ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी (भाग-३)
लोकलमधली गर्दी आणि भन्नाट अनुभव
लोकलमधल्या गर्दीत येणारे चांगले-वाईट अनुभव प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला काहीना काही शिकवण देत असतात. लोकलमधल्या गर्दीतलं असंच काही वेगळेपण 'झी २४ तास'च्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सुवर्णा धानोरकर, मुंबई : हिवाळ्यात कुडकुडणारी गर्दी, उन्हाळ्यात घामांच्या धारांनी वेडी होते. ऐरवी विंडो सीटसाठी धडपड करणारे पावसाळ्यात मात्र विंडो सीटवर पाणी असल्याने सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतात. विंडो सीटसाठी जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या बायका पावसाळ्यात या सीटला वाळीत टाकतात. पण त्यात काही माझ्यासारख्याही असतात. पाणी पडलेल्या सीटवरही बसायला जातात. त्यासाठी सोबत टिशू पेपर, प्लास्टिक घेऊनच फिरतात. ओल्या सीटवर बसायची वेळ आलीच की हे प्लास्टिक किंवा टिशू कामाला येतात. पण पावसाळा म्हटलं तर भिजणारचं, कशाला हवा मग टिशू आणि प्लास्टिक...असो...
विषय पावसाळ्याचा आहे म्हटल्यावर गेल्या पावसाळ्यात घडलेला धम्माल प्रकार सांगायलाच हवा. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी एक महिला विंडो सीटला बसलेली. पुढच्या स्टेशनला आणखी एक महिला तिच्या समोरच्या सीटवर बसली. बसताना तिनं लॉफ्टवर छत्री ठेवली. छत्रीचं पाणी विंडो सीटवरच्या महिलेवर पडत होतं. प्रत्येक थेंबागणिक तिचा पारा चढत होता. अखेर तिनं ती छत्री उचलायला सांगितली, एवढ्या वाक्यानं असा काही भडका उडाला की दोघींचं भांडण वाढता वाढता थेट एकमेकींच्या डिग्रींपर्यंत जाऊन पोहोचलं. सकाळी सकाळीच सगळ्यांचं मनोरंजनही होत होतंच. गम्मत म्हणजे या भांडणातल्या या दोन पात्रातलं पहिलं पात्र पालिका रुग्णालयात डॉक्टर. तर छत्रीवाली महिला एका कंपनीत उच्चपदस्थ होती. भांडण संपलं असं वाटायचं आणि अचानक भडका उडायचा. कांदिवलीला सुरु झालेल्या भांडणाची धग दादरपर्यंत होती. यांच्यापैकीच कुणीतरी पोलिसांना फोन केला. दादरला पोलीस आले आणि दोघींना खाली उतरवलं आणि पहिल्या महिलेला घेऊन निघाले. मलाच का नेतायंत म्हणून डॉक्टरीणबाईंचा पारा आणखी चढला आणि त्या पोलिसावरच चिडल्या. पुढे काय घडलं असेल याचा अंदाज मी आजवर बांधतेय. ट्रेन सुरू झाल्यानं मला पुढचं काही कळलं नाही. पण छत्रीवाली बाई मात्र खूपच शांत झाली होती. धक्का बसल्यासारखीच वाटली. बरं बाकी सगळ्याच तिच्यापासून ४ सीट (इथे हात म्हणण्यापेक्षा ४ सीट म्हटलं) दूरचं बसलेल्या. अशी विकोपाला जाणारी भांडणं होतात कधीतरी...
