कोरोनानंतर चीनमध्ये आढळला आणखी एक व्हायरस, इतक्या लोकांना लागण
कोरोना संपत नाही त्यात चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला आहे.
मुंबई : कोरोनाचा कहर संपत नाही त्यात चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणू आढळून आला आहे. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये Zoonotic Langya विषाणू आढळून आला आहे. जवळपास 35 जणांना याची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की तैवान या विषाणूचा संसर्ग ओळखण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धत सुरू करेल. (New virus found in China)
चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपा विषाणू आढळून आला आहे. तैपेई टाईम्सनुसार, हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी रविवारी सांगितले की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की विषाणूचा मानव ते मानव प्रसार होत नाही.
विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये पसरू शकत नाही. व्हायरसबाबत अधिक माहिती येईपर्यंत सतर्क राहण्यास सांगितले आहे.
पाळीव प्राण्यांवर केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत शेळ्यांमध्ये 2% आणि कुत्र्यांमध्ये 5% प्रकरणे आढळून आली आहेत. ते म्हणाले की 25 वन्य प्राण्यांच्या प्रजातींवर केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष असे सूचित करतात की श्रू (उंदरांसारखा दिसणारा एक लहान कीटकभक्षी सस्तन प्राणी) हे लंग्या हेनिपाव्हायरसच्या प्रसाराचे मुख्य कारण असू शकते.
इतकंच नाही तर ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या ‘ए झूनोटिक हेनिपाव्हायरस इन चायना या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये एक नवीन हेनिपा व्हायरस आढळून आला आहे, जो मानवांमध्ये तापाच्या आजाराचे कारण आहे.
चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपा व्हायरसची लागण झालेले 35 रुग्ण आढळून आल्याचे तपासात समोर आले आहे. चुआंग म्हणाले की चीनमधील 35 रुग्णांचा एकमेकांशी संपर्क नाही. तसेच या रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये आणि जवळच्या नातेवाईकांनाही संसर्ग झालेला नाही.
35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत. रुग्णांमध्ये पांढऱ्या रक्तपेशींमध्येही घट दिसून आली. इतकेच नाही तर प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून आली आहेत.