ब्लॉग : आधार एक आजोळ
मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे?
अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : एक अस्फुट हुंदका एका बाळाचा... आईच्या ओढीचा, आईच्या कुशीत विसावण्यासाठी फुटलेला... पण आईच त्याला सोडून निघून गेलेली... आई जग सोडून निघून गेली नाही तर आई त्याला या जगात जन्मतः एकट्याला सोडून गेलेली... कुठे तरी कचराकुंडीपाशी तो सापडतो... जगला काय मेला काय, त्याच्या आईला आपली झालेली चूक लपवण्यासाठी, निस्तरण्यासाठी त्याच्यासाठी कचराकुंडीच दिसते...
त्याच्याच शेजारचा दुसरा हुंदका... एका छकुलीचा... चाईल्ड डिलीव्हर्ड ए चाईल्ड असा शेरा तिच्या जन्मदात्रीला मिळालेला. कोणा नराधमाच्या वासनेची शिकार झालेली तिची जन्मदात्री तिला सोडून निघून गेलेली...
पलीकडे आणखी एक हुंदका... बापाने रागाच्या भरात त्या भावंडांच्या आईचा खूनच करू टाकला... आई देवाघरी, बाप तुरूंगात... बाळाचा हुंदका विरतो न विरतो तोच तो असहाय्य एकटा पोलिसांच्या ताब्यात.
क्षणांचे निखारे झालेल्या या काही कहाण्या. या कहाण्यांच्या नायक नायिकांचं वय अवघं ३ महिने ते ३ वर्ष... मात्र, अशी खिन्न छाया या निरागसांच्या आयुष्यावर असली तरी सगळंच संपलेलं नाही. या जगात येणाऱ्या प्रत्येकाला सांभाळण्यासाठी परमेश्वराने कसली ना कसली निर्मिती केली आहेच.
वर सांगितलेल्या कथा आहेत गौरव, सई आणि मुश्ताक (नावं बदलली आहेत) या तीन बाळांची. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेली ही बाळं आज एकत्र एका छताखाली पहुडली आहेत. त्यांची देखभाल केली जातेय आकुर्डीच्या आधार या अनाथाश्रमात. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली की या बाळांना दत्तक देण्याची प्रक्रिया कारातर्फे सुरू केली जाईल.
पुण्याजवळ आकुर्डी स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या आधार या संस्थेत आजवर अशी शेकडो बालकं आली, ९२ बालकं दत्तकही दिली गेली... प्रत्येकाची कहाणी काहिशी अशीच... पण या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा धागा म्हणजे आधार ही संस्था. आकुर्डीच्या प्राधिकरणात माधव स्मृती या इमारतीत वसलेली ही सुंदर संस्था.
आधार दत्तक संस्थेची स्थापना १९९१ साली पुण्याचे नामवंत वैद्य खडीवाले यांनी केली. जागेची अडचण मुंबईच्या भावे आणि दामले या कुटुंबियांनी सोडवली. प्राधिकरणात असलेल्या दोन प्लॉट्सवर संस्थेची इमारत उभी राहिली. संस्थेत पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवडच्या रामचंद्र भिडे आणि त्यांच्या पत्नी माधवी भिडे यांनी स्वीकारली. आजवर या संस्थेत एकूण ११६ पेक्षा जास्त मुलं दाखल झाली आणि ९२पेक्षा जास्त मुलं विविध ठिकाणी दत्तक गेली आहेत.
संस्थेचा इमारतीत शिरल्याबरोबर सर्वप्रथम नजरेला पडते स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. भिडे दाम्पत्य आणि त्यांचा सगळा स्टाफ ही जबाबदारी पार पाडतो. इमारतीत शिरताच दिसल्या त्या स्वच्छ पायऱ्या. दारात भिडे काकूंनी स्वागत केलं. गेल्या गेल्या पाय धुवून घ्या, लहान बाळं आहेत असा आपुलकीचा सल्लाही दिला. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यातून त्या संस्थेची संस्कृती दिसते.
आत गेलो तर एक दीड वर्षांची एक मुलगी खेळत होती... भिडे काकूंना पाहिल्यावर चाल चाल करत आली आणि बिलगली... बाजूलाच खेळत असलेला सलमान (नाव बदललं आहे) आजीला पाहून उचलून घेण्यासाठी हट्ट करायला लागला... हा अनाथाश्रम असला तरी याचं स्वरूप अनाथाश्रमासारखं नाही तर आजोळासारखं ठेवायचं हा खडीवाले आणि भिडे कुटुंबियांचा आग्रह.
