मुंबई :  माणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... लोकांचा उकिरडा हे त्यांचे जीवन असते, अशा भंगार वेचणाऱ्या समाजातून एक व्यक्ती शिकतो आणि तो गोसावी समाजातील पहिला पदवीधर बनतो.  हा व्यक्ती इथेच थांबत नाही. भंगार विकत असताना तो शिक्षण घेतो आणि शिक्षक बनतो. महिलांना कुचमाल समजणाऱ्या जात पंचायतीविरोधात उभे राहून आपल्या बहिणीला डॉक्टर बनवतो अशा अशोक जाधव या अवलियाच्या जीवनावर भंगार हे पुस्तक नुकतच प्रकाशित झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 'भंगार' पुस्तकाच्या निमित्ताने झी २४ तास तुम्हांला एक समृद्ध करणारा नवा प्रकल्प सुरू करत आहे. या प्रकल्पात आम्ही नव्या कोऱ्या पुस्तकाची प्रस्तावना आणि मनोगत देत आहोत.  या माध्यमातून तुम्ही 'बुक फेस'मध्ये वाचू शकतात...  



प्रस्तावना


अशोक जाधव यांचं ‘भंगार’ हे रूढ अर्थांनी त्यांचं आत्मचरित्र आहे; पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे. पत्रा, लोखंड, बाटल्या, प्लास्टिक असं लोकांनी नको म्हणून उकिरड्यात टाकलेलं गोळा करणं, ते भंगारवाल्याला विकणं आणि त्यावर गुजराण करणारे हे लोक. या समाजाच्या स्त्रिया नि मुलं खांद्याला ‘खंदाडी’ - म्हणजे मोठी झोळी - पोतं अडकवून, कचरा-कोंडाळे उपसत विकाऊ वेचण्याचं काम करतात. मुलं भंगार वेचून शिवाय भीकही मागतात आणि पुरुष मात्र पालात दारू ढोसत शिवीगाळ करत, लोळत दिवस काढतात. भिकेतून भूक भागवायची नि भंगारातून आलेल्या पैशांतून छाटण, मस्काडं (मटण) खायचं नि दारू ढोसायची हे या पुरुषांचं काम! हे करत असताना ज्या माऊलीनं पहाटेपासून दिवस बुडेपर्यंत अंग कुजेपर्यंत कष्ट केले, तिच्याबद्दल त्यांच्या मनात सहानुभूतीचा लवलेशही नसतो. उलट, दारूचा अंमल वाढेल तसा ते त्या बापडीचा उद्धार करत राहणार नि उशिरा का आली म्हणून संशय घेत बदडणारही. अशा पालात जन्मलेला अशोक भंगार गोळा करायला, भीक मागायला जाता येता शाळा, शाळेत जाणारी मुलं पाहतो नि शाळा शिकायचं मनावर घेतो. अशोकचा शाळेला जायचा हट्ट म्हणजे त्याच्या बापाच्या दृष्टीनं पोराचं बिघडणं. ‘मे साळा शिकवारो’ (मी शाळेत शिकणार!) असं पालाआडून दबकत अशोक म्हणतो, नि लुळ्या बापाचं पित्त खवळतं नि तो बायकोवर खेकसतो, “रांडं, तुझ्यापायी पोर बिगडलंया, भंगार वेचाय, भीक मागाय तुझा बा जानार काय?’’ या कलगीतुऱ्यानं घरचा संवाद संपतो नि अशोक चोरून शाळेला जातो. त्याची निष्ठा पाहून गुरुजीच पालावर येऊन बापाला समजावतात नि मग अशोकचं शाळा शिकणं रुळावर येतं; ते पण भंगार, भीक गोळा करतच.


