कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : कधीकाळी पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची सूत्रे हलत असलेल्या लांडेवाडीतल्या महालात पराभूत राजे विलास शेठ एकटेच बसले होते. दिल्लीसाठी होत असलेल्या लोकसभारुपी रणसंग्रामात कोण कोण उतरणार यांच्या बातम्या विविध माध्यमातून त्यांच्या कानी पडत होत्या आणि राजे विलास शेठ आणखीच अस्वस्थ होत होते....!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ ऑक्टोबर २०१४ चा काळा दिवस त्यांच्या डोळ्यासमोरून जात होता...! राज्यरूपी विधानसभा रणसंग्रामात आपल्याच राजकीय आखाड्यात तयार झालेल्या राजे राम अर्थात महेशने आपल्याला कसे चारीमुंड्या चीत केले आणि कधी काळी भोसरीचे शरद पवार ही आपली असलेली ओळख कशी पुसली गेली. हे आठवताना त्यांचा संताप अनावर होत होता...!  


पराभूत झाल्यापासून भोसरी नगरीच्या कोणत्याही चौकात गेले, तर कधी कोणाच्या दुकानाच्या उदघाटनासाठी तर कधी हॉटेलच्या उदघाटनासाठी नाहीच काही, तर स्वतः च्या वाढदिवसाचे निमित्त करून महेशने आपली हसरी छबी कशी चौकाचौकातल्या फ्लेक्सवर झळकवली हे आठवताना ही शेठ विलास आणखीच अस्वस्थ होत होते...! 


विद्यमान राजे महेशकडून पराभव स्वीकारल्यापासून, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपण काय काय केले, याचा विचार ही विलाससशेठ करत होते...! महापालिका निवडणुकांपूर्वी विधान परिषदरुपी लढाईत आपण बंडखोरी केली खरी...! मित्र भाऊ लक्ष्मणाने ही साथ द्यायची भूमिका घेतली, साथीला भाई आझम होताच....पण जाणते राजे आणि दादा यांनी आदेश दिल्याने तलवार कशी म्यान करावी लागली आणि बंडखोरी कशी औटघटकेची ठरली,  पुन्हा कसे आपण अज्ञात वासात गेलो हे आठवल्याने तर शेठ आणखी कासावीस झाले...! 


महापालिका निवडणूकीच्या काळात भाऊ लक्ष्मण याने कमळ प्रांतात घेण्यासाठी किती तरी प्रयत्न केला पण विद्यमान राजा महेशने त्यात ही खोडा घातला. 


रात्री एका पंचतारांकीत हॉटेलात झालेल्या त्या बैठकीचे चित्र शेठ यांच्या डोळ्यासमोरून गेले...! महापालिका युद्धात मग पुन्हा आपण घड्याळ प्रांताकडून मैदानात उतरलो, पण सगळी शक्ती युवराज विक्रांतला विजयी करण्यात खर्ची झाली...! आणि पुन्हा आपण शून्यात गेलो, हा विचार शेठला अस्वस्थ करू लागला. पराभवानंतरचा सगळा प्रवास डोळ्यासमोरून जात असताना अचानक शेठ विलासचे डोळे चमकले आणि निर्धाराने शेठ उठले....!


अरे पराभव झाला म्हणजे काय, परत जिंकणार नाही असे थोडेच आहे....किती जणांना तर आपण यापूर्वी धूळ चारली....! असेल महेशकडे चाणक्यांची फौज.....! लागले असतील वाढदिवसानिमित्त त्याचे चौका चौकात हसऱ्या छबीचे फ्लेक्स....! मग काय आपण काहीच करायचे नाही का....! हा विचार शेठ विलासच्या मनात आला आणि त्यांना काहीसे बरे वाटू लागले...आता बस....! लोकसभा काय किंवा विधानसभा काय दोन्ही रणसंग्राम काही महिन्यांवर येऊन ठेपलेत....! 


आता स्वस्थ बसून चालणार नाही....! पिंपरी चिंचवडचे शरद पवार ही ओळख उगीच नव्हती... त्या ओळखीची आठवण काही जणांना पुन्हा करून दिल्याखेरीज गत्यंतर नाही...! सुरुवात वेगवेगळ्या रणसंग्रामात आपल्या विरोधकांना एकत्र करूनच असा विचार शेठ ने केला आणि तडक स्वारी गेली ती दिलीप मोहिते पाटील भेटीला...! भेट घेऊन समाधानाने शेठ लांडेवाडीतल्या महालात परतले...! तेवढ्यात एक विश्वासू आला आणि म्हणाला विलास शेठ या वेळी निवडणूक लढणार का....? प्रश्न ऐकून शेठ विलास हसले आणि म्हणाले ........"म्हणजे काय.....?"  


(ता.क - शिरूर लोकसभा मतदारसंघा पुरता हा लेख आहे. या भागातील अनेकांना ही पात्रे सहज लक्षात येतील...! इतर भागातल्या वाचकांनी त्या त्या भागात कधी काळी ताकतवान असलेल्या पण पराभवामुळे मागे पडलेल्या नेत्यांचे चित्रसमोर ठेवावे...! राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीवर आधारित...)