कधीकधी एखाद्या भांडणात मारामारीही होते. कुणीतरी त्याचं चित्रिकरण करतं अशा बातम्या बघायलाही मिळतात. विशेष भांडणं होतात विरार आणि डहाणूच्या गाड्यांमध्ये. एकमेकींसाठी राखून ठेवलेल्या सीटवर कुणी येऊन बसलं की या बायका रुद्रावतार धारण करतात. मध्यंतरी विरार लोकलमधल्या भांडणाची एक बातमीही वाचली. यातल्या मुलीला एका बाईनं हातावर चावा घेतला होता. बातमी वाचताना अंगावर काटा आला. कारण मीही एकदा चुकून विरार लोकलमध्ये चढले. आणि जीव मुठीत घेऊन बोरिवलीत उतरले. मी तेव्हा नवखीच. माझ्या लोकल प्रवासाला तेव्हा महिनाही झाला नव्हता. विरार लोकलमध्ये रात्री सव्वा आठच्या सुमाराला चढले. विचार करा केवढी गर्दी असेल. माझ्या भोवतीच्या सगळ्याच जणी अधूनमधून माझ्याकडे रागाने बघत होत्या. मला तर असं वाटत होतं की आता या क्षणाला ही लोकल दुभंगावी आणि तिनं मला तिच्यात सामावून घ्यावं. सीतामाईंना वाटलेलं ना... धरणी दुभंगावी तसंच काहीसं. त्यानंतर शपथ घेतली पुन्हा कधीही विरार लोकलमध्ये चढायचं नाही. तरीही माज का काय म्हणतात तो इतका की एकदा डहाणूच्या गाडीत चढले आणि एका फुलवाल्याबाईची फुलांची पिशवी सीटवरून उचलून लॉफ्टवर ठेवली आणि मग... काही विचारूच नका, पुढचा अर्धा तास तिची अखंड वटवट सुरु. मी तर बाबा साळसूद. कारण त्या क्षणाला जर तिला कळलं असंत की पिशवी लॉफ्टवर ठेवणारी मीच, तर मग माझ्या वृत्तनिवेदक सहकाऱ्यांनी माझी बातमी वाचली असती. त्यानंतर मी डहाणू लोकलचेही दरवाजे माझ्यासाठी कायमस्वरुपी बंद केलं.
परवाच्या रात्री लोकलमध्ये वांद्रयावरून एक साठीतली बाई चढली. थोडा वेळ शांत मग बाजूच्या मुलीसोबत मस्त गप्पा मारल्या आणि काही कळायच्या आत तीचं रुप बदललं. ती शिव्या द्यायला लागली. बाजूच्या मुलीला काही कळेच ना. हिला अचानक काय झालं. डब्यात ज्या चार-पाच महिला होत्या त्याही भांबावून गेल्या. मालाडपर्यंत ती अशीच. मग मालाडला उतरली, असं वाटलं आता होईल शांत पण कसलं काय. स्टेशनवरही तिची बाराखडी सुरूच. शिव्या देतानाही एवढा खडा आवाज की तिथे असलेल्या पुरुषांनाही लाज वाटत होती. नेमकी ट्रेनही या स्टेशनवर बराच वेळ थांबली. पुन्हा कधी ती महिला मला दिसली नाही. पण सोबतच्या मुली सांगत होत्या. ही आजकाल नेहमीच दिसते ट्रेनमध्ये. अशीच करते. (मला या महिलेविषयी जाणून घ्यायची फारच उत्सुकता आहे)
एक गर्दी असते दरवाज्यात उभी राहणारी. विंडो सीटला बसून समोरून धावणारी लोकल पाहिलीत तर तिच्या दरवाजात दाटीवाटीन उभ्या असलेल्या महिला, मुली दिसतात. कुणाची ओढणी उडत असते, कुणाचे केस. एका हातानं लोकलमधल्या हँडलला धरून उभं राहायचं आणि एका हातात बॅग सांभाळायची. मोबाईल आणि इअर फोन, स्वतःचे आणि समोर उभ्या असलेल्या मुलींचे केस, कपडे एवढं सगळं दोन हातांनी सांभाळत ती कसरत करत उभी असते. सर्वजण उद्याचं स्वप्न रंगवतात असा सर्वसाधारण समज. पण ती दरवाज्यात उभी असलेली स्त्री पुढच्या क्षणाची वाट पाहात असते. जेमतेम एक पाय ठेवायला मिळालेल्या जागेत ती कशीबशी उभी असते. चुकून हात सुटला तर संपलंच सगळं. काही वेळा दरवाजात उभं राहायला आवडतं म्हणून बसायला जागा असली तरी उभ्या राहणाऱ्या काही कमी नाहीत.