जात पंचायतीत ‘पंच परमेश्वर’, स्त्री कुचमाल... पण


अशा अशोकचं शिकणं. त्याचं बी.ए., बी.एड्. होणं, शिक्षक होणं, शिक्षक होऊन जळी-स्थळी विद्रोह करणं खरं वाटत नाही. गोसावी समाज परंपरेनं घेरलेला. जातपंचायत या समाजाचं सर्वोच्च न्यायालय. तेथील पंच म्हणजे ‘पंच परमेश्वर’. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द म्हणजे कायदा. जो पैसे देईल त्याच्या बाजूनं न्याय. या पंचायतीत स्त्रीची किंमत शून्य. पंचायत कुणाच्याही लग्नाची कधीही सुपारी फोडू शकते. स्त्रीवर कोणीही संशय व्यक्त करू शकतो. निवाड्यात स्त्रीस कधीच विचारलं जात नाही. तक्रार आली, की ती खरीच समजली जाते. स्त्री म्हणजे पापी हे गृहीतच. नवरा मनाला येईल तेव्हा स्त्रीला सोडचिठ्ठी देणार. जातपंचायत आपल्या मर्जीनं तिचा ‘धारूच्यो’ करणार. म्हणजे दंड भरून घेऊन दुसऱ्या पुरुषाच्या स्वाधीन करणार. इतकंच नव्हे, तर जातपंचायतीच्या मनात आलं, की ती ईर्ष्येवर कोणत्याही स्त्रीस ‘उभायत’ ठरवू शकते. स्त्री ‘उभायत’ ठरली, की तिला आयुष्यभर कुणीही नांदवून घेत नाही. ती विवाहित राहते. गळ्यात मंगळसूत्र असतं, पण तिला नवऱ्याच्या घरी नांदता येत नाही. ती आकर्षक दिसू नये, तिच्याकडे कुणाची नजर जाऊ नये, म्हणून तिनं दातवण लावून दात मुद्दामहून काळे करून घ्यायचे, या नि अशा अनेक डागण्या देणारा हा समाज. 



गोसावी समाजातील पहिले पदवीधर...बहिणीला केले डॉक्टर...


त्या समाजाच्या जातपंचायतीच्या विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात, ते स्वत:च्या लग्नापासून. आपल्या मर्जीनं नि आपल्या शर्तीवर लग्न करून दाखवून जातपंचायतीची मिरासदारी मोडीत काढतात. गोसावी समाजात शिक्षणास विरोध. त्यात मुलीचं शिक्षण म्हणजे मृगजळच. पण अशोक जाधव गोसावी समाजाचे आपल्या भागातील पहिले पदवीधर. आपल्या बहिणीलाही ते पहिली डॉक्टर बनवतात. अशोक जाधवांचा पुरुषार्थ इथं संपत नाही. खरं तर इथं तो सुरू होतो, असं म्हणायला हवं. ते आपल्या गोसावी समाजबांधवांचं संघटन करतात. नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून आपल्या समाजाचं अस्तित्व, महत्त्व राजकीय पटलावर नोंदवतात. समाजाची पतसंस्था काढतात. भंगाराची खंदाडी जाते नि टेंपो येतो.


'भंगार' एक चित्रपट.. 


‘भंगार’ वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढे झरझर सरकत राहतो. त्या अर्थाने ‘भंगार’ आत्मचरित्र हे समांतर विकसित होत समाजचित्र जिवंत करतं.


चित्रपटाचा कॅमेरा दृश्याचा फोकस नि फ्रेम ठरवत असतो. ती दृष्टी असते दिग्दर्शकाची नि त्या छायाचित्रकाराची, कॅमेरामनची. ‘भंगार’ आत्मचरित्राचा फोकस अशोक जाधव यांचं व्यक्तिगत जीवन, चरित्र, चारित्र्य नाही. फ्रेम आहे गोसावी समाजाचं जिणं नि जगणं. पण अशोक जाधवांनी आपल्या या आत्मचरित्रात फ्रेमलाच फोकस केल्याने त्यांचं जीवन गौण होऊन जातं. ही त्यांची स्वेच्छा पसंती नसते. एखाद्या कार्यकर्त्यास समाज बदलाचा एकदा का घोर लागला, की मग तो स्वत: विसर्जित होतो. 


 भीषणता तुम्हास केवळ अस्वस्थ करते...


‘स्व’ऐवजी ‘पर’चा वेध, समष्टीचा गोफ विणण्याचं कार्यकर्त्याचं वेड त्याचं जीवन व चरित्र सामूहिक, सामुदायिक आणि सामाजिक करून टाकतं. त्या अर्थांनी ‘भंगार’ हा दलित, वंचित साहित्यप्रवाहातील लेखनाचा व्यवच्छेदक प्रयोग होय. ही कलाकुसर अशोक जाधव यांनी केली नसून, ती झाली आहे. त्यामुळे या आत्मकथनात सर्वत्र एक प्रकारची प्रांजळता पसरलेली वाचकांना अनुभवायला मिळते. सुखवस्तु समाजाला स्वत:च्या आत्मरत जीवनातून जागं करण्याची विलक्षण ताकद ‘भंगार’मधील भीषण वास्तवात भरलेली आहे. ती भीषणता तुम्हास केवळ अस्वस्थ करत नाही तर अंतर्मुख करून या वंचित समाजाप्रती काही करण्याची कार्यप्रेरणा देते. ती प्रेरणा हेच या आत्मकथनाचं यश होय.


‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र 


मराठी साहित्यात यापूर्वी ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘कोल्हाट्याचं पोर’, ‘अक्करमाशी’ अशी अनेक आत्मचरित्रं आली. त्यांनी आपापल्यापरीने डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी अशा समाजांच्या व्यथा वेशीवर टांगल्या आहेत. ‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं. मुलांचं जन्मत: नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार’ वाचकाला गोसावी समाजाचं भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं.


