नरेंद्र बंडबे, झी मीडिया, मुंबई : 'बाहर की घटनाएँ - अंतर का अनुभव'. सुप्रसिध्द लेखिका अमृता प्रीतम यांची आत्मकथा 'रसीदी टिकट' ची ही टॅगलाईन. अमृता प्रीतम या भारतातल्या महत्त्वाच्या लेखिका आहेत. पिंजर, कोरे कागज, एक थी अनिता सारख्या अप्रतिम कादंबऱ्या, असंख्य लघुकथा आणि अप्रतिम उत्कंठ कविता, भारतीय साहित्यात अमृता प्रीतम यांनी अस्सल फेमिनिजम आणला. चुल, मुल आणि स्वप्नवत वाटणाऱ्या स्त्री पात्रांना मजबूत केलं. आसपास घडणाऱ्या घडामोडींना कथानकात बांधलं आणि त्याची अशी काही मांडणी केली की जणू हे आसपास आता, या घडीला घडतंय असं वाचकाला वाटायला लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता प्रीतम यांची लिखाणाची शैली भन्नाट आणि तेव्हढ्याच भन्नाट त्या जगल्यात. रसीदी टिकटमध्ये त्यांचं हे जगणंच थेट आलंय. लिखाण आणि जगण्यात त्यांनी साचेबध्दतेला छेद दिला. चौकट मोडली. 


मनाला पटेल त्या गोष्टीच त्यांनी केल्या. त्या थेट वाचकांच्या विचारांचा ताबा घेतात. मनाला भिडतात. त्यांना अभिप्रेत असलेला इम्पॅक्ट लागलीच जाणवतो. म्हणूनच 'बाहर की घटनाएँ - अंतर का अनुभव' अशी स्थिती तयार होते.


नाटकाच्या भाषेत सांगायचं झालं, तर या स्थितीला रस-निष्पति होणं, असं म्हटलं जातं. हा साधारणीकरण प्रक्रियेचा भाग आहे. साधारणीकरण म्हणजे प्रेक्षक किंवा वाचक यांचं अभिनय किंवा पुस्तकाशी समरस होणं. त्यातल्या घटनांशी नातं तयार होणं.


झी मराठी प्रस्तृत, अथर्व निर्मित आणि नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी दिग्दर्शित केलेलं. 'झुंड' हे मराठी नाटक साधारणीकरणाच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतं. पत्रकार समर खडस हे या नाटकाचे लेखक आहेत. 


विषय खोल आहे. मॉब लिंचीग, राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता आणि मध्यमवर्ग नोकरदार वर्गाची असहायता. मॅजिक रिएलिजम दाखवण्याचा प्रयत्न झुंडमध्ये करण्यात आलाय. यासाठी फ्रान्झ काफका ते पाश या विद्रोही कवीच्या साहित्यिक गप्पांमधून नाट्य घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. 


हे नाटक न्यूज पेपरच्या ऑफिसमध्ये घडतं. यामुळं तिथल्या गप्पा, एडीट मिटींग, एकमेकांविरोधात असलेले हेवेदावे आणि एकुणात तिथं असलेलं जात-पात आणि धर्माचं राजकारण याचा भडीमार आहे. 


नाटकातली जवळपास सर्वच पात्रं पत्रकार आहेत. मध्यमवर्गातले नोकरदार. यामुळं त्यांच्या गप्पामध्ये साहित्य, सिनेमा, आसपासच्या घडामोडी, त्याचा आपल्या जगण्याशी संबंध असलेल्या गोष्टी आणि घटनांचा संदर्भ आहे. 


साहाजिकच सध्या देशात सुरु असलेल्या झुंडशाहीचा उल्लेख प्रकर्षानं नाटकात येतो. ही झुंडशाही डिस्कस होत असताना न्यूज पेपरच्या ऑफिसमध्ये ही सोफेस्टिकेटेड झुंडशाही अविरत सुरु आहे. ती आपसुक झिरपलेय हे जाणवतं. यामुऴं बाहेर असो किंवा आत विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय. 


ते आणि आपण, आतले आणि बाहेरचे असा संघर्ष सुरु आहे, यातून 'त्यांचा' बळी जातोय. असं हे अगदी साधं असं कथानक झुंडचं आहे. विषय चांगला आणि खोल, पण प्रायोगिक नाटकाच्या पठडीत बसणारा. 


राजस्थानमधला पेहलू खान आणि झारखंडमधला तबरेज अन्सारी या दोघांचा झुंडशाहीनं बळी घेतला. या दोन्ही घटना छोट्या शहरांमध्ये घडल्या. आज त्या विरोधात देशात मोठं वातावरण तयार झालं आहे. 


राजस्थानमध्ये तर मॉब लिंचिंग विरोधात कायदा बनला, पण या घटना थांबल्यात का ? याचं उत्तर नाही असं आहे. मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर या घटना घडत असताना या महानगरातल्या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्येही जात आणि धर्म याच्यावर वैचारीक झुंडशाहीला उधाण आलंय. 


