मुंबई : सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरुणाई दिवसरात्र कष्ट घेते. पण अचानक काही समस्या समोर येतात आणि स्वप्न भंगते. अशीच वेळ शुभम बोटे या तरुणावर आली. पण त्याला मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाचा ‘देव माणूस’ पुढे सरसावला आणि शुभमचं स्वप्न पुन्हा उजळलं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभम बोटे (Shubham Bote) या तरुणानं आर्मीत भरती होण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत केली. अखेर मेहनतीचं फळ मिळालं, आर्मीत निवड झाली. पण अडचणींनी पाठ सोडली नाही. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्या. हातातोंडाचा घास जातोय का असं वाटलं. शेवटचा दिवसच हातात होता. प्रयत्न करूनही मार्ग काही सापडेन. आता तर आर्मीत भरती होण्याचं स्वप्न धुळीस मिळतंय याची खात्री पटली. जीव कासावीस झाला अन् आई वडिलांच्या कुशीत जाऊन रडला. काय करावं विचारात असताना फेसबुक चाळत होता. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फेसबुकवर अपडेट आले.


शेवटची धडपड म्हणून शुभमने फेसबुकवरून देवेंद्र फडणवीस यांच्या गणेश कराड या कार्यकर्त्याला संपर्क केला. त्यानं फडणवीसांचे दिल्लीतील काम पाहणारे मनोज मुंडे यांचा संपर्क दिला. शुभमनं मनोज मुंडे यांना लगेच फोन केला. मनोजनं शुभमची कैफियत फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर यांच्यापर्यंत पोहोचवली. राजूरकरांना गांभीर्य कळालं. फडणवीस बैठकीत होते तरीही त्यांनी हा विषय पोहोचवला. 


फडणवीस म्हणाले त्याला फोन जोडून द्या.  काही क्षणात शुभमच्या फोनची रिंग वाजली, फोन उचलला तर समोरचा व्यक्ती म्हणाला, “मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.” आधी शुभमचा विश्वासच बसला नाही. नंतर स्वतःला सावरत त्यानं सगळी हकीकत सांगितली.. त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि त्याला धीर दिला… आणि 10 मिनिटात पोलिसांचा फोन येईल असं सांगितलं…



खरंतर वेळ कमी उरला होता कारण त्याच दिवशी 20 मार्चला दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सबमीट करायचे होते. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं पोलिस यंत्रणा कामाला लावली.. फडणवीसांनी फोन ठेवल्याबरोबर ३ मिनिटातच पोलिसांचा फोन आला आणि पोलिसांनी सर्व गोष्टी तपासून व्हेरिफिकेशन करुन दिले.


अवघ्या काही मिनिटांत सर्व त्रुटी दूर झाल्या. शुभमनं ही सर्व घटना ट्विटरवरून लोकांसमोर मांडली आहे. शेवटी तो म्हणतो, फडणवीसांनी मला फोन करणं हा चमत्कार होता. 



तोंडाशी आलेला घास हिरावला जाईल असं वाटत असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या रुपानं देवंच धाऊन आला माझ्या मदतीला…   
धन्यवाद अन्नदाता !