माणसाच्या आयुष्यात नाती आणि नात्यातला संवाद जिवंत असला की तो भरभरून जगतो. पण सध्या आजूबाजूला तसं घडताना दिसतं कुठे? ( Importance of Emojis) आपण दिवसभरातला भरपूर वेळ 'चॅटिंग' करतो म्हणजे आपण खूप संवाद साधतो असं खरंच होतं का? आणि चॅटिंगमध्ये सुद्धा टायपिंगचा कंटाळा असलेली मंडळी अगदी सऱ्हास ईमोजी (Emoji) वापरतात. हे वेगवेगळ्या चेहऱ्याचे ईमोजी आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण वापरतो. इमोजीला भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग समजला जातो. पण या सगळ्यात आपण खरंच त्या भावना 'जगतो' असं तुम्हाला वाटतं का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ली ईमोजी नसलेला एखादा एखादा मेसेज पाहिला की चुकल्या चुकल्यासारखं होतं. समोरच्याने ईमोजी न वापरता केलेला मेसेज आपल्याला अगदी कोरडा वगैरे वाटतो. इमोजीच्या माध्यमातून प्रेम, उत्साह, राग, दुःख, आनंद या सर्व भावना व्यक्त करता येऊ शकतात. पण एखाद्याने  आपल्याला पाठवलेल्या विनोदावर डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणारे 10 ईमोजी पाठवले तरी प्रत्यक्षात आपण तेवढे हसतो का? किंवा एखाद्या गंभीर आणि भावनिक करणारा मेसेज वाचून आपण डोळे बंद  करून, आ वासून रडणारा ईमोजी पाठवला तरी वास्तविक आपण रडलेलो असतो का? हा विचार भावनांच्या विश्वात जगणाऱ्या माणसांनी करायला हवा! 


कधीकधी तर हे इमोजीस अनेकांच्या गैरसमजाचं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भांडणाचं निमित्त बनतात. आपण एखाद्याला शब्दांऐवजी पाठवलेलं एखादं ईमोजी समोरचाही त्याच अर्थाने घेईल याची काय शाश्वती?  त्यामुळे कित्येक संवादात अडथळे निर्माण होत आहेत. किंवा काही संवाद अपूर्णच राहत आहेत. त्यामुळे या ईमोजीसचा वापर अचूकपणे आणि मुख्य म्हणजे संयमाने करायला हवा.


आदिमानव गुहेत चित्र काढायचा, आणि तीच त्याची संवादाची भाषा होती हा इतिहास आपण सगळे शिकलो आहोत. आता एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या विळख्यात जगताना आपण पुन्हा आपल्या पूर्वजांच्या भाषेकडे प्रवास करत आहोत, असं म्हणायची वेळ आली आहे. आणि एक गंमत सांगु? हा ईमोजी विषयीचा लेख मोबाईलवर टाईप करताना मलाही ईमोजी वापरण्याच्या माझ्या सवयीला मुरड घालावी लागली आहे.