गोसावी समाजाची स्वत:ची अशी भाषा, अनेक भाषांचा संकर...


गोसावी समाजाची स्वत:ची अशी भाषा, बोली आहे. ती कुठल्याच मान्य सूची व सर्वेक्षणात नोंदलेली नाही. ती हिंदी, मराठी, मारवाडी, राजस्थानी, गुजराती, असा साऱ्यांचा मेळ घेत स्वत:चं स्वतंत्र रूप, शब्दकळा घेऊन येते. थारो, मारो, खादो अशी ओकारान्त क्रियेची ही बोली. शिव्या आणि शाप, शौर्य आणि क्रौर्य, परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्या परिघातलं हे जीवन मात्र संभावित, संभ्रांत समाजपरिघाबाहेरचं, गावकुसाबाहेरचं, गावापलीकडचं. गोसाव्यांची वस्ती म्हणजे पोलिसांसाठी हक्काचे संशयित गुन्हेगार मिळण्याचं ठिकाण. मानव-अधिकारांचा मागमूस नसलेलं हे जग जातपंचायतीच्या वात्याचक्रात (वादळात) सतत भरडलं जाणारं. ‘भंगार’ आत्मचरित्र जातपंचायतीविरोधी ‘लढा’ होय. ते जातपंचायतीच्या आणि खरं तर, जातव्यवस्थेच्या समूळ उच्चाटनाची मागणी करतं. त्या अर्थाने सामाजिक न्यायाच्या संदर्भात ‘भंगार’ हा वंचितांचा टाहो आहे. जानू, होबडी, मोरनी, बायना, भरत्या, सांबा, केऱ्या आळंद्या, बारीबुढा ही सारी पात्रं नावानं नवी, तसंच त्यांच्या ओळखीही नव्या. खंडोबा, सितला, मरीआई, लक्ष्मी यांची भक्ती करत रंगीबिरंगी झेंडे उभे करत वस्ती दर वस्ती नवं जीवन सुरू करणारं हे जग रोज नवा प्रपंच मांडतं. त्या अर्थानं यांचं जीवन खरच विंचवाच्या पाठीवरचं बिर्हाड होऊन जातं.


माणसास कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था


‘भंगार’ आत्मचरित्र अनेक प्रश्न उभे करतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत अशोक जाधवांनी स्वत:चा घेतलेला शोध, स्वत: शोधले-मळलेली वाट हे सारं वाचत असताना प्रश्न पडतो की अनुवंश, परिस्थिती या गोष्टी मोठ्या, की माणसास लागलेला अंतरीचा शोध? विकास नावाची गोष्ट भौतिक समृध्दीतून येते की आत्मविकासाच्या ध्यासातून? स्त्री-पुरुष भेदाचे नष्टचर्य संपून स्त्री माणूस केव्हा होणार? माणसास कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... तिथे कल्याणकारी, विकासगामी नियोजन असते का? मानवाधिकार, समानता, माणुसकी या गोष्टी इतर तुलनेने प्रगत समाजांच्या नजरेत ‘माणूस’ नसलेल्या समाजास, वर्गास - मग ते दलित, वंचित, अनाथ, उपेक्षित कोणीही असो - केव्हा मिळणार? जातपंचायत नि जातव्यवस्था आपणांस त्यांचं खरंच समूळ उच्चाटन करायचं आहे का? या नि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करणारं हे आत्मकथन म्हणजे दलित, वंचितांनी प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेला जाबच आहे.


अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं, लेखनात जी प्रगल्भता दाखवली, ती पाहिली की वाटतं, संस्कार, वळण सारं व्यर्थ. श्रेष्ठ तो स्वत:चा विवेकी शोध नि समाजाचा पुनर्शोध! या सर्वांबद्दल त्यांचे मन:पूर्वक कौतुक नि अभिनंदन! मराठी वाचक ‘भंगार’ वाचतील तर त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत. ती ऊर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे; ती उद्या कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही.


 


- डॉ. सुनीलकुमार लवटे



मनोगत


लोकांचा उकिरडा ज्याचे जीवन तो बनला शिक्षक


मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकिरडा हेच जीवन होतं. मी उकिरड्याशेजारीच जन्मलो, तिथंच वाढलो, त्यातलं उष्टं, शिळं, इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत, भंगार गोळा करून, ते विकून त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही गोळा करत शिकत गेलो. ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच. अंधश्रद्धा, रूढी-परंपरांशी, जातपंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहोचलो. मी गोसावी समाजातला पहिला शिक्षक.


