मुंबई : जगावर अजूनही अणुयुद्धाचं संकट कायम आहे. अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत. यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात. (world news russia ukraine war know why shortage iodine) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी थेट अणूयुद्धाची धमकी दिल्यानं युरोपच्या पोटात गोळा उठलाय. पुढचा मागचा विचार न करता युक्रेनवर थेट हल्ला चढवणारे पुतीन ही धमकी खरी केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भीती अनेकांना वाटतेय. त्यामुळेच रेडिएशनपासून बचाव करणाऱ्या आयोडिनच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू झालीये. मात्र आता अनेक देशांमध्ये या गोळ्यांचा स्टॉक संपलाय. 



अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी


पुतीन यांच्या धमकीमुळे पोलंडमध्ये आयोडीन गोळ्यांचा साठा संपलाय. रशियाचा मित्र बेलारूसमध्येही दुकानदारांना आऊट ऑफ स्टॉकचा बोर्ड लावावा लागलाय. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर तयार झालेल्या देशांनाही रशियाच्या हल्ल्याची भीती वाटतेय. त्यामुळे तिथंही आयोडीन टॅबलेट संपल्यात.


बल्गेरियामध्ये गेल्या वर्षभरात विकलं गेलं नव्हतं एवढं आयोडीन 6 दिवसांत विकलं गेलंय. चेक रिपब्लिकमध्ये अशीच स्थिती आहे. आयोडिन गोळ्या संपल्या आहेत.


अणुहल्ला झाला तर रेडिएशनमुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्यापासून आयोडीन बचाव करू शकतं. त्यामुळेच आयोडीन गोळ्या आणि सीरपला अचानक मागणी वाढली आहे. 


मागणी वाढल्यानं युरोपच्या तमाम फार्मसिस्टनी या गोळ्यांची मागणी नोंदवलीये. रशियानं अण्वस्त्र हल्ला चढवलाच तर गोळ्यांमुळे थोडं तरी संरक्षण होईल अशी लोकांना आशा आहे. मात्र अणुयुद्धाची भीती खरी ठरू नये, ही सर्वात मोठी अपेक्षा आहे.