(२० फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी पहाटे ठाण्याच्या कोरम मॉल परिसरात बिबट्या आढळला. सध्या बिबट्या वस्तीमध्ये घुसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण का घडतंय हे. याला कारणीभूत कोण? यावरचं 'झी 24 तास'च्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी हा ब्लॉग लिहिला आहे.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुवर्णा धानोरकर, मुंबई : असं तोंड उघडं टाकून बघू नका. खरंच मी तुमच्या इमारतीच्या वाहनतळातूनच बोलतोय. तुम्हीच माझ्यावर ही वेळ आणली. सरसकट मला दोष देत फिरू नका. बिबट्या मानवी वस्तीत शिरला, परिसरात दहशत, बिबट्या मानवी वस्तीत शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ.. काय चाललंय, काय बोलताय तुम्ही... मी मानवी वस्तीत शिरलोय, माझ्याबद्दल तुम्हाला भीती वाटतेय. चुकीचं बोलताय तुम्ही. नीट विचार करा. तुमच्या आई आजीच्या काळात माझी आजी, आई आजोबा कुणी येत होतं का मानवी वस्तीत? नाही ना...? आठवत अशा काही बातम्या वाचल्याचं ? आठवेलच कसं, कारण नव्हतेच येत ते तुमच्या वस्तीत. आमची जमात तशी तुम्हाला घाबरणारी. पण तुम्ही आता जे वागताय ना त्यामुळे मला तुमच्या वस्तीत यायला भाग पाडलंत. मला ना खाद्य उरलं ना निवारा. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर मलाही हातपाय हलवायला लागणारच ना ? तुम्ही अशा परिस्थितीत काय केलं असतं?


मी सुखानं हिरवाईत राहात होतो. मला हवं ते खाता येत होतं. ना तुमच्या पूर्वजांना माझ्या पूर्वजांचा त्रास. ना माझ्या पूर्वजांना तुमच्या पूर्वजांचा त्रास. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. माझ्या आईनं मला तसं सतर्क केलं होतं. ती जायच्या आधी मला हेच सांगून गेली, आम्ही जगण्यासाठी संघर्ष केलाच आहे, पण तुला यापेक्षा जास्त संघर्ष करावा लागेल. आज तिचे ते शब्द आठवतायत. मला माझ्याच परिसरात ना पाणी राहिलं ना खाद्य, ना डोक्यावर हिरवं छत. काही काळ मी अशा परिस्थितीत तग धरायचा प्रयत्न केला. पण जेव्हा असह्य झालं तेव्हा मी ठरवलं. आता आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा. त्यांना अमाप खाद्य मिळायचं ते कसं आणि कुठून मिळत होतं ते आपण शोधायचंच. म्हणून मी गेली काही वर्षे ठिकठिकाणी फिरतो. खूप फिरलो, पण आजी आईने सांगितलेली एकही गोष्ट ओळखीची वाटत नाहीये. त्यांनी सांगितलेल्या खुणा शोधून शोधून थकलोय. पण त्या दिसेनाशा झाल्या. खूप थकलो आणि एका पडवीत जरा निवाऱ्याला गेलो. तिथे अंधाराचं साम्राज्य होतं म्हणून मला जरा आपलंस वाटलं. डोक्यात विचारचक्र फिरतच होतं. आणि अचानक लक्षात आलं. आई तर म्हणायची तुला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. हाच का तो संघर्ष ! तेव्हाच ट्यूब पेटली, की इथे आपल्या पूर्वजांच्या खुणा उरलेल्याच नाहीत. इथे आता आहे सिमेंटचं जंगल झालं आहे. आपला थारा नाहीच. 


हे कळत न कळत तोच कसलासा आवाज आला आणि भानावर आलो. सगळ्यांची धावपळ सुरू होती. आरडाओरडा सुरू होता. मी भांबावलो. काय करावं सुचेना. कुठे जावं, पळावं की इथेच थांबावं, चटकन निर्णय घेण्याची वेळ होती, म्हणून धाडस एकवटून बाहेर पडतो तर काय, बाबो ! किती ही गर्दी... सगळ्यांच्या हातात लाठ्या काठ्या... पुढची गर्दी पाहून मागे फिरलो. पुन्हा तिथेच लपलो. हो लपलो ! पण मारा खावा लागेल या भितीनं नाही, मरणाच्या भितीनं नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या जगाव्या या विचारापोटी, तुमचं जीवनचक्र बिघडू नये यासाठी. वनविभागाचे लोक येईपर्यंत तग धरण्याशिवाय आता पर्याय नाही हे कळून चुकलं. तास... दोन तास... चार तास... गर्दी वाढतच होती. लोक गलका करतच होते. माझं मन थाऱ्यावर नव्हतं. आईची एक एक शिकवणं आठवत होती. मनुष्य प्राणी आपल्यासाठी कधीही घातक ठरू शकतो हे तिचे शब्द आठवत होते. 


