रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : पश्चिम युपीला जाटलॅण्ड म्हटलं जातं. हा संपूर्ण भाग शेतकऱ्यांचा. याच शेतकऱ्यांमुळे कृषी कायद्यावरून भाजपला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं. हे आंदोलन जेवढं सिंघू बॉर्डरवर गाजलं तेवढंच उत्तर प्रदेशच्या सीमेवरही फोफावलं. याचं मुख्य कारण म्हणजे राकेश टिकैत यांनी आंदोलनात घेतलेली आग्रही भूमिका. गाझीपूर बॉर्डर आणि नोएडा बॉर्डर इथं शेतकऱ्यांचा मोठा सहभाग राहिला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पश्चिम युपीतच आहे. हाच भाग भाजपचा गड. इथल्या 136 पैकी 109 जागा म्हणजेच 80 टक्के जागा भाजपनं जिंकल्या होत्या. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा ताजा असतानाच इथं भाजपला रोखण्यासाठी अखिलेश यादव, जयंत चौधरी, राकेश टिकैत, शिवसेना या सर्वांनी फिल्डींग लावलीय. पण तिथं सद्यस्थिती काय आहे. शेतकऱ्यांचा आक्रोशाचा परिणाम कितपत होणार, राकेश टिकैत यांचा करिष्मा कितपत आहे. यावर 'झी २४ तास'चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांचा ब्लॉग.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जाट-मुस्लिम एक होणार
युपी पश्चिम भागाला 'जाट लॅण्ड' म्हटलं जातं. 2013 मध्ये मुजफ्फरनगर दंगे झाले. त्यानंतर या भागातील बरंचसं चित्र बदललं. हा दंगा जाट विरूद्ध मुस्लिम असा होता. त्यामुळे इथं जाट आणि मुस्लिमांमधील संबंध विळा-भोपळ्यासारखा राहिलाय. परंतु भाजप सरकार विरोधात इथला जाट शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला. जाटांना मुस्लिम समाजानं साथ दिली. त्यामुळे भाजप विरोधी आंदोलनात जाट-मुस्लिम एक दिसले. परंतु आंदोलनातील चित्र मतदानात परिवर्तित होईल का, हा खरा प्रश्न आहे. जर जाट आणि मुस्लिम एकत्र झाले तर भाजपची नौका बुडण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.


जाट आणि मुस्लिम यांच्यात खरंच एकजुट झालीय का, याचा अंदाज घेण्यासाठी नुकताच पश्चिम युपीचा दौरा केला. त्यावेळेस काही गोष्टी लक्षात आल्या. एका जाट शेतकऱ्यानं सांगितलं की, ''या भागात पूर्वी गुन्हेगारी होती. अपाचे बायकर्सची दहशत होती. अपाचे बाईकवरून आलेली टपोरी मुलं रस्त्यावरून जाताना कोणालाही लुटायची. दागिने पळवायची. आमच्या मुली सुरक्षित नव्हत्या. यासाठी ते मुस्लिमांना जबाबदार धरताहेत. पण पुढे ते म्हणतात, ''योगीचं सरकार आल्यावर अपाचे बायकर्सची दहशत संपली. गुन्हेगारी कमी झाली. आता आमच्या मुली रात्रीसुद्धा मोकळेपणानं फिरू शकतात.''


दंग्यात जाटांना कसं मारलं गेलं. दंग्याचं लोण घरापर्यंत कसं पोहोचलं. याची चर्चा गावागावच्या प्रत्येक चौकात हुक्का पितपित केली जाते. जाटांच्या मनात अजूनही 2013 च्या वेदना आहेत, हे लक्षात येतं. जाट आणि मुस्लिमांची मनं अजूनही जुळलेली दिसत नाहीत.



'शेर की खाल में भेडीया'
दंग्यामुळे काय झालं तर मुस्लिम समाजाची बाजू घेणाऱ्या पक्षाच्या विरोधात जाट मतदार हमखास उभा राहतो. त्यामुळे पश्चिम युपीत सपा-काँग्रेसला खातं उघडण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागते. जाट मतदार सपाला मतदान करणार नाही, हे अखिलेश यादव यांनी ओळखलंय. म्हणूनच आरएलडीच्या जयंत चौधरी सोबत अखिलेश यादवनं युती केली आणि त्यांना 26 जागा दिल्या. अखिलेशनं इथं चाल अशी खेळलीय. 
चिन्ह आरएलडीचे परंतु उमेदवार सपाचे उभे केले आहेत. उदाहरणार्थ, मुजफ्फरनगर मधील सहा मतदारसंघात सपानं आरएलडीला 5 जागा दिल्या. त्यापैकी आरएलडीच्या खात्यातील 4 जागांवर तर सपाचे कार्यकर्ते उमेदवार आहेत आणि एका जागेवर आरएलडीचा कार्यकर्ता. म्हणजे आरएलडीचा चेहरा पुढे करून मतं मिळवायची व्यूहरचना सपानं आखली. यामुळे 20 टक्के जागावर परिणाम झाला तरी ही चाल यशस्वी होईल. कारण, तसंही सपा-आरएलडीकडे फार गमावण्यासारखं काही नाही. कारण जेवढ्या जागा मिळतील तो बोनस असेल.


