मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : खेळ किंवा क्रीडा अर्थातच इंग्रजीत स्पोर्ट्स....जो युरोपियन आणि आफ्रिकनं देशांचा श्वास म्हणजेच ऑक्सिजन आहे. स्पोर्ट्स हा त्यांच्यासाठी जणूकाही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. स्पोर्ट्स ही त्यांची जीवनशैली आहे. स्पोर्ट्वर काही देशांची काही प्रमाणात अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. स्पोर्ट्सवर भरभरून प्रेम करणारे असे ते देश आणि नागरिक आहेत. स्पोर्ट्स ही त्यांच्या देशाची संस्कृती आहे. या स्पोर्ट्लाही आता कोरोनामुळे ब्रेक लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या खेळाडूंसाठी मैदानाचं ही त्यांची कर्मभूमी आणि एकप्रकारे घरं असतं ते सारे खेळाडू आता घराच्या खुराड्यांमध्ये बंदिस्त झाले आहेत. जवळपास प्रत्येक खेळाडूला आता प्रॅक्टीसच करता येत नाहीय. काही मोठे खेळाडू घरातील जिममध्ये व्यायाम करतात आणि योगा-ध्यानधारणा करतात. मात्र प्रत्यक्षात मैदानावर जाऊन त्यांना सराव करता येत नाहीय.


फुटबॉल, क्रिकेटसारखे टीम गेम्सचा सराव तर बऱ्याचदा इतर अनेक खेळाडूंबरोबरच करावा लागतो. मात्र आता या साऱ्या खेळाडूंवर गपगुमान घरात बसल्याशिवाय पर्याय नाही. ऑलिम्पिकसारखी जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित स्पर्धाही पुढे ढकलली गेली आहे. एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. 


काही खेळाडूंच्या करियरलाच आता कोरोनामुळे ग्रहण लागण्याची चिन्ह आहेत. कारण वयामुळे हे त्यांच्या करियरमधील अखेरच ऑलिम्पिक कदाचित ठरलं असतं. पुन्हा परफॉर्मन्स दाखवायचा आणि ऑलिम्पिकचं स्थान निश्चित करायचं हे खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर पुन्हा उभं राहिलं. सध्याच्या काळत प्रत्येक खेळाडूसमोर स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. 


क्रीडा जगताला आर्थिक फटका तर बसणारच आहे. याचबरोबर जभरातील स्पोर्ट्स टूर्नामेंट्सच वेळापत्रकच यामुळे कोलमडून पडलंय. युरो कपसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. फुटबॉलमध्ये इटली, फ्रान्स, जर्मनीसारखे देश दादा आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांच्यासमोर आता आपलं वर्चस्व कायम राखण्याचं आव्हान असेल. 


ऑलिम्पिकमध्ये चीनसारखा देश मेडल्स टॅलीमध्ये टॉप देशांमध्ये असतो. त्यांच्यासमोर कदाचित आता आपलं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान असेल. जशी अर्थव्यवस्थेची अपरिमित हानी होत आहे. तशीच कोरोनामुळे स्पोर्ट्सचीही अपिरिमित हानी होत आहे. 


जो स्पोर्ट्स साऱ्या जगाला मित्रत्वाचा आणि एकतेचा संदेश देतो. जो स्पोर्ट्स साऱ्यांना तंदुरुस्त राहण्याचा संदेश देतो. जो स्पोर्ट्स आपलं जीवन अधिक समृद्ध करतो. त्या स्पोर्ट्स जगतावरही कोरोनामुळे निराशेचे मळभ जमा झाले आहेत. कला आणि क्रीडा या मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या दोन बाबी आहेत. त्यांना धक्का बसला म्हणेज मानवी जीवनाची पुन्हा शून्यातून सुरुवात असंच काहीसं म्हणावं लागेल !