विठोबा सावंत, झी मीडिया, मुंबई : आज सकाळी धारावीतील दृश्य पाहिलं. लॉकडाऊन असताना लोक मुक्तपणे रस्त्यावर होते. रस्यावर भाजीची दुकानं थाटलेली. अगदी छोटी मुलंही काही ना काही खरेदीसाठी बाहेर आलेली दिसत होती. काहींच्या तोंडावर मास्कही नव्हता. धारावीत कोरोनाने चार बळी गेलेत. अनेक जण बाधित आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतलं दृश्य पाहिलं तर कोरोना आपल्या गावीही नसल्याचं लोकांचं वर्तन दिसत होतं. लोक इतके बेफिकीर का? का मरणाची त्यांना भीती वाटत नाही?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीतच हे दृश्य आहे असं नाही. मुंबईत अनेक ठिकाणी असंच दृश्य दिसतं. लोक अगदी एखाद्या वस्तुसाठीही घराबाहेर पडतात. काही जण मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टसिंग पाळत नाहीत. युरोप, अमेरिकेत जी परिस्थिती उद्भवली आहे तशी परिस्थिती भारतात टाळायची असेल तर लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर व्हायला हवी. पण तशी ती होताना दिसत नाही. म्हणूनच मुंबईसारख्या शहरात वाढत चाललेलं कोरोनाचं संकट भीषण होण्याचीच भीती अधिक वाटते.


मुंबईत लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर होत नाही का? खरं तर अन्य कोणत्याही खात्यापेक्षा ही अंमलबजावणी प्रभावी करायची असेल तर ते पोलीस खातंच करू शकतं. त्यासाठी लोकांमध्ये जरब बसवायला हवी. सुरुवातीला पोलिसांनी तशी सुरुवातही केली. काही वेळा त्याचा अतिरेक झाला आणि मग पोलिसांच्या वर्तनावर टीका झाली. टीका झाल्यानंतर पोलीस पुन्हा थंडावले आणि लोक निर्धास्त झाले.


पोलिसांना थोडं कठोर व्हावंच लागेल. बेफिकीर लोकांना तीच भाषा समजते. पण पोलिसांनी अतिरेक होणार नाही याचीही काळजी घ्यावी. खरंच एखाद्याची गरज असेल तेव्हा त्याची अडचण ओळखून ती सोडवायलाही हवी. अनेक ठिकाणी पोलीस गस्त घालतात. पोलीस दिसताच लोक पांगतात आणि पाठ फिरली की पुन्हा बाहेर पडतात. आता केवळ गस्त घालून चालणार नाही. प्रत्येक वस्तीत महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करायला हवेत. त्यांच्या जोडीला राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करायला हव्यात. तसं झालं तर लोकांच्या फिरण्यावर आळा बसू शकेल.


गोव्यासारख्या मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक असतात, त्या राज्यात कोरोनाला आळा घालण्यात जे यश आलं ते केवळ आणि केवळ लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे. गोव्यातही सुरुवातीला लोक बाहेर खरेदीसाठी गर्दी करत होते. पण सीआरपीएफला पाचारण केलं गेलं. पोलीसही सगळीकडे तैनात केले आणि मग लोक घरात थांबू लागले. गोव्यात आढळलेले सातही कोरोनाबाधित बरे झाले. 


विशेष म्हणजे यापैकी एकालाच कोरोनाचा प्रवासाचा इतिहास नसताना संसर्ग झाला. बाकी सगळे परदेशातून आलेले होते. म्हणजे संपूर्ण गोव्यात बाहेरून आलेल्या कोरोना रुग्णांकडून केवळ एकालाच संसर्ग झाला. मुंबईत आता ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे आणि कम्युनिटी ट्रान्स्फरच्या दिशेनं ही वाटचाल सुरु आहे. 


या टप्प्यावर त्याला आळा घालण्यात अपयश आलं तर मुंबईची अवस्था न्यूयॉर्क सारखी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून कोरोनाआधी बेफिकीर लोकांना वेळीच आळा घालण्याची वेळ आली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला धीर देत आहेत. रोज बैठका आणि आढावा घेत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुकही खूप होत आहे. पण लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोरपणे केली नाही तर त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरलं जाण्याची भीती आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवतानाच आता त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी द्यायला हवेत. 


कदाचित लोकांचा रोष पोलिसांना आणि पर्यायानं सरकारला पत्करावा लागेल, पण कोरोना हाताबाहेर गेला तर जी परिस्थिती उद्भवेल त्यापेक्षा हा रोष परवडू शकेल.


सध्या कोरोनाचा रुग्ण मिळाल्यानंतर तो परिसर सील केला जात आहे. पण धारावीतील दृश्य पाहता सगळीकडेच त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता केवळ हॉटस्पॉटमध्येच नव्हे तर अन्य ठिकाणीही परिसर सील करण्याची वेळ आली आहे. 


स्थानिक नेते, प्रतिष्ठित नागरिकांनीही लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना रोखण्याची संधी असूनही काही बेजबाबदार लोकांच्या बेफिकीरपणामुळे ती गमावली जाण्याचा धोका अधिक आहे. मुंबईकरांनो, अजूनही वेळ गेलेली नाही..