किनाऱ्यावर धडकल्या होत्या. जवळपास 20 हजार नागरिकांनी या संकटात प्राण गमावले, तर 2500 नागरिक आजही बेपत्ता असल्याचं सांगितलं जातं. यामध्येच यासुओच्या पत्नीचाही समावेश आहे.