ही झुंड दिसत नाही, पण आपलं काम करत असते, असं दाखवण्याचा प्रयत्न या नाटकात झाला आहे. यामुळं आज देशात जी परिस्थिती आहे, त्यावर थेट भाष्य करणारं हे महत्त्वाचं नाटक आहे. 


झुंडशाहीचा मानसशास्त्राच्या दृष्टीनं विचार व्हायला हवा. मॉब लिंचींग आणि पीअर प्रेशर (peer pressure) यांचा जवळचा संबंध आहे. अगोदर एक माणूस तणावात येतो, अस्वस्थ होतो, त्यातून तो बाजूच्या माणसाला अस्वस्थ करतो. 


ही चैन रिएक्शन असते. गर्दीत ही अस्वस्थता वाढत जाते आणि त्यातून त्या गर्दीची एकच मानसिकता तयार होते. ती कधी कधी हिंसक होते आणि त्यातून गुन्हा घडतो. याला मानसशास्त्राच्या भाषेत इमोशनल कंटाजियन म्हटलं जातं. म्हणजे भावनिक संसर्ग. 


गर्दीचं झुंडीत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. जमावाला चेहरा नसतो. तिथं तयार होते ती पॅनिक सिच्युएशन. आपल्या देशातली ही पॅनिक सिच्युएशन राजकिय परिस्थितीवर अवलंबून आहे. 


जिथं राजकारण येतं तिथं पॅनिक व्हायला आणि अशा जमावाला बेकाबू व्हायला वेळ लागत नाही. अशावेळी या पलिकडं एक जग असं आहे, जे या परिस्थितीकडे तटस्थ आणि अलिप्त होऊन पाहत असतं. पत्रकारीता पण राजकारण, जात, धर्म याचे अलिखित नियम या जगालाही लागू आहेत. अगदी बेमालूम.


तुम्ही कितीही शिकलात, कुठे ही काम केलंत, कितीही नाव कमावलं, तरी तुमची जात आणि धर्म राहतोच. कित्येक वर्षांच्या पिढ्यानं पिढ्यां आलेल्या तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीने तुमच्यात राहतात. 


ही गोष्ट आपण आपल्यातून वेगळी करु शकतं. ती आत रुजलेय. आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे आहोत, हे मान्य करुन पुढं जाणं, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसह एकमेकांना स्वीकारणं हे आपल्या हातात आहे. 


किमान शहरात हे शक्य आहे, असं वाटत असलं तरी ते तसं होत नाहीय. त्यातूनच मग शिकार होते. शिवाय कॉर्पोरेट गिधाडं असतातच. किंवा एक तथाकथित सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल आणि कणा नसलेला समाज त्या गिधाडांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून उभा असतो, तो ही गिधाड बनलेला असतो. 


सत्तेत असलेला घटक बहुजनाशी संबंध ठेवू इच्छित नाही. मग तो या विशिष्ट जाती धर्माच्या, वेगळा थेट विचार मांडणाऱ्या सहकाऱ्याची शिकार करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत ऑफिसमधल्या इतर मध्यमवर्गीय स्टाफला मुकनायक बनल्याशिवाय पर्याय राहत नाही. 


हा नोकरी बचाव मध्यमवर्गीय मूकनायक जेव्हा जागा होतो तोवर या कॉर्पोरेट आणि अविवेकी विचार असलेल्या झुंडीची शिकार झालेली असते. अशावेळी फ्रस्ट्रेशन शिवाय मध्यमवर्गाच्या हातात काहीच उरत नाही. फक्त आशावाद त्याच्याकडे उरतो. मग पाशच्या हम लढेंगे साथी या स्थितीपर्यंत येऊन तो ठेपतो. 


हे सर्व असं अस्वस्थ भवताल झुंड या नाटकात आहे. यामुऴंच अमृता प्रीतम या वास्तववादी लेखिकेच्या आत्मकथेची टॅग लाईन 'बाहर कि घटनाएं - अंतर के अनुभव' झुंडसाठी एकदम चपखळ बसते.
 
झुंड नाटकात प्रचंड डायल़ॉगबाजी आहे. अनेकदा ती अवाजवी वाटते, काही ठिकाणी ती टाळ्या मिळवते. हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांचं भोवतालशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. तो किमान वाचणारा आणि विचार करणारा असायला हवा. तसं घडलं नाही तर साधारणीकरणाचा प्रयत्न फोल ठरु शकतो. तो फक्त डायलॉगबाजी पुरता मर्यादित राहू शकतो. 


दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये मुळात चांगले नेपथ्यकार असल्यानं न्यूज पेपरच्या ऑफिसचा कल्पक सेट त्यांनी तयार केलाय. तिथं घडणाऱ्या नाट्याला विचारांच्या डायलॉगबाजीची जोड मिळालेय. एव्हढंच. 


बाकी झुंड बरा आहे. अंगावर येणारा नसला तरी विचार करायला लावणारा नक्कीच आहे. शहरी मध्यमवर्गाच्या मानसिकतेवर थेट भाष्य करणारा आणि बोट ठेवणारा आहे. झुंडीतला मध्यमवर्ग यावर वेगळं लिहता येईल. तोवर झुंड पाहायला आणि अनुभवायला हरकत नाही.