मधुरा सुरपूर, झी मीडिया, मुंबई : ५ एप्रिल साधारण रात्री आठची वेळ...लॉकडाऊनमुळे सगळे घरीच बसून बातम्या बघत होतो... इतक्यात एका वृत्तवाहिनीवर निराधार आजी आजोबांची बातमी आली आणि मन सुन्न झालं... पण, इवल्याशा किआराचे डोळे पाणावले...आणि तीने ताबडतोब मला आणि बाबाला सांगितलं की, आपण त्यांना मदत करूयात, आणि तिने मला आदेश दिला की,त्यांचा पत्ता शोधून काढ आणि त्यांना हेल्प कर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग, लगेच मी पण क्षणाचाही विलंब न लावता...थेट रिपोर्टरला फोन लावला आणि सगळी माहिती घेतली...त्या रिपोर्टरने सगळी माहिती दिली आणि रिपोर्टर किआराशी बोलला देखील...मात्र,कोरोनाचा धोका लक्षात घेऊन त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला...आजोबांचं हातावरचं पोट, दररोज ट्रेनमध्ये कापडाच्या पाण्याच्या पिशव्या विकून घर चालवण्यासाठी धडपड करणारे आजोबा ट्रेन बंद असल्यामुळे शांत होते. ट्रेन बंद, लॉकडाऊन, घराबाहेर पडण्याची परवानगी नाही यामुळे खायची भ्रांत... पुढे आवासून प्रश्न उभा होता... मग जीवन जगायचं तरी कसं??


कोरोनामुळे मास्कची मागणी वाढली आणि आजोबांनी मास्क बनवायला सुरुवात केली...पण, विकणार कसे???असे अनेक आजी आजोबा असतील पण, त्यातल्या एका आजी आजोबांना आपण मदत केली तर काय हरकत आहे...किआराला मी समजावून सांगितलं तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जाऊ आणि त्यांना मदत करू...पण, लॉकडाऊन काही संपण्याची चिन्ह नव्हती...एक दिवस अचानक तिने मला विचारलं की, ते आजी आजोबा आले का गं परत घरी?? मी म्हटलं तुझ्या लक्षात आहे??? तर , त्यावर ती मला म्हणाली ,माँ (ती मला माँ म्हणते) आपल्याला हेल्प करायची आहे...तू विचार त्या रिपोर्टरला आणि मला सांग...मग, मी सगळी माहिती घेतली.


आमची तारीख ठरली ६मे ला जाऊन तिथे भेटायचं आणि वाढदिवस साजरा करायचा... पण, लॉकडाऊन वाढला आणि आमचा सगळा प्लॅन फिस्कटला असं वाटलं...पण,रिपोर्टर आणि निरंजन सर यांनी केलेले प्रयत्न किआराला खूप काही देऊन गेले... तिला मोठं सरप्राईज मिळालं, तिला आजी आजोबांनी व्हिडिओ कॉल केला आणि विशेष म्हणजे तिथे तिच्या बिर्थडेची तयारी केली... तिला काय बोलू काहीच सुचत नव्हतं...पण, ती एकच वाक्य बोलली माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि गिफ्ट पण.. आजी-आजोबांचे फोन वरून आशीर्वाद घेतले आणि लॉकडाऊन संपल्यावर भेटायला येणार असही त्यांना सांगितलं.


हे मी तिला अजिबात सांगितलं नव्हतं...तिने त्यांना हवी ती मदत करण्याचा शब्द दिला. तिच्या वाढदिवशी तिला मिळालेलं सगळ्यात भारी गिफ्ट होतं. लॉकडाऊनमध्ये सात वर्षाच्या किआराचा वाढदिवस कसा साजरा करायचा हा प्रश्न होता? पण सकाळच्या या सरप्राईजने तिचा पूर्ण दिवसच खास करून टाकला. 


या लॉकडाऊनने काय दिलं? तर एक संवेदनशील आणि समजूदार किआरा... किआरा आणि या पिढीचा खूप अभिमान वाटला. माझी मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो....किऊ तू ग्रेट आहेस...