रामराजे शिंदे, प्रिन्सिपल करस्पॉन्डन्ट, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मीडिया, नवी दिल्ली


दिल्लीत सोमवारचा दिवस लक्षणिय ठरला, तो दोन घटनांमुळे... एकीकडे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तर दुसरीकडे नारायण राणे यांची 'दिल्ली'वारी... भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत नेत्यांनी अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली तर नारायण राणे यांच्या चेहऱ्यावर आपल्या पुढील राजकीय 'व्यवस्थे'ची चिंता स्पष्टपणे जाणवत होती.


'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची 'रोखठोक' मुलाखत घेतली. त्याच मुलाखतीत राणेंनी अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं. राणेंनी आपली पुढील राजकीय पावले काय असतील, हे सुद्धा स्पष्ट केलं. तेंव्हापासून नारायण राणे दिल्लीत कधी येतात? यावर सर्वांच्या नजरा रोखल्या होत्या.


गाडी राणेंची, स्टेअरिंग भाजपचं


नारायण राणे यांनी दुपारी दीड वाजता दिल्ली विमानतळावर पाय ठेवल्यानंतर पत्रकारांना चकवा देत थेट हॉटेल गाठलं. अमित शाह यांनी त्यांच्याकडून संध्याकाळपर्यंत येण्याचा संदेश गेला होता परंतु भेटीची वेळ कोणती? हे अमित शाह यांच्याकडून स्पष्ट केलं नव्हतं. राणे संध्याकाळी साडे पाच नंतर हॉटेल बाहेर पडले. त्यांनी थेट रावसाहेब दानवे यांचे ८ अशोका रोड निवासस्थान गाठले. दानवेंच्या घरी बैठक सुरू झाली. मुख्यमंत्रीसुद्धा बैठकीला उपस्थित होते. परंतु अमित शाह यांनी भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना लगोलग निघावं लागलं. दानवे यांचे निवासस्थान आणि भाजपचे मुख्यालय ११ अशोका रोड हे अगदी समोरा-समोर... दोन्ही बंगल्यांमध्ये केवळ एकच रस्ता... १० पावले ओलांडली तर भाजप मुख्यालय येतं... मुख्यमंत्री तिथेच भाजप मुख्यालयात अमित शाह यांच्यासोबत चर्चा करत होते. त्यामुळे राणे हा रस्ता ओलांडून भाजप मुख्यालयाचा रस्ता धरतात का? याकडेच लक्ष लागलं होतं... परंतु तसं घडलं नाही... बैठक झाल्यावर रावसाहेब दानवे, नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटील बाहेर पडले. चंद्रकांतदादा आणि रावसाहेब दानवे हे दोघेही राणेंच्या गाडीत बसून निघाले. राजकारणातले दादा नारायण राणे हे पुढच्या सीटवर बसले होते तर मागील सीटवर दानवे आणि चंद्रकांतदादा... गाडी राणेंची असली तरी स्टेअरिंग भाजपच्या हाती होतं. मागील सीटवर बसलेले दानवे आणि चंद्रकांतदादा हेच भाजप मार्गावरील राणेंचे मार्गदर्शक बनले होते. त्यामुळे दानवे दाखवतील त्या मार्गाने गाडी जात होती अखेर अमित शाह यांच्या घरासमोर ब्रेक लावला...


गाणं की गाऱ्हाणं...


अमित शाह भाजप मुख्यालयात बैठकीत असल्यामुळे राणे, दानवे, चंद्रकांतदादा यांना साधारण एक तास वाट पाहावी लागली. अमित शाह भाजप मुख्यालयातून निघताना पत्रकारांनी विचारलं, राणेंचं काय? त्यावर अमित शाह म्हणाले, 'गाना सुनने जा रहा हूं...' त्यांना गाणं म्हणायचं होतं की गाऱ्हाणं, हे बैठक संपल्यानंतर कळालं. इकडे दानवे, राणे, चंद्रकांतदादा यांना वाट बघून भूकही लागली होती. त्यामुळे बाहेरून जेवण मागविले. तेवढ्यात अमित शाह आले. त्यामुळे जेवणाचा आस्वाद घेता आला नाही. लगेच बैठक सुरू झाली. (या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नाहीत).


