कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू होताच पिंपरी चिंचवडला त्यात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झालीय. शहरातले भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची नावे त्या चर्चेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांनी त्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात त्यात गैरही काही नाही. अजित पवारांचा अभेद्य बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये या दोघांनी पवारांचा धोबीपछाड करत महापालिकेत भाजपची सत्ता खेचून आणली. त्यामुळे त्याचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा ठेवण्यात काही गैर असण्याचे कारण नाही. आणि त्यातच पुण्याच्या तुलनेत शहराला कायम दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळेही शहरात मंत्रीपद असावे ही रास्त अपेक्षा आहे.


पण हे सर्व खरे असले तरी या दोघांपैकी एकाची मंत्रीपदावर वर्णी लागेल का हे सांगता येणे कठीण आहे. दोन्ही नेत्यांचा वर्तमान त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे पण सध्या काही होत असलेल्या चुका आणि भूतकाळ मात्र त्यांच्यासाठी थोडासा अडचणीचा ठरतोय...!


ठोकशाहीने नगरसेवक हैराण 


 पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेत्यांमध्ये लक्ष्मण जगताप हे सर्वाधिक ताकतवान नेते आहेत, ही वस्तू स्थिती आहे. आणि त्यांची ही ताकत त्यांना मंत्रीपदाच्या शर्यतीत नक्कीच उपयोगी पडणार आहे. पण त्याच वेळी महापालिकेच्या कारभारात त्यांच्या नावाने काही उद्योगी मंडळींनी सुरू केलेली ठोकशाही मात्र त्यांच्या अडचणीची आहे. काही नगरसेवक तर खाजगीत अक्षरशः रडत आहेत. 


जगताप यांनी नको त्या लोकांना दिले प्रचंड बळ  


 काही ठराविक लोकांच्या ठोकशाहीमुळे अनेकजण हवालदिल झालेत. थेट लक्ष्मण जगताप यांच्यासाठी त्यांचे समर्थक नगरसेवक काही ही करायला तयार आहेत, पण जगताप यांनी नको त्या लोकांना प्रचंड बळ दिल्यामुळे आणि तीच लोकं जगतापांच्या नावावर अनेकांना दाबून ठेवत असल्यामुळे नगरसेवक हवालदिल झालेत. काही जण तर फक्त सोपस्कार म्हणून पालिकेत येतायेत. 
  


शंकरापेक्षा नंदी मोठा झाल्याची अनेकांची खंत 


 शंकरापेक्षा नंदी मोठा झाल्याची अनेकांची खंत आहे. आता हा त्रास कोणामुळे होतोय, हे पिंपरी महापालिकेतल्या गेटवरच्या शिपायापासून आयुक्तांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. पक्षातलेचे काही लोक हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाहीत असे नाही. हे झाले वर्तमानाचे. वर्तमानाबरोबर भूतकाळ ही जगताप यांच्या साठी थोडा त्रासदायक आहे. 
 
 यापूर्वी विधानपरिषद आणि विधानसभा अपक्ष निवडून आल्याचा दावा जगताप करत असले तरी त्यासाठी अजित पवार यांची मोठी रसद त्यांना होती हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याच अजित पवार यांना गरज असताना जगताप यांनी सोडले हे उघड गुपित आहे. त्यामुळे जगताप यांची विश्वासहर्ता त्यांना मारक ठरण्याची चिन्हे आहेत. उद्या जगतापांना ताकत देऊन त्यांना मंत्री बनवून मोठे केले आणि उद्या त्यांनी साथ सोडली तर काय हा प्रश्न पक्ष श्रेष्टींना पडणार नाही अशी शक्यता कमीच आहे.


लांडगेंची ताकद पण छाप नाही...


 हे झाले लक्ष्मण जगताप यांचे. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या महेश लांडगे यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे असे काही नाही. लांडगे यांची ही ताकत प्रचंड आहे, त्यांचे नगरसेवक ही आहेत आणि महापौर ही त्यांच्या गटाचा आहे. हे सर्व असले तरी त्यांच्या गटाच्या महापौरांपासून इतर अनेक नगरसेवकांची महापालिका कारभारात कसली ही छाप पडत नाही. त्यामुळे लांडगे यांची ताकत असून छाप नाही अशी स्थिती आहे आणि लांडगे साठी हे नक्कीच त्रासदायक आहे. 


लांडगेंचा भूतकाळ... 


 हे झाले वर्तमानाचे. लांडगेंचा भूतकाळ जगतापांपेक्षा वेगळा नाही. विधानसभा निवडणुकीत लांडगे बंडखोरी करू शकतील हे माहीत असून अजित पवारांनी त्यांना सोन्याची अंडी देणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद बहाल केले. त्या पदाचा आमदारकीच्या निवडणुकीत किती फायदा झाला हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. त्यांनी ही पवारांना गरज असताना त्यांची साथ सोडली त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ही पक्षश्रेष्टी करणार नाहीत असे ही नाही.


 मंत्री होणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही भूतकाळ आणि वर्तमान असतो. त्याचा विचार केला तर अनेक जण मंत्री होणार नाही. त्यामुळे लांडगे आणि जगताप यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार नाही असे नाही. शहर म्हणून कोणी ही मंत्री झाले तर त्याचा फायदा होणार हे उघड आहे. पण मंत्री झाल्यावर त्यांनी किमान बगलबच्चना आवरावे आणि विकास साधावा हीच काय ती अपेक्षा..!