चिन्मय कीर्तने, मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांशी ट्रेकर्सचा ट्रेकिंगचा श्रीगणेशा हा सह्याद्रीमधील गड-दुर्ग येथूनच होतो! माझीही सुरुवात अशीच झाली! सुरुवातीच्या काळात झपाटल्यागत सिंहगड-पुरंदर-पन्हाळा असे इतिहासिक दुर्ग पाहण्याचा सपाटाच लावला! कॉलेजमध्ये आपण केलेली ही भ्रमंतीची वर्णन मित्रांना सांगणं हा एक आवडीचा छंद बनला होता! असाच कोणीतरी एकदा मला एक प्रश्न विचारला - "अरे तू एवढा त्या डोंगरी किल्ल्यांवर का बरे जातोस? काय असतं असं पाहायला? त्या तुटक्या इमारती पडल्या तर?" ह्या प्रश्नामुळं मी मात्र खरंच विचारात पडलो... खरंच का बर आपण हे दुर्ग पाहतो? ह्या दुर्गांच प्रयोजन काय? ह्याच डोंगरावर दुर्गम जागी इतकं बांधकाम का बरं केलं असेल? ह्या सर्वांची व्यवस्था कोण पाहत असेल? हे दुर्ग असेच का बांधले असतील? हे दरवाजे, हे बुरुज, ह्या पाण्याच्या टाकी इथंच का खोदले असतील? असे अनेक प्रश्न पडू लागले... अन ह्याच विचारात एकदा एक पुस्तक सापडलं त्यात ह्या सर्व कोड्यांचा उलगडा झाला! तो ग्रंथ म्हणजे शिवाजी महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत ह्यांनी लिहिलेला 'आज्ञापत्र' नावाचा ग्रंथ!


दूर्ग : संपूर्ण राज्याचे सार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज्ञापात्रातील खाली नमूद केलेला उतारा आपल्या सह्याद्रीतील दुर्गबांधणीचे प्रयाजोन किती समर्पकपणे विषद करतो ते पहा : "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देशच उद्ध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे? याकरता पूर्वी जे जे राजे जाहले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तरी  तीर्थरूप  थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. सालेरी आहीवंतापासोन  कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. ज्यापेक्षा राज्यसंरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी. ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. कोणाचा विश्वास मानू नये"


काय आहे आज्ञापत्रं?


चला तर मग पाहूया आज्ञापत्रामध्ये किती सविस्तरपणे दुर्गबांधणी, दुर्गप्रशासन  आणि दुर्ग व्यवस्थापन मांडले आहे ते! तत्पूर्वी हे आज्ञापत्र लिहिले  हे नेमके काय प्रकरण आहे? ते कोणी लिहिले आहे? असे प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे! चला तर मग या आणि पुढील ब्लॉगमध्ये सफर करूया आज्ञापात्रातील उल्लेख केलेल्या दुर्गव्यवस्थेचं!


आज्ञापत्र आणि रामचंद्रपंत अमात्य :


रामचंद्रपंत अमात्य ह्यांचे मूळनाम रामचंद्रपंत भादाणेकर असे होते. पंधराव्या शतकामध्ये कल्याण प्रांतामधील भादाणे गाव कुलकर्णी वतन ह्या घराण्याकडे होते. पुढे ह्या घराण्यातील सोनोपंत हे शाहजी राजांकडे मुत्सद्दी म्हणून दरबारी होते. पुढे हेच सोनोपंत डबीर (म्हणजे परराष्ट्र मंत्री ) म्हणून शिवाजी महाराजांकडे होते.  सोनोपंत ह्यांना निळोपंत आणि आबाजी सोनदेव हे दोन पुत्र होते. निळोपंतानी स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे ह्यांसोबत अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतलेला आढळतो.


निळोपंतांच्या मृत्युनंतर १६७२ -७३ च्या सुमारास  त्यांचा मुलगा रामचंद्र ह्याला अमात्यपद मिळाले. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे ह्यानंतर अमात्यपद हे अतिशय महत्त्वाचे होते.