अगोदर राणेंनी हॉस्पीटलचा विषय काढला... अमित शाह यांनी हॉस्पीटलला सहकार्य करण्याचं कबूल केलं. मोदींनी हॉस्पीटलचं उदघाटन करावं, यासाठी राणेंनी विनंती केली. त्यावर 'मी प्रयत्न करतो' असं आश्वासन शाहांनी दिलं. राजकीय विषय काय निघत नव्हता. अमित शाह यांनी स्वतःहून राजकीय विषय काढला नाही. कारण स्वतः विषय काढला तर गरज असल्याचं जाणवतं. त्यामुळे बार्गेनिंग पॉवर कमी होते. अखेर न रहावता नारायण राणे यांनी राजकीय विषय काढत काँग्रेसबद्दलचं गाऱ्हाणं शाहांसमोर मांडलं. काँग्रेसने केलेल्या अन्यायाची उजळणी शाहांसमोर मांडली. शब्द देऊनही काँग्रेसनं तो पाळला नसल्याची खंतही व्यक्त केली. त्यावर अमित शाह म्हणाले, 'राणेजी मुझे काँग्रेस और आप में क्या हुआ उसमे कोई दिलचस्पी नही... लेकीन हमारे पार्टी में ऐसा नही चलता. पार्टी जो कहती है वैसे ही करना पडता है. जो पार्टी के खिलाफ जाते है हम उन्हे निकाल देतें है. कोई आए कोई जाए पार्टी को कोई फरक नही पडता. आपके विचार अलग है और हमारे विचार अलग है. आप हमारे विचार और डिसिप्लीन के साथ आते है तो देखते है... आप और एक बार सोच लो...'


अमित शाह यांनी राणेंना भाजपमध्ये कसे वागावे लागणार, याचा थेट इशाराच दिला. काँग्रेसनं ऐकून घेतलं म्हणजे भाजप ऐकून घेणार नाही, हा संकेत तर दिलाच परंतु काँग्रेसप्रमाणे भाजप कोणताही शब्द देणार नाही, हे सुद्धा यातून स्पष्ट केलं. आता तुम्ही ठरवा काय करायचे ते... अर्थात ईडीच्या चौकशीच्या फेरीतून वाचण्यासाठी योग्य तो निर्णय घेतील.


घास हिरावला?


अमित शाह यांचा धमकीवजा इशारा मिळाल्यानंतर राणे 'ओके' म्हणाले आणि बैठकीतून बाहेर निघाले. त्यांच्या पाठोपाठ लगेच रावसाहेब दानवे आणि चंद्रकांतदादा पाटील बाहेर पडले. राजकारणात ज्युनिअर असलेल्या चंद्रकांतदादा आणि दानवेंसमोर अमित शाह यांनी कडक शब्दांत पक्षाची शिस्त समजावून सांगितली, याचा राग राणेंना आला असावा. लाथ घालेल तिथे पाणी काढणाऱ्या राणेंच्या हाती या बैठकीतून काहीच लागलं नाही. रिकाम्या हातानं परतावं लागलं. निघतानासुद्धा राणे मुख्य गेटमधून बाहेर पडले नाही. त्यावेळी राणे गेले कुठे? हाच शोध सुरू होता. परंतु रात्री उशीरापर्यंत राणे कुठून गेले? हे कळालं नाही. अमित शाह यांच्या घराच्या मागच्या गेटने ते गेले असावे, असं तिथल्या सिक्युरिटी गार्डनं सांगितलं. राणेंना ओळखणारे कोणीही सांगतील की, राणे लपून छपून भेटणारे - पळ काढणारे नाहीत. मग, यावेळी राणेंवर कोणती वेळ आली? की त्यांनी निवडलेली वेळच चुकीची होती? राणे-दानवेंसाठी आणलेलं जेवणही तसंच परत गेलं. त्यामुळे राणेंच्या तोंडाशी आलेला कोणता घास हिरावला गेला? हे राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावरच कळेल.


दीड दिवसाचा गणपती नको...


मागे काही दिवसांपूर्वी म्हणजेच गणपती स्थापनेच्या वेळी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याशी राणेंसंदर्भात गप्पा मारत असताना त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला कोकणातला दीड दिवसाचा गणपती नकोय तर परमनंट गणपती हवा आहे' परंतु कोकणातील हा गणपती 'परमनंट' बसण्यासाठी तयार आहे? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'त्यांचे मागील अनुभव पाहता ते कोणत्याही घरात जास्त वेळ राहत नसल्याचं दिसतंय'. राणेंच्या पूर्वानुभवामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास भाजपचे काही नेते तयार नाहीत. जे इतर पक्षांसोबत झाले तेच भाजपसोबत झाले तर पक्षाची प्रतिमा मलिन होईल, अशी त्यांना भीती वाटतेय.


राणेंची मुले उपयुक्त की उपद्रवी?

राणेंची मुले उपयुक्त की उपद्रवी?


भाजपमधील अनेक जणांच्या तोंडून ऐकायला मिळालं की, राणेंच्या मुलांमुळे त्यांचा पक्षप्रवेश अडचणीत येईल. माजी खासदार डॉ. निलेश राणे आणि विद्यमान आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पोलीस दरबारी विविध तक्रारी आणि गुन्हे असल्याचं बोललं जातं. परंतु भाजपच्या समोर सध्या मिशन २०१९ आहे. लोकसभा आणि विधानसभेत विजयी होण्याचं ध्येय भाजपनं डोळ्यासमोर ठेवलं आहे. नोटबंदी, जीएसटी, रोजगार, कर्जमाफी अशा अनेक मुद्दयांमुळे भाजप सध्या बॅकफूटवर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एक एक आमदार भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अशावेळी राणेंची दोन्ही मुले भाजपसाठी फायदेशीर असतील. उपद्रवमूल्य असलं तरी निवडणुकीत त्यांची उपयुक्तता असल्याचं भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याचं म्हणणं आहे. त्याचबरोबर राणेंसोबत दोन-तीन आमदार आले तरी भाजपसाठी बोनस ठरणार आहे. राणेंनी बाहेरून पाठिंबा दिला तरी भाजपला फायदा होईल. भाजप पक्षाची धुरा मोदी आणि शाह या दोन गुजरातींच्या हाती असल्यामुळे नफा-तोट्याचं गणित त्यांना चांगलचं कळत असणार, यात शंका नाही.