वनविभाग तुमच्या गर्दीतून मला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर पिंजरा लावला. मला हायसं वाटलं. आणि मी बेशुद्ध होण्यासाठी सामोरा गेलो. पुढे काय झालं आठवत नाही. पण जशा नुकत्याच नाशिक, पुण्यातून माझ्या कुटुंबियांच्या बातम्या कानावर आल्या त्यानुसार अंदाज बांधला की काळ्या कपड्यानं माझा पिंजरा झाकून मला गाडीतून नेलं असेल. वैद्यकीय तपासणी, मग सगळं ठाकठीक असेल तर माझी रवानगी माझ्याच घरात. अर्थात नॅशनल पार्कमध्ये. माझ्या लोकांमध्ये आल्याचा आनंद आणि पूर्वजांच्या खुणा मी जपू शकलो नाही याचं दु:खही. पण आता माझ्या हातात आहे तरी काय... मनुष्य प्राणी खूप हुशार आहे हे माहितीये.  त्याचा मेंदू विकसित आहे. त्यामुळे त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे म्हणे.  पण ही समज आता आमच्या जीवावर उठतेय त्याचं काय ? तुमचं अतिहुशार असणं माझ्यासारख्या अनेकांच्या आणि अर्थातच आपण जिच्यावर ओझं झालोय त्या पृथ्वीच्याही जीवावर उठतंय. तिलाही आता हे तुमचं अविचारी वागणं, अलिशान जगण्यासाठी सर्रास जंगलतोड करणं त्रासदायक ठरतंय. मी माझ्या कुवतीनुसार वागणार,  मला खाणं मिळालं नाही तर मी तुमच्यावर हल्ले करणार तुमच्या मुलांना खाणार. मलाही माझी पुढची पिढी हवीये, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी. मलाही मरणापेक्षा जगणं प्रिय आहे. जसं तुम्हाला जगणं प्रिय आहे, आणि त्यासाठी तुम्ही वाट्टेल ते करता. काय तर म्हणे निसर्गाच्या सानिध्यात शहरापासून जवळच १ बीएचके, २ बीएचके फ्लॅट घ्या. अशा जाहिराती कधी कधी मोठ मोठ्या बोर्डवर दिसतात.  निसर्गाचं सानिध्य! माय फूट ! अहो जिथली झाडं तिथेच जगू द्याल आणि आसपासच्या परिसराला, निसर्गाला कुठलाही धोका न पोहोचवता राहाल तर निसर्गाचं सानिध्य. नाहीतर हेच घडणार. माझं येणं तुमचं घाबरणं माझं भेदरणं तुमचं मला मोबाईलमध्ये शुट करण्यासाठी एकमेकाच्या अंगाखांद्यावर उभं राहणं, गर्दी करणं, मग माझं बेशुद्ध होणं आणि मग जंगलात येणं. 


काय हो तुम्ही 1 कोटी, 2 कोटी वृक्ष लावता. पण ती जगतायत की नाही, त्याच्याकडे कोण लक्ष देणार?  टेरस गार्डन, किचन गार्डन करता. मोठ्या मोठ्या बागा तयार करता, पण त्याने फायदा होणार आहे का? तुम्ही त्या सातासमुद्रापार जाऊन झाडं आणता आणि ती बागेत लावता. त्याने ना माझा फायदा ना तुमचा. काही दिवसांपूर्वीच पुण्याची काहीतरी बातमी होती. तिथे एका बागेत लाख लाख रुपयाचं एक झाड लावणार आहेत म्हणे. ऐकून हसावं की रडावं कळेच ना. अहो इथलीच झाडे लावा ना. वड आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे. जंगलात गेला तर तिथलीच झाडं लावा. आता उन्हाळा येतोय बीजगोळे टाका, तुमच्या मुलांनाही ते शिकवा. मग बघा निसर्ग कसा भरभरून तुमच्या पदरात दान टाकेल. चला, नव्यान सुरूवात करुया. आपण सगळे मिळून हे थांबवुया. काही लोक तसे प्रयत्न करत आहेत. त्यांना मी त्रिवार वंदन करतो. पण तुम्हीही त्यांची साथ द्याल तर त्यात आपलं सगळ्यांचं भलं. मी नाही हो तुमच्या येवढा हुश्शार पण निदान मी कुणाच्या जीवावर उठत नाही. माझ्या प्रगती का काय म्हणतात त्यासाठी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही, दुसऱ्याच्या हक्काच्या जागा बळकावत नाही. निसर्गाला गृहीत धरत नाही,  तुमच्यासारखं जातपात, धर्मपंथ करत नाही. कुठे बॉम्बस्फोट घडवत नाही. 


असो. आता माझ्या अधिवासात जातोय त्यामुळे फार बोलणार नाही, तुम्हा सर्वांना एकच कळकळीची विनंती, मला जगू द्या माझ्या हिरवाईत, माझ्या हक्काच्या जागेत. माझं जग ओरबाडू नका, त्यानं माझं नाही तुमचं नुकसान आहे. नाहीतर रोजच्या बातम्या आहेतच. झाडं नाही, पाणी नाही, बर्फ वितळला, पूर आला, उष्णता वाढली, पिकं करपली आणि अजून भयावह असं बरचं काही.