भंगारवाले देशाचे स्वच्छता रक्षक 


मला नेहमी वाटतं, की भंगार गोळा करणारे हे खरे तर देशाचे खरे स्वच्छता रक्षक; पण आजही त्यांच्या वाट्याला अस्वच्छ, घाणीने बरबटलेलं, असाध्य रोगांनी पिंजारलेलं जीवनच आहे. अशाही परिस्थितीवर मात करत मी आज इथवर आलो. मी शिकलो. शिक्षक झालो. पण इतरांचं काय? आजही अशी लाखो मुलं अशा घाणीत आपलं आकाश शोधत आहेत... त्यांना त्यांचं आकाश मिळेल का? मी त्यांच्यासाठी आणखी काय करू शकतो? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करतो...


भंगारकाम करणाऱ्या, गोसावी समाजाची चित्तरकथा


हे पुस्तक म्हणजे भंगारकाम करणाऱ्या, गोसावी समाजाची चित्तरकथा आहे. ती वाचून माझ्या समाजातील मुलांनी तर पुढे जावंच; पण स्वच्छ, टापटिपीतल्या समाजानंही त्याचा विचार करावा, हा ह्या पुस्तकामागचा उद्देश आहे. अनेक शाळा-कॉलेजांमधून बोलण्यासाठी मला निमंत्रणं येतात. मुलांना तुमच्या जीवनातून वास्तव जग कळू दे म्हणून. मलाही बरं वाटतं- जेव्हा मुलं ती कथा ऐकतात व त्यातून प्रेरणा घेतात.


हे झाले शक्य... 


“हे सर्व तुम्ही लिहून काढा, त्याचे पुस्तकात रूपांतर झाले तर मोठ्या समुदायाला त्यातून प्रेरणा मिळेल.’’ डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या अशा सततच्या आग्रहामुळे मी हे लेखन केलं. बाबा आमटे यांचे शब्दही मला या लेखनास उद्युक्त होण्यासाठी प्रेरक ठरलेय आणि आता मनोविकास प्रकाशनामुळं हे पुस्तक वाचकांसमोर येत आहे. त्यासाठी मी अरविंद पाटकर व त्यांचा सर्व सहकारीवर्ग यांचा अतिशय ऋणी आहे.


 


यांचा मी ऋणी...


या कार्यात मला अनेकांनी वेळोवेळी सहकार्य केले. माझे काका नीळकंठ गोसावी (केर्या काका), काकी मंगल गोसावी, डॉ. श्रीकांत पडीयार, चंदू पडीयार, डॉ. सुनील माळी, बजरंग चव्हाण, प्रा. शिवाजी पडीयार, सौ. गीताताई सदानंद पाटील, मा. भिकुशेट पाटील, अॅड. असिम सरोदे, श्री. एस. एस. चिखलकर, अॅड. विजय जाधव, श्री. काळुराम गोसावी, श्री. सदाशिव शटकेसर, अवनिच्या अनुराधा भोसले, श्री. एस. एस. पाटील, मा. माजी आमदार गोविंदराव कलिकते, मा. दीपकराव कलिकते, मा. संजयसिंह कलिकते, मुख्याध्यापक अंकुश कवडेसर, मा. दिलीप चौगुले, मा. तानाजी पाटील (कृषि अधिकारी), आर. एस. बरगे, श्री. आर.पी जाधव, श्री. बी. एच. वरूटे, श्री. संभाजी कुंभार, श्री. डी. बी. साळुंखे, श्री. एस. एस. पवार, श्री. शंकर तेली (सर), माझे वडील श्री. सखाराम जाधव, आई शांताबाई जाधव, पत्नी सौ. संगीता, मुले आकाश व विजय (निखिल), भाऊ कुमार व शेलारमामा, तसेच भावाप्रमाणे माझ्या पाठीशी सतत उभे राहणारे माझे मित्र मुख्याध्यापक श्रीधर कुंडले सर, त्यांच्या पत्नी स्नेहा कुंडले वहिनी, सुरेश चव्हाण, शांताराम कांबळे, भोजराज जाधव, साडू लक्ष्मण व सौ. रुपाली तसेच सासरे धनपाल गोसावी, सासू सुशीला गोसावी, श्री. सावकार गोसावी, श्री. केशव गोसावी, श्री. परशराम जाधव, श्री. भीमराव गोसावी, मेव्हणे अमर, अनिल व प्रकाश, तसेच माझ्या पुस्तकाचे संपादन करणारे आदरणीय सौ. सुषमा शितोळे मॅडम आणि माझ्या लेखनास प्रोत्साहन देणारे मा.श्री. शिरीष शितोळे सर या सर्वांचा मी सदैव ऋणी आहे.


- अशोक जाधव