शिवाजी महाराजांनंतर शंभूकाळात रामचंद्र सुरनीस (सचिव) पदावर होते. १६८९ साली शंभूराजांच्या दुर्दैवी मृत्युनंतर स्वराज्याचे पुढील छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेत जिंजी किल्ल्यावर निघून गेले. तेव्हा  रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण ह्या मुत्सद्द्यांनी मोडकळीला आलेले स्वराज्य औरंगजेबासारख्या अतिशय प्रबळ शत्रूविरुद्ध तग धरून राखले, झुंजवले!


ह्या कर्तबगारीमुळे राजाराम महाराजांनी रामचंद्र अमात्यांना 'हुकुमतपन्हा' हा किताब बहाल केला होता. पुढे १७०७ नंतर शाम्भूराजांचा मुलगा शाहू मोगली कैदेतून सुटून स्वराज्यात आल्यावर रामचंद्रपंत कोल्हापूरकर छत्रपतींच्या पदरी राहिले.


अशा प्रकारे शिवाजी महाराजांपासून ते कोल्हापूरकर संभाजी छत्रपती इथपर्यंत दीर्घकाळ स्वराज्याची जडणघडण रामचंद्रपंतानी पाहिली होती. ह्या सर्व काळात जे शिवाजी महाराजांनी आपले राज्यासंबंधीचे विचार सहकाऱ्यांना सांगितले असावेत ते सर्व १७१५ च्या सुमारास रामचंद्रपंतानी ह्या आज्ञापात्रामध्ये एकत्र गुंफून हा एक अपूर्व ग्रंथ सिद्ध केला.


आज्ञापत्राचे स्वरूप 


शिवकालीन स्वराज्य कसं होतं त्यामागच्या प्रेरणा काय होत्या? हे जाणून घेण्यासाठी आज्ञापत्र हे एक श्रेष्ठ दर्जाचे ऐतिहासिक साधन आहे. दुर्ग ह्या विषयावर सखोल विचार मांडणारे तर कौटिल्याच्या अर्थशास्त्र ह्या साधनानंतर लिहिले गेलेले आद्य दुर्ग साहित्य असाच उल्लेख करावा लागेल!


आज्ञापत्राचे दोन भाग पडलले दिसून येतात. एक भाग इतिहासाचा तर दुसरा राजनीतीचा... पहिल्या भागात शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र ह्यांचा इतिहास आहे तर दुसऱ्या भागात मराठी राज्याची प्रशासन यंत्रणा (Administrative Systems), अर्थनीती ( Economic Systems) आणि संरक्षण (Defense Systems) ह्या बाबांची काय व्यवस्था होती, ह्याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे.


प्रशासन यंत्रणेबाबत लिहिताना राजा, राजधर्म, राज्यव्यवस्था ह्याबद्दल विवेचन केले आहे. अर्थनीतीमध्ये सावकार, वतनदारी या तत्कालीन व्यवस्थेवर भाष्य केलेले दिसून येते. संरक्षण व्यवस्थेबद्दल लिहिताना स्वराज्यातील दुर्ग आणि आरमार या अतिशय महत्त्वाच्या बाबींचा अतिशय खोलवर विचार केलेला दिसून येतो.
 
संदर्भ : रामचंद्रपंत अमात्यांचे आज्ञापत्र - संपादक डॉ. अ. रा. कुलकर्णी


(लेखक वाहन उद्योग क्षेत्रात इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. ट्रेकिंगसोबत इतिहास, किल्ले आणि किल्ल्यांची रचना या गोष्टींमध्ये त्यांना विशेष रुची आहे. याच विषयावर केलेल्या  www.chinmaykirtane.blogspot.com या ब्लॉग लेखनासाठी त्यांना नुकत्याच झालेल्या 'गिरिमित्र' संमेलनात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला...)