परस्त्रीला दागिने कशाला घालता?


राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमधीलच काही आजी-माजी आमदारांनी विरोध केला. आपला विरोध थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला. राज्यातील नेतृत्व कितपत दाद देईल? याची शाश्वती नसल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी थेट दिल्ली गाठली. राणेंच्या प्रवेशबंदीसाठी दिल्लीश्वरांकडेही गळ घातली. 'तुमचा विरोध का? असं मी त्यांना विचारलं असता, त्यांचं उत्तर होतं की, 'घरातल्या बायकोला दागिने घालण्याऐवजी परस्त्रीला दागिने करण्यात काही अर्थ आहे का? तेच दागिने घरातल्या बायकोला घातले तर ती खूष होऊन संसार अधिक बळकट करेल'. म्हणजे कोकणात भाजप मजबूत करायचं असेल आणि तेथून शिवसेना, काँग्रेस नष्ट करायची असेल तर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यावी. मागील कित्येक वर्षापासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या, काठ्या खाणाऱ्या, राणेंच्या विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी. आपली होणारी कुचंबना पोटतिडकीनं हा कार्यकर्ता सांगत होता.


पुढे काय?


खरं तर २६ सप्टेंबर २०१७ हा (सोमवार) हा दिवस नारायण राणे आणि भाजप दोघांसाठीसुद्धा निराशाजनक, चिंताजनक आणि अपेक्षाभंगाचा ठरला. राणेंना अपेक्षित ते मिळालं नाही आणि भाजपला जनतेच्या अपेक्षाप्रमाणे करता आलं नाही. अमित शाह यांच्यासोबतची राणेंची बैठक कोणताही निर्णय न होता संपली. आता चेंडू राणेंच्या कोर्टात आहे. भाजपच्या शिस्तीप्रमाणे रहायचं की नवीन आघाडी स्थापन करून आणि इतर छोट्या पक्षांची मोट बांधून भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा? यापैंकी कोणता निर्णय राणे दसऱ्याच्या मुहूर्तावर घेतात, हे पाहावं लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे, राणे कोणत्या ना कोणत्या पक्षात असल्यामुळे पराभवाचं खापर त्या पक्षाच्या नेतृत्वावर फोडलं गेलं. कधी उद्धव ठाकरे तर कधी सोनिया गांधी, अहमद पटेल यांना लक्ष्य केले. मात्र, वेगळी आघाडी करण्याची तयारी राणेंनी दाखविली तर यापुढे पराभवाचं खापर इतरांनावर फोडता येणार नाही. राणेंच्याच नेतृत्वाखाली आघाडी असेल तर दोष कुणाला देणार? आता राणेंना स्वतःची ताकद दाखविण्याची संधी आहे. राणे कोणती संधी निवडतात आणि कोणती दवडतात, हे पाहावं लागेल.


नारायण राणे ज्या दिवशी दिल्लीत होते, त्याच दिवशी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरूण साधू यांचं निधन झालं. अरूण साधू यांनी लिहलेली सिंहासन कादंबरी सध्याच्या राजकीय परिस्थितीशी तंतोतंत जुळते. याच कादंबरीत त्यांचं एक वाक्य आहे की, 'राजकारणात इतरांचं हित हे स्वतःच्या हितासाठी केलं जातं'. राणेंचं भाजपमध्ये जाण्यात हित असल्याचं जाणवतं तर भाजपला राणेंचा पाठिंबा मिळण्यात हित दिसतंय. दोघंही एकमेकांचं हित पाहत असताना आपलं काय हित होईल, हेसुद्धा पाहत आहेत.


साधूंनी कादंबरीत म्हटलंय की, 'राजकारणात रोज नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि कोणत्याही महत्त्वकांक्षी माणसाला कठीण आव्हानं आली तर आनंद वाटतो'. सत्तेचं सिंहासन काबिज करण्याची राणेंची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही... त्यासाठी त्यांनी शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये असतानाही बंड पुकारलं. आता यापुढेही थेट भाजपसोबत किंवा मित्र पक्ष म्हणून जातानाही कठिण मार्गावरून चालावं लागणार आहे. राणेंचा 'सिंहासना'साठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही... तो सुरूच आहे.