जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील पुराची तीव्रता सांगणारा चेहरा सुजाता आंबी ठरल्या आहेत. सुजाता आंबी यांचा चेहरा यापुढे जेव्हा कधी इंटरनेटवर सर्चमध्ये येईल, तेव्हा कोल्हापूर-सांगलीच्या भीषण पुराची आठवण नक्की होईल. सुजाता आंबी यांची लष्कराच्या जवानांना धन्यवाद म्हणणारी, दृश्य जेव्हा समाजमाध्यमांवर झळकली. तेव्हा कोल्हापूर-सांगलीच्या पुराची तीव्रता, हानी, वेदना, व्यथा खऱ्या अर्थाने जगभरात पोहोचल्या. मदतीचे हात कईक पटीने वाढले. 


सुजाता आंबी पुराचा चेहरा होण्याची ही कहाणी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर-सांगलीत पुराने थैमान घातले. पुराशी संबंधित अनेक दृश्य वृत्त वाहिनीच्या कार्यालयात धडकायला लागली. पण एका दृश्याने लक्ष वेधलं गेलं. लष्कराच्या जवानांनी वाचवून आणलेल्या लोकांच्या बोटीतील एका महिलेचा भावनिक चेहरा.


या दृश्याचा कोणताही आवाज मी सुरूवातीला ऐकला नव्हता, त्यातील मात्र एक चेहरा पुराची तीव्रता आणि वेदना सांगत होता. लष्कराच्या जवानाच्या पाया पडणं, एक नाही तर दुसऱ्या जवानाच्या पायाला हात लावून आवर्जून, धन्यवाद व्यक्त करणारी महिला डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन, हात जोडत होती. ही भावनिक, पूरग्रस्तांची व्यथा, वेदना आणि तीव्रता सांगणारी दृश्य फक्त ४० सेकंदाची होती. 


या ४० सेकंदांच्या व्हिडीओला संगीताची जोड दिली तर? जोड देण्यासाठी एक गाणं योग्य वाटलं, जाऊंद्यांना बाळासाहेब चित्रपटातील 'वाट दिसू दे गा देवा' गाण्यातील काही बोल यावर 'चपखल' बसले. ते झी म्युझिक कंपनीचंच असल्याची खात्री केली. 


हे गाणं लावल्यानंतर, या महिलेचा चेहऱ्याला वेदना सांगण्यासाठी जणू 'बोल' फुटले. कारण हे गाणच संगीतबद्ध अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाणं गायलंय अजय गोगावलेंसोबत योगिता गोडबोलेंनी.


हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या दृश्याने जगभरात सांगली-कोल्हापूरच्या पुराची तीव्रता पोहोचवली. अनेक हात, उदार मनाने मदतीसाठी सरसावले. या दृश्यातील महिला सुजाता आंबी असल्याचं समजलं. जेव्हा त्यांना बोटीतून आणलं जात होतं, तेव्हा त्यांना साप आडवा गेला, लष्काराच्या जवानांनी एका क्षणात सापाला बाजूला सारलं होतं. 


पुराच्या पहिल्या टप्प्यात या महिलेने ३०० जणांना तिच्या घरी आसरा दिला होता, आणि शेवटी पाण्याची पातळी वाढल्यावर तिचंही औदार्य कमी पडलं आणि तिलाही आपलं घर सोडावं लागलं होतं.


यानंतर ती आपल्या मुलाबाळांसह बचावली, काठावर पोहोचली, तेव्हा तिला भावना अनावर झाल्या. सुजाता आंबी यांनी त्यांना मदत करणाऱ्यांचे धन्यवाद हे पुरालाही लाजवतील, अशा डोळ्यातील अश्रूंच्या पुराने मानले.



कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळ छायाचित्रकार मिथुन राजाध्यक्ष यांनी ही दृश्य चित्रित केली, आणि कोल्हापूरचे झी मीडियाचे प्रतिनिधी प्रताप नाईक हे या व्हिडीओत छायाचित्रकार आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधत होते, एक महिला हात जोडून धन्यवाद म्हणतेय...आणि याचवेळी सांगली-कोल्हापूर पुराची तीव्रता सांगणारा चेहरा सुजाता आंबी ठरल्या.