पिंपरी चिंचवड : आणि खरी कमळे हिरमुसली....
गेले कित्येक दिवस रात्र आणि दिवस एक केलेले भोसरीचे राजे महेश अर्थात रामाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान होते.
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : गेले कित्येक दिवस रात्र आणि दिवस एक केलेले भोसरीचे राजे महेश अर्थात रामाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान होते. केलेल्या कष्टाचे चीज झाले. पिंपरी चिंचवड परगण्याचे महापौर पद अखेर स्वतःचे शिलेदार असलेल्या "राहुल" ला मिळाल्याचे आत्मिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. चाणक्य कार्तिक चा आनंद तर काय वर्णावा.
कोणाच्या ही पाया पडत समोरच्याला नामोहरम करण्याची अद्भूत कला अवगत असलेल्या चाणक्य कार्तिकला ही पाया पडून कंबर दुखल्याच्या कळांचा विसर पडला होता....!
आहो गोष्टच तेवढी महत्वाची होती...! जाणते राजे आणि त्यांच्या पुतण्याच्या हातून पिंपरी चिंचवड परगणा हस्तगत करण्यासाठी महेश अर्थात राजे राम आणि चाणक्य कार्तिक ने जंग जंग पछाडले. आता भोसरीला सुगीचे दिवस येतील ही आशा मनात बळावली होती...!
सुरुवातीला "नितीन" रुपी शिलेदाराला परगण्याचे महापौर पद मिळाल्याने तसा विश्वास ही वाढला होता...! त्याच वेळी चिंचवड चे राजे लक्ष्मण अर्थात शंकराने नगरीचे स्थायी अर्थमंत्री पद स्वतः च्या शिलेदाराकडे देत परगण्याची आर्थिक नाडी ताब्यात ठेवली...!
महापौर पदाला मान असला तरी प्रगती साधायची असेल तर परगण्याचे "स्थायी" अर्थमंत्री पद महत्वाचे असल्याचे राजे महेश अर्थात राम यांच्या लक्षात यायला जरा वेळ लागला...! म्हणून वर्षभरानंतर महापौर पद लक्ष्मण अर्थात शंकर राजाकडे गेले तरी स्थायी अर्थमंत्री पद घ्यायचा मनसुबा राजा महेश अर्थात रामाने आखला...!
पण डावपेचात माहीर असलेल्या आणि "स्थायी" अर्थमंत्री किती महत्वाचे आहे याची पुरती कल्पना असलेल्या राजे लक्ष्मण अर्थात शंकराने ममता रुपी विनायकाला त्या पदी बसवत रामाचे मनसुबे उधळून लावले...! हा पराभव वर्मी लागलेल्या रामाने आता परगण्याचे महापौर पद तरी आपल्याच शिलेदाराकडे राहावे या इराद्याने लढाईत उतरण्याचे ठरवले...!
ज्या दिवशी निवड होणार होती त्या दिवशी स्वतः राजा राम राजे लक्ष्मण अर्थात रामाच्या चंद्ररंग महालात गेला... सोबतीला चाणक्य प्रसाद होताच... हा चाणक्य तर निवड होई पर्यंत महालात थांबला होता... अखेर या शिष्टाईचे फळ मिळाले आणि राहुल रुपी शिलेदार महापौर पदी विराजमान झाल्याचा आनंद चाणक्यासह राजांना ही झाला...!
एकीकडे राजे महेश अर्थात राम आनंदात असताना राजे लक्ष्मण अर्थात शंकराला ही विशेष दु:ख झाले नव्हते....पण आपण आनंदी आहोत हे ही शंकराला दाखवयाचे नव्हते..मुळात शिलेदाराला मी तुझ्यासाठी खूप करतोय हा आभास निर्माण करण्यात आणि आपल्याला हवी तशी परिस्तिथी निर्माण करण्यात या वेळी ही शंकर यशस्वी झाला होता.
