अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, झी २४ तास, कोलंबो : श्रीलंकेतली अराजक स्थिती कव्हर करण्यासाठी आम्ही थेट गाठली श्रीलंका. श्रीलंका हा खरंतर अगदी भारतासारखाच देश. तरीही रावणाच्या लंकेत जाण्याचं आकर्षण होतंच. श्रीलंका आपल्याला का आवडते याचा विचार विमानात बसल्यावर करत होतो. तिथल्या निसर्गासाठी? रामायण उतणासाठी? पूर्वरंगमध्ये पुलंनी केलेल्या श्रीलंकेच्या धावत्या वर्णनासाठी? की आपले लहानपणीचे हिरो सनथ जयसूर्या, अरविंद डिसिल्वा, कुमार संगकारासाठी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तर 'मणिके मागे हिथे' या गाण्यानेही भारतीयांना भूरळ घातली होती नुकतीच. श्रीलंकेतल्या योहानी डिसिल्वाच्या गाण्याने भारतात जबरदस्त धूम उठवली होती. असो हे झालं विषयांतर... पण श्रीलंकेविषयी भारतीयांना काही आत्मियता आहे यात वादच नाही. म्हणजे स्वतः श्रीलंकेच्या परागंदा अध्यक्षांनी कितीही चीनशी जवळीक साधली असली तरी भारताने श्रीलंकेवर राग धरला नाही. 


हा विचार करता करता श्रीलंकेच्या विमानतळा बंदरनायके विमानतळावर उतरलो. श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरीमाओ बंदरनायके यांच्या नावावरून या विमानतळाचं नाव ठेवलंय. वातावरणात तणाव होताच. श्रीलंकेत जाताना करन्सी अमेरिकन डॉलर्समध्येच न्या, असा सल्ला मिळालेला. कारण आता श्रीलंकेच्या करन्सीला कोणीही विचारत नाही असंही समजलं. 


विमानतळावरून ठरलेल्या हॉटेलकडे जाताना टॅक्सीवाल्याने तब्बल 11 हजार श्रीलंकन रूपये, असा दर सांगितला. ऐकूनच चक्करच यायची बाकी होती. पण तिथे मुळातच पेट्रोलच्या टंचाईमुळे गाड्या कमी आहेत, त्यामुळे ही टॅक्सी सोडली तर मुख्य शहराकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही हे लक्षात आल्यावर तो रेट मान्य करावा लागला. 


टॅक्सीत बसल्यावर भारतीय म्हटल्यावर लगेच टॅक्सीचालक अकीलने मी दिल्ली, हैदराबाद पाहिलंय वगैरे सांगितलं. अकील हा स्वतः इंजिनिअर झालाय. पण या महागाईत एक इनकम पुरत नाही म्हणून टॅक्सी चालवावी लागते, हे त्याने सांगितलं. गप्पा मारताना गाडी आपसून न विचारताच सध्याच्या स्थितीवर गेली. अकील सांगत होता मी प्रश्न विचारत होतो, ऐकत होतो.


कोलंबो हे तसं सुंदर शहर, माणसं शांतीप्रिय, मग ती एवढी का संतापली. वाटेत एक पेट्रोल पंप लागला. त्याच्या बाहेर तब्बल 5 किलोमीटरची रांग होती गाड्यांची. तिथे केवळ इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल मिळतंय. श्रीलंकन कंपनीच्या पंपांनी केव्हाच मान टाकलीय. जे मिळतंय ते पेट्रोल 520 रूपये. तर डिझेल 480 रूपये किलो. बरं... पंपावर उभं राहून पेट्रोल मिळेलच याची शाश्वती नाही. रांगेत गाड्या, रिक्षा किमान 3 ते 4 दिवस उभ्या होत्या. 


आठवड्यातले चार दिवस तुम्ही गाडी घेऊन पंपावर उभे राहिलात तर सर्वसामान्य रिक्षावाला गाडी चालवणार कधी, उपजीविका करणार कशी? हा सवाल अकिलच्या तोंडून अवघा श्रीलंका विचारत आहे.  


कांदे 250 रूपये किलो, बटाटे 240 रूपये किलो, डाळी 400 रूपये किलो, शेंगदाणे 800  रूपये किलो.... यादी भली मोठी आहे. किंमती ऐकल्यावर जेवणावरची वासनाच उडाली असेल इथल्या लोकांची. मग पोटातली भूक क्रांती निर्माण करते. क्रांतीची गाणी लिहिणाऱ्या या तरूणांनी मग हे बंडाचं हत्यार उचललं. या बंडात अबालवृद्ध सहभागी झालेत. समाजातला प्रत्येक घटक जोडला गेला. महिला मुलं वृद्ध तरूण नोकरदार व्यापारी मध्यमवर्ग श्रीमंत सगळेच होरपळले. 


राष्ट्रपती सचिवालयाच्या बाहेर एक महिला पत्रकार भेटल्या. त्यांनी सांगितलेली गोष्टी आणखी धक्कादायक... आपल्याकडे आपल्या जन्मदाखल्यावर 'राष्ट्रियत्व भारतीय' असं लिहितो ना आपण? मराठी, गुजराती, पंजाबी, मारवाडी वगैरे राष्ट्रियत्व म्हणून मिरवत नाहीत ना आपण? श्रीलंकेत जन्मदाखल्यावर बौद्ध, मुस्लिम, तामिळ, सिंहली तामिळ हिंदू, तामिळ मुस्लिम, तामिळ बौद्ध, सिंहली बौद्ध, सिंहली मुस्लिम अशी राष्ट्रियत्व लिहिली जातात. या सगळ्या भेदांना ही जनता कंटाळली आहे. 


हॉटेल स्टाफपैकी एक जण वरती बॅग पोचवायला चमिला नावाचा कर्मचारी आला. रूममध्ये थांबून त्याने हाच विषय काढला. श्रीलंकन लोक कमालीचे शांत आहेत, भावनेला फुंकर घातल्यावर भावनेवर या राजपक्षे, विक्रमसिंघेंना निवडून देतात अशी तक्रार त्याने केली. मतदार सूज्ञ नाहीत म्हणून ही वेळ आली असं त्यांने मत मांडलं. भारत आणि श्रीलंका यांच्यातला हा मोठा फरक असल्याचंही चमिला म्हणाला. 


राष्ट्रपती सचिवालयात गमिथा नावाचा एक आंदोलक भेटला. पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. पण काम नाही, त्यात महागाई जगू देत नाहीये. लोक आपणहून विषय काढत होते. संध्याकाळी अयाझ नावाच्या रिक्षाचालकाने पेटा नावाच्या मार्केटमध्ये नेलं. तिथे एका किराणा दुकानात जाऊन तिथली स्थिती पाहिली. नारळांच्या श्रीलंकेत नारळ 90 रूपयांना होता. सरकारची चुकीची पावलं, चीनने कपटी खेळी करून श्रीलंकेची लावलेली वाट या सगळ्याविषयी हा आक्रोश आहे. हा आक्रोश गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडींवर आहे असं दिसत असलं तरी ठिणगी कित्येक वर्षांपूर्वीच पडली होती.