प्रशांत अनासपुरे, झी 24 तास, मुंबई : बॉलिवूडचे महानायक, बॉलिवूडचे शहेनशाह, बॉलिवूडचा किंग, बॉलिवूडचा दबंग, बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट, बॉलिवूडची क्वीन, बॉलिवूडची देसी गर्ल, अशी एक ना अनेक विशेषणं देत चाहते प्रेक्षक या कलाकारांवर भरपूर अगदी ओतपोत प्रेमाचा वर्षाव करतात. हे आपलेच आहेत अशी आपलेपणाची यात भावना आसते. 'जनता हीच आपली मायबाप' असं नेहमी कलाकारही सांगतात. पण ही भावना फक्त बोलण्यापुरतीच का ? पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झालेत. त्यांच्या मदतीसाठी सगळीकडून धावाधाव सुरू असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित सुपरस्टार हिरो मदतीसाठी का पुढे आले नाहीत ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली आणि कोकणात पूराच्या हाहाकारामुळे अनेक कुटुंब उधवस्त झाली. हजारो संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता या पूरग्रस्त कुटुंबीयांना गरज आहे ती मानसिक आणि आर्थिक बळकटीची. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हजारो मदतीचे हात पूरग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी धावले आहेतच. मराठी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकार तातडीने मदतीला धावले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे अशा काही ठिकाणी मदतकेंद्रे उभी करून नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं जातंय. मराठी चित्रपट महामंडळ, नाटय परिषद यांअंतर्गत अनेक मराठी कलाकार पुढे आले. 



अनेक सर्वसामान्य लोकदेखील आपल्या पोटाला चिमटा काढून आपआपल्या परिने मदत करताना दिसतायतं. मात्र अशावेळी बॉलिवूडचे तथाकथित हीरो मात्र मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीयेत.



एरवी चमकोगिरीसाठी बडबड करणारी ही मंडळी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी का पुढे आली नाहीत? 



कोल्हापूर तर चित्रपटसृष्टीची जननी आहे आणि सांगलीची नाट्यपंढरी म्हणून ओळख आहे. दुर्दैव म्हणजे याच ठिकाणी अनेक कुटुंब उधवस्त झाली असताना पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार का पुढे आले नाहीत ?याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतंय.



या कलाकारांची संवेदनशीलता महाराष्ट्राच्या जनतेप्रती नाही का ?



ज्या महाराष्ट्रात या कलाकारांना डोक्यावर घेतलं जातं, भरभरून जीवापाड प्रेम केलं जातं त्यांची मानसिकता अशी कशी असू शकते असा प्रश्न उपस्थित झाला तर आश्चर्य वाटू नये.



ही मंडळी आर्थिक नाही तर किमान मानसिक आधार देऊ शकतात. मात्र शेवटी अशीच संकुचित मानसिकता असेल तर या हिरोंना मायबाप प्रेक्षक  वेळीच ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही हेही तितकच खरं...