बाळांना दिलं जाणारं दूध, थोड्या मोठ्या मुलांना दिलं जाणारं खाणं यावर विशेष कटाक्ष दिला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे प्रत्येक बाळासाठी आहार केला जातो. बाळांचं लसीकरण, त्यांची विशिष्ट कालावधीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्य तपासणी केली जाते. इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यानुसार प्रशिक्षण दिलं जातं. समाज सेवेची पदवी घेतलेले पूर्णवेळ कर्मचारी इथे विशेष लक्ष देण्यासाठी नियुक्त आहेत. विशेष भेटीवर येणारे समुपदेशक आहेत.
बाळांची स्वच्छता ठेवण्यासाठी, त्यांच्या आहारांच्या वेळा पाळण्यासाठी, त्यांना झोपवण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी पूर्णवेळ तीन तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या काकू इथे आहेत. जगात आईने टाकून दिलेल्या या जीवांना मायेची ऊब देतात त्या या काकू.
गेली २७ वर्षे या संस्थेत भिडे कुटुंबिय पूर्णवेळ काम करत आहेत. स्वतः पेशाने शिक्षिका असलेल्या माधवी भिडे या संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पती रामचंद्र भिडेंची त्यांना साथ आहे. आता त्यांचा मुलगा शैलेशही स्वतःचं काम सांभाळून या कार्यात आवडीने सहभागी होतो. इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचा-याची अशीच कथा. सरकारी अनुदान नसल्यामुळे केवळ मिळणाऱ्या देणग्यांतून या संस्थेचा कारभार करावा लागतो. वैद्य खडीवाले, भिडे, भावे, दामले या कुटुंबियांनी या कार्याचा ध्यास घेतलाय. त्यामुळे वेळप्रसंगी स्वतःची पदरमोड करून या संस्थेचं कार्य पुढे नेलं जातं.
इथे राहणाऱ्या मुलांचं हे आजोळ आहे. इथलं मुल दत्तक जातं तेव्हा त्या बाळाला घेणाऱ्या मातेची ओटी भरली जाते. बाळाचा हा नवा जन्म असतो. बाळ पुन्हा मायेच्या सावलीत वाढावं यासाठी दिलेल्या या शुभेच्छा असतात. वर्षातून एकदा इथून गेलेल्या सर्व मुलांना परत आजोळी त्यांच्या आईवडिलांसह बोलावलं जातं. एक सुंदर मेळावा होतो... मुलं या आजोळाला कधीच विसरत नाहीत.
आज या संस्थेतून दत्तक गेलेल्या पहिल्या मुलीचं लग्न होऊन दोन वर्ष झाली, खुप सुखात आहे माझी लेक... सांगताना भिडे काकूंचा गळा दाटून आला. ती अमक्या अमक्याकडे गेलेली मुलगी एमबीए झाली, तो अमका अमका मुलगा पण एमबीए झाला. कोणी डॉक्टर झाले कोणी इंजिनिअर झालेत. नशिबाशी झगडत या जगात आलेली ही मुलं असतातच जिद्दी. पुढच्या आयुष्यात जिद्दीने उभी राहतात. खुप छान शिकतात. आपल्या आईवडिलांचे आधार होतात, आपल्या भावी आयुष्यात आपणही एक मुल नक्की दत्तकच घेऊ हा समृद्ध विचार मांडतात तेव्हा संस्थेने केलेल्या कामाचं चीज होतं. कलमी गुलाबाचं फुल जसा दैवी सुगंध घेऊन येतं तशी ही मुलं दत्तक गेलेल्या घरात आनंदाचं झाड बहरवतात.
बालहक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला कुटुंबात राहण्याचा अधिकार आहे. मात्र इथे ही मुलं जगात एकटी आहेत, कुटुंबापासूनच वेगळी झालीयेत. त्यांना नियम, कायद्यानुसार दत्तक देऊन घर मिळवून देण्यासाठी आधार संस्था कार्यरत आहेच. पण केवळ रूक्ष संस्था म्हणून काम करण्यापेक्षा या बाळांचं आजोळ होऊन त्यांना योग्य दिशा देण्याचा आग्रहच आधारचं महत्त्व अधोरेखित करतो.