अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई : एकेकाळी लोकसभेत अवघे दोन खासदार असलेला भाजप संसदेतील आणि देशातील बहुतांश राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरत सत्तेची सूत्रे हाती घेईल हा विचारही कोणाला पटला नसता. पण, काळाचा महिमा अगाध. भाजपने मुसांडी मारली. राजधानी दिल्लीसह देशातील अपवाद वगळता सर्व राज्यांत सत्ता मिळवली. भाजपचा हा चढता आलेख पाहता काँग्रेसची दशा मात्र वाईटातून वाईटाकडे अशी दिसते आहे. देशाच्या राजकारणात अनेक वर्षे बहुमताने आणि आघाडी सरकारच्या रूपात सत्ता भोगलेल्या या पक्षाची स्थिती अत्यंत दारूण झाली आहे. भाजपच्या विजयासोबत काँग्रेसचा पराभव हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा, नागालॅंण्ड विधानसभा निवडणुकितील निकालासह आजघडीला संपूर्ण देशाचा विचार करता भाजप आणि आघाडीने २१ राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यपैकी १५ राज्यांत तर, भाजपची स्वबळावर सत्ता आहे. तर, उर्वरीत सहा राज्यांमध्ये इतर राज्यांसोबत आघाडी करून भाजपने सत्ता मिळवली आहे. या तुलनेत काँग्रेस मात्र भलताच आक्रसलेला दिसत असून, हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. विद्यामान स्थितीत काँग्रेस केवळ चार राज्यांमध्ये सत्तेत आहे.


भाजपच्या विजची कारणे


गेली अनेक वर्षे सत्तेत असल्यामुळे काँग्रेस पक्षात संचारलेला आळस. तसेच, एकाच पक्षाकडे अनेक वर्षे सत्ता असल्याने जनतेच्याही मनात आलेले एक साचलेपण (बदलाची मानसिकता) त्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुरीणांनी घेतलेला अचूक वेध. इंटरनेट, सोशल मीडिया यांसारख्या बदलत्या प्रचार प्रणालीच्या माध्यमातून भाजपने हाती घेतलेला आक्रमक प्रचार. सत्तेच्या अतिमहत्वाकांक्षेपोटी राबवलेली हायटेक प्रचार यंत्रणा. प्रचंड प्रमाणात आर्थिक खर्च करण्याची क्षमता. (नोटबंदीनंतर भाजपने खरेदी केलेली कोट्यवधी रूपयांची पक्ष कार्यालये).  विचारसरणीच्या बाबतीत बोलायचे तर, 'जो कोणीही येई आपणाकडे, त्याला लावावे गळाशी. प्रसंगी निष्ठावंतांना ठेऊन तळाशी, स्पर्धा सत्तेच्या कळसाशी' ही वृत्ती. भाजपमध्ये ही वृत्ती मोदी-शहांच्या काळातच अधिक प्रमाणात दिसते आहे. विशेष म्हणजे या वृत्तीचे भाजपतील धुरीण जाहीर समर्थनही करताना दिसतात. (भाजपतील काहीचे म्हणने असे की, भाजपमध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो.) भाजपच्या यशाला दुसरी एक किनार आहे. ही किनार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरची. निवडणुकीच्या राजकारणात संघ आतापर्यंत उघडपणे कधीच पुढे आला नाही. तरीही भाजपवर संघाचे किती प्रभुत्व आहे. भाजपच्या माध्यमातून संघ सत्ताकारणातली पकड पडद्यामागे राहूनही कशी मजबूत ठेवतो, हे आता लपून राहिले नाही. अनेक अभ्यासकांनी ते दाखवूनही दिले आहे. मार्गदर्शन संघाचे आणि अंमलबजानी भाजपची, असेच काहीसे चित्र. तर, अशी काही भाजपच्या विजयाच्या कारणांपैकी प्रमुख कारणे आहेत.


काँग्रेसच्या पराभवाचे राज


तुलनेत काँग्रेसची स्थिती मात्र भलतीच विचीत्र. धड सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही. भाजपची प्रचार यंत्रणा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, नेतृत्वाची दशा आणि दिशा या बाबतीत भाजपच्या तुलनेत काँग्रेस अगदीच दुबळी ठरताना दिसत आहे. दुसरे असे की, राष्ट्रीय नेतृत्व म्हणून अवकाश कवेत घ्यायला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भलताच अवधी घेतला. इतका की, त्यांच्या नेतृत्वाची विरोधकांनी प्रमाणापेक्षाही अधिक खिल्ली उडवली. अर्थात राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणूक आणि अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आपल्या कार्यशौलीत केलेला बदल थक्क करणारा आहे. हा भाग अलहिदा. पण, महत्तवाचे असे की, लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर एकामागून एक राज्येही हतून गेली. त्यामुळे तूटत चाललेली आर्थिक रसद हेही काँग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. पक्ष चालवायचा सत्ता मिळवायची तर, प्रचंड आर्थिक स्त्रोत उभा करावा लागतो. त्यासाठी पक्षनिधी कामाला येतो. पण, सत्ता नसेल तर त्याच्या उभारणीवर प्रचंड मर्यादा येतात. असा वेळी काही उद्योगपती पठीशी उभा राहिले तरच काही साधन्यासारखे. पण विद्यमान स्थिती अशी की, सध्या प्रमुख उद्योगपतींचाही वरदहस्त भाजपच्या डोक्यावर दिसतो. अशा प्रसंगी काळ तर मोठा कठीण आला अशीच स्थिती काँग्रेसची अधिक. त्यामुळे काही काळ तरी काँग्रेसला थांबा आणि वाट पहा असाच असणार आहे.


भाजप आणि आघाडीची सत्ता असलेली राज्ये


महाराष्ट्र, गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, त्रिपुरा, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश ,उत्तराखंड, गोवा, मणीपूर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश


काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये


मिझोराम, कर्नाटक, पंजाब आणि पुदुचेरी


काँग्रेस-भाजपेत्तर सत्ता असलेलील राज्ये


केरळ, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि दिल्ली