परगण्याचे स्थायी अर्थमंत्री पद दुसऱ्यांदा स्वतःच्या शिलेदाराला दिल्यानंतर परगण्याचे महापौरपद मिळवणे अशक्य नसले तरी अवघड असल्याचे शंकरच काय परंतू कोणाच्या ही लक्षात आले असते. तरी ही निष्ठावान तरीही "काटे"री वाटेवरून चालणाऱ्या बापूची नाराजगी नको म्हणून किंवा त्याचा हट्ट पुरा करण्याचा प्रयत्न किंवा आभास शंकराने केला. बापूने ही काही निवडक शिलेदारांना सम्राट देवेंद्रांकडे पाठवत पद मिळवण्याचा प्रयत्न केला.
अर्थात अशी शिष्टमंडळ पाठवून पदे मिळत नसतात हे शंकराला पुरते माहीत होते. असे असले तरी त्यांनी त्याला विरोध केला नाही. दुसरीकडे शंकर आपल्यामागे पूर्ण ताकतीने उभे असल्याचे वाटू लागल्याने बापू "महापौर" होणार अशी आशा बाळगून होता..पण अखेर चारच्या सुमाराला राजे राम यांच्या शिलेदार "राहुल" च्या नावाचा खलिता आला आणि बापूचे स्वप्न भंग पावले...पण राजकारणाची पुरती जाण असलेल्या राजे लक्ष्मण अर्थात शंकराने या पराभवातच आपली "जीत" असल्याचे पक्के हेरले आणि सुस्कारा सोडला...!
या सर्व घडामोडीत सत्ताधारी पक्षातील जुनी पण खरी कमळे मात्र एका कोपऱ्यात हिरमुसून गेली होती.. राजे राम अर्थात महेश आणि राजे लक्ष्मण अर्थात शंकर विरोधी पक्षात अर्थात पुतण्याच्या राष्ट्रवादी गोटात असताना आपण शहरात कमळाचे अस्तित्व ठेवले. दोघे 'कमळ' रुपी पक्षात आल्यापासून जुने असताना ही त्यांच्या कलाने घेतले.. गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण उजाडला.
पुतण्याचे साम्राज्य खालसा झाले..अर्थात त्यात राम आणि शंकराचा मोठा वाटा होता हे सगळ्यांना मान्य होते.. परंतू किमान मान सन्मान मिळेल केलेल्या कष्टाचे चीज होईल असे वाटले..किमान पदे वाटपात सन्मान मिळेल अशी आशा ही जुनी कमळे बाळगून होती. परंतू जेव्हाही पदे वाटण्याची वेळ आली तेंव्हा राजे राम आणि राजे शंकर यांचे शिलेदार अशीच विभागणी झाली.
नाही म्हणायला 'एकनाथ' रुपी जुने कमळ अस्तित्व टिकून राहिले पण बहुतांश मूळ कमळे कायम बाजूला पडली. या पारगण्यावर लक्ष ठेवणाऱ्या सम्राटांना ही त्याचे काही सोयर सुतक नसल्याचे या जुन्या कमळांना तिसऱ्यांदा लक्षात आले. राजे राम आणि राजे शंकर दोघात वाद असल्याचा आभास निर्माण करून प्रत्येक वेळी त्यांना हवे तसे करून घेतात असा विचार त्यांच्या मनाला शिवून गेला आणि ही जुनी पण खरी कमळे पुन्हा एकदा हिरमुसली.....!
(पिंपरी चिंचवड मध्ये नुकतीच महापौर पद आणि उपमहापौर पदासाठी पक्षाकडून नावे देण्यात आली. त्यावर आधारित हा काल्पनिक सोहळा...अर्थात शहर कोणते ही असो मूळ भाजप नेत्यांची थोड्या अधिक फरकाने हीच अवस्था असल्याचे अनेकांचे मत आहे. किमान पिंपरी चिंचवड मधल्या तरी... ज्याला जसा हवा तसा अर्थ काढावा...)