कैलास पुरी, पिंपरी चिंचवड  : कोरोना आला आणि सर्वांच्याच सहनशीलतेची कसोटी लागली. त्यात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्या बरोबर कसब लागले ते पत्रकारांचे, खास करून इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या...नाही म्हटले तरी त्यांना किमान ज्या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण आहेत त्याच्या जवळ जावे लागते. परत नागरिकांनी मंडईत कशी गर्दी केली हे सांगायला गर्दीतच जावे लागते. हे करताना पत्रकार सर्वोतोपरी काळजी घेतो आहे परंतू त्याला धोका टळलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात हे मला सांगण्याचे कारण म्हणजे नुकताच माझ्या बाबतीत घडलेली घटना...! कोरोनाच्या संकटात पिंपरी चिंचवड मधले काही हौशी नगरसेवक औषध फवारणीचे व्हिडिओ टिक टॉक वर टाकत होते. साहजिकच नगरसेवकांची चमकोगिरी ही बातमी मी केली... ही बातमी अनेकांपर्यंत पोहचावी म्हणून मी ती अनेक व्हाट्सएपच्या ग्रुपवर ती टाकली. 


एका ग्रुप मधले वयाचे कवच लाभलेले आणि तथाकथिक बुद्धिवादी लेखणी बहाद्दराने नगरसेवक किती चांगले काम करतात हे सांगितले. इथपर्यंत ठीक होते पण पत्रकारिता कशी बोगस आहे हे ही लिहले. अर्थात मला संताप आला आणि मला जे बोलायचे होते ते मी बोललो...! 


या घटनेनंतर विचार आला, मुंबई मधले, पुण्यातले जवळपास सर्वच ठिकाणचे अनेक पत्रकार किती तरी धैर्याने आणि कष्टाने रिपोर्टिंग करतायेत. त्यांना काही अडचणी नसतील का...? त्यांना ही कुटुंब आहेत, त्यांना संसर्ग व्हायची भीती नाही का...? 


एवढे करून ते बातमी करतायेत आणि टाकतायेत, पण तरी ही त्यांना या परिस्थितीत काही महाभागांच्या टीकेला समारे जावे लागत आहे. 
आता माझेच सांगायचे झाले तर मी बाहेर जातो म्हणून 20 तारखेला माझी बायको आणि मुलाला तीच्या माहेरी पाठवून दिले..! 


आता विचार करा लोकडाऊन मुळे अनेकांना जेवण मिळत नाही ही बातमी करताना माझे किती जेवणाचे हाल होतायत हे मी कुणाला सांगणार. बर ही माझ्या एकट्याची स्तिथी असेल असे नाही अनेक पत्रकाराना याचा सामना करावा लागत आहे.
 
एकीकडे हा काहीसा संघर्षाचा काळ असताना दुसरीकडे अत्यंत आनंद देणाऱ्या गोष्टी ही आहेत. त्यातलीच महत्वाची गोष्ट म्हणजे मित्र..! मी एकटा आहे याची जाणीव असल्याने माझ्याच वासहतीतल्या काही मित्रांनी माझी जी काळजी घेतलीय ते शब्दात सांगणे कठीण आहे..! 


वसाहतीतला मित्र परिवार मोजकाच असला तरी तो किती जिवाभावाचा आहे हे या काळात समजले...! सुरवातच करायची झाली तर अनिल भामरे यांच्या पासून... टाटा ग्रीन बॅटरीजचे मार्केटिंग व्ही पी एवढ्या मोठ्या पदावर असलेला हा व्यक्ती दररोज न चुकता मला फोन करतो. 


जेवणाची सोय झाली का विचारतो, त्यांच्या पत्नी करिष्मा या ही कसलेही आढे वेढे न घेता डबा पाठवतात. अनिल सरांप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे किरण इंदलकर आणि त्यांच्या पत्नी सारिका.. कोणताही वेगळा पदार्थ केला की घरी पाठवून देतात..! सकाळचा नाष्टा तर न चुकता त्यांच्याकडे होतो. 


आय टी कंपनीत मोठ्या पदावर असलेले युवराज चौधरी आणि त्यांच्या पत्नी रुपाली हे तर हक्काने सांगतात आज आमच्या कडचे जेवण..! त्यामुळे चंद्रपूर भागातली चव ही चाखायला मिळते. पिरामल ग्रुप मध्ये असलेल्या परीक्षित पाध्ये आणि ऋचा यांच्या मुळे तर थेट इंदोरची चव चाखता येतेय...! 


साहिल वर्मा आणि आरती यांच्या कडून ही बिहारी पद्धतीचे जेवण अधून मधून मिळत आहे..! पालिकेतले ज्युनिअर इंजिनिअर मित्र संजय बंडगर आणि रेश्मा यांनी ही मला सोलापूर जेवणाची आठवण करून दिली..! एकंदरीतच काय तर पत्नी नसताना आणि सुरुवातीला हॉटेल बंद असताना या मित्रांनी केवळ जेवण दिले असे नाही तर एकटेपणाची जाणीव होणार नाही याची काळजी घेतली ते घेताहेत..! 


हे लिहण्याचा उद्देश त्यांचे आभार मानणे एवढा नाही. तर तुमच्या आसपास ही कुणी एकटा असेल तर तुम्ही त्याची काळजी घ्या मदत करा. कोरोना चे संकट मोठे आहे. त्याचा मुकाबला करताना घरात बसणे हे अपरिहार्य आहे. पण त्याच वेळी किमान आपल्या वासहतीतले, चाळीतले आसपासचे कोणी एकटे नाही ना याची काळजी घ्या.. तुमची थोडीशी विचारपूस चार शब्द एखाद्याचा एकटेपणा दूर करू शकतील हे मात्र नक्की...!