लोकलमध्ये दरवाजाजवळ उभ्या असलेल्या मुलींचे वाऱ्यानं भुरभुर उडणारे केस पाहिले की त्या साथिया चित्रपटातल्या राणी मुखर्जीच वाटतात. चेहऱ्यावर येणाऱ्या बटा हलक्या हातानं कानामागे टाकताना त्यांची अदा बघण्यासारखीच. अशात जर ती मुलगी एंगेज्ड असेल तर मग त्या अदांना गुलाबी झळाळी असते. असं गुलाबी चित्र असलं, तरी काही उगाच दरवाजा अडवून उभ्या राहणाऱ्याही असतात. त्या तुम्हाला विरार, डहाणू गाड्यांमध्ये जास्त दिसतील. या द्वारपाल महिलांचं काम असतं बोरिवलीची गर्दी डहाणू आणि विरार गाड्यांमध्ये चढू न देणं. जणू काही यासाठी त्यांना पश्चिम रेल्वे पगार देणार आहे. ( यात विरार डहाणूवाल्यांविषयी राग अजिबात नाही) जर चुकूनमाकून कुणी चढलीच तर मग तिची काही खैर नाही. गाडी रिकामी असली की मिसरुडही न फुटलेली टवाळ पोरंही दरवाजात उभी राहून हिरोगिरी करतात आणि मग आम्हा चार पाच जणींचा ओरडा खातात.
गाडी स्टेशनवरून सुटणार आणि तितक्यात एखादे वयस्कर काका घाई गडबडीत लेडीज डब्यात चढतात आणि मग भांबावून जातात. कधीही माता चंडीकेचे रूप धारण करू शकणारी एखादी महिला अशावेळी काकांना आधार देते. 'अरे रुको रुको, ट्रेन शूर हो गई है, नेक्स्ट स्टेशन पे उतर के आगे वाले डबे में चढ जाना.' इस साईड आयेगा स्टेशन'. काकांची मदत करून ती कृतकृत्य. काकाही मग तिनं सांगितल्याप्रमाणे अगला स्टेशन आलं की उतरून पुढच्या डब्यात जातात.
अशाच गर्दीत फोर्थ सीटचा किस्साही भारीच असतो. प्रत्येकीनं एकदा तरी अनुभवला असेलच. तिघी बसलेल्या दिसल्या की तुम्ही त्यांना शिफ्ट प्लिज म्हणायचं किंवा फक्त तसा इशारा करायचा. तुमचं नशीब चांगलं असेल तर तिघीही प्रामाणिकपणे सरकून किमान ७ ते ८ इंचाची जागा देतात. नेहमीच असा सकारात्मक चित्र नसतं बरं. त्या तिघीतली एक तरी अशी असते की ती तुमच्याकडे रागानं बघेल किंवा मी खूप सरकलेय, असा भास तुम्हाला करून देईल. प्रत्यक्षात ती व्हर्च्युअली सरकलेली असते. मग तुम्ही खिडकीजवळ जाऊन उभे राहिलात तर मग दोन्ही बाजूच्या बायका तुम्हाला सतत लूक देणार, जणू काही तुम्ही विदाऊट तिकीट चढलात. भरीस भर जर तुम्ही उंच असाल तर मग गर्दीत उभ्या असलेल्या बायका पोरींच्या बॅग लॉफ्टवर ठेवण्याचं समाजकार्य तुमच्यावर सोपवलं जातं.
तुम्ही जर नवख्या असाल तर हमखास चुकीच्या जागी उभ्या राहता आणि मग ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रत्येकीच्या लुकचा आणि शब्दांचा बळी ठरता. अशा वेळेस तुम्ही जर गर्दीत स्वतःला सांभाळू शकल्या नाही तर मग तुमचा फुटबॉल झालाच म्हणून समजा. मला आता एकदा एसी लोकलमधली गर्दीचा अनुभव घ्यायचा आहे. तो योग कधी येईल कुणास ठाऊक. तो योग आला की त्या गर्दीबद्दलही बोलेनच. तोवर कुणालाही न आवडणाऱ्या गर्दीतले हे काही लक्षात राहणारे क्षण अनुभवा !
(क्रमशः)