जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा सुरुच आहे, त्यांना पगार वाढवून मिळावा, कामाच्या मोबदल्यात घरसंसार नीट चालावा, मुला मुलींच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा त्यांच्याही हातात असावा, कष्ट करणाऱ्यांचा तो अधिकारच आहे. खासगी कॅबवरचा ड्रायव्हर रात्रीच्या अंधारात, गाड्यांचे फोकस डोळ्यावर घेत रस्ता काढतो, सुरक्षित पोहोचवतो, तेव्हा हजार ते १५०० रुपये घेतो. मेहनत आहे, डोळे आयुष्यभर साथ देतील असं नाही, कधीही नजर कमजोर होवू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीचे चालकही अशीच, यापेक्षा कठीण सेवा देतात. डोळे ताणून रात्रभर गाडी चालवतात,  पण सुरक्षित, झोपेची साथी डुलकीही यांच्या आसपास येत नाही, मात्र या बदल्यात हातात पैसे कमी मिळत असतील तर, कमी पैशांमुळे घरी ताणतणाव असेल तर, तो तणावही नसावा. यामुळे त्याला त्याच्या मेहनतीचे हक्काचे पैसे मिळावेत. तो आणखी सुरक्षित सेवा नक्कीच देईल.


विलिनीकरण होईल तेव्हा होईल, निकाल लवकर आला, निकाल ड्रायव्हर-कंडक्टरच्या खिशात कष्टाचा पुरेपूर पैसा आणणारा ठरला तर आमच्यासारख्यालाही आनंद आहे, अनेक पिढ्यांना कष्टाचा मोबदला मिळेल, उशीरा का होईना, तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यास नक्कीच मदत होईल.


पण हा लढा तुम्ही तुमच्या दमावर पुढे नेला आहे हे विसरु नका, मी काय हजार शब्द आणखी लिहू शकतो, पण ज्याच्या घरात तीन-तीन महिन्यापासून पगार नाही, तरी तो लढतोय, तो खरा मानकरी, पोपट पंची तर कुणीही करेल. खऱ्या संघर्षाचे सैनिक तुम्हीच आहात. 


फक्त संघर्ष आणखी योग्य दिशेने जायला हवा. यात आत्महत्येचं पाऊल काही जण उचलतायत हे वाईट आहे, हा आकडा वाढत चालला आहे. 


लक्षात ठेवा मित्रांनो, जीव देऊन काहीही होणार नाही, फक्त मन लावून लढा द्या, तुम्ही गेलात तर तुमच्या संसाराकडे कुणीही पाहणार नाही, तुमच्या लहान मुलांना हक्काचा खाऊ आणणारा पप्पा तुम्हीच,  जगात सर्वात सुरक्षित वाटणारा तो नवरा मध्येच सोडून गेला, तर हे त्या माऊलीवर आभाळ कोसळण्यासारखं आहे. सरकारं येतील आणि जातील, सर्वच आश्वासनं देतील, त्यांच्यासाठी आपण जीव द्यायचा नाही. आपण लढा द्यायचा.


आपलं परिवार आपलं असतं, आपण आधी परिवाराचा विचार करा, आत्महत्या हा उपाय नाही, हे पलायन आहे. तुम्ही आपल्या लहान बाळांना, बायकोला सोडून जाणं यात नुकसान तुमचंच आहे, कुणाचंच नाही.