तिथल्याच भैंसी गावातील एका वृद्धाला विचारलं की, ''जाट मतदार सपा को वोट देगा क्या..?'' त्यावर त्यानं काही प्रमाणात हा प्रयोग यशस्वी ठरू शकतो, असं सांगितलं. त्याचं म्हणणं होतं की, ''चिन्ह आरएलडीचं आणि उमेदवार सपाचा असेल तर थोडाफार फरक प़डेल. परंतु सर्व जाट मतदार एकगट्ठा सपाला जाणार नाही. कारण शेर की खाल में भेडीये को लोग पहचानते है.'' थोडक्यात, जाट मतदार राजकीय दृष्ट्या सजग आहे. जाट मतदार सपाकडे वळण्याची शक्यता कमी आहे परंतु सपाचा मुस्लिम मतदार मात्र आरएलडीकडे वळू शकतो. कारण मुस्लिम मतदार भाजपला मतदान करू शकत नाही. या परिस्थितीत आरएलडीचा फायदा होईल.


मायावतींने मुजफ्फरनगरमध्ये 6 पैकी 5 उमेदवार मुस्लिम दिले आहेत. यामुळे सपाच्या वोट बँकमध्ये खिंडार पाडण्याची बसपाची रणनीती आहे. तर ओवैसींनी सुद्धा मुस्लिम उमेदवार दिला आहे. जर मुस्लिम मतदार काही प्रमाणात एमआयएएम आणि बसपकडे वळला तर सपाचं मोठं नुकसान होईल. इथं मुस्लिम मतदार जास्त असतानाही सपानं मात्र एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. गुर्जर, दोन जाट, एससी आणि सैनी उमेदवार दिले. कारण, मुस्लिम मतदार सपाचाच!, तो कुठे जाणार नाही. परंतु इतर समाजातला उमेदवार दिला तर मुस्लिम प्लस इतर समाज मिळून जिंकण्याची शक्यता वाढते, हे सपाला माहिती आहे. हीच रणनीती सपा - बसपानं संपूर्ण पश्चिम युपीत आखलीय.


दलित मतदार, भाजपची मदार
दंग्यानंतर लाखो मुस्लिमांनी मुजफ्फरनगरमधून पलायन केलं. ज्या गावात जाट नाहीत आणि ज्या गावाची लोकसंख्या 12-15 हजार आहे अशा छोट्या गावात ते स्थायिक झाले. ती गावं आहेत दलितांची. त्या गावात आता मुस्लिमांची संख्या लक्षणीय दिसते. या गावात नव्या वादानं जन्म घेतलाय. तिथे आता दलित विरूद्ध जाट असा संघर्ष सुरू झालाय. दलित हा मायावतीचा मतदार परंतु मायावती नसेल तर तो दुसरा पर्याय म्हणून भाजपकडे पाहतोय. कारण, दलित नंतर त्यांची दुसरी ओळख हिंदू आहे. त्यामुळे भाजपशी जवळीक आणि त्यात मुस्लिमांशी वाढलेल्या वादाची भर पडलीय. म्हणूनच या निवडणुकीत दलित मतदार महत्त्वाचा घटक ठरणार आहे.



मागील निवडणुकीत भाजपला दलित मतदारांनी साथ दिली होती. ४० टक्के जाटव तर गैर जाटव म्हणजेच खटीक, पासी, वाल्मिकी समाजाची १७ टक्के मते मिळाली होती. यंदा पुन्हा ती मते मिळवण्यासाठी चंद्रशेखर आझाद सारख्या नेत्याची भाजपला गरज आहे. घडलंही तसंच, चंद्रशेखर आझाद अखिलेश यादववर टिका करून विभक्त झाला. आझाद याच्या पाठीशी तरूण दलित मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. सहारनपूर, मेरठ, आग्रा या भागात चंद्रशेखरचा प्रभाव आहे. दोन-तीन उमेदवार जिंकून आणण्याची क्षमता आहे. पण त्याहून अधिक इतरांचे उमेदवार पाडण्याचं काम मात्र तो नक्की करू शकतो. ''विरासत से तय नही होंगे सियासत के फैसले, ये तो उडान तय करेगी आसमान किसका है!'' अशा आशयाचं ट्विट करून चंद्रशेखरनं अखिलेश विरोधात मोर्चा उघडलाय. एकिकडे मायावती आणि दुसरीकडे चंद्रशेखर, दोघांमुळे दलित मतदार सपाच्या विरोधात गेले तर अखिलेश अडचणीत येतील.


मेरे अंगने में...
युपीत शिवसेनेला जनाधार नसल्याचं प्रत्येक निवडणुकीत दिसून आलंय. मागील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा दणकून पराभव झालाय. यावेळी अप्रत्यक्षपणे का होईना, राकेश टिकैत यांची भेट घेऊन उगीचच राजकीय हवा करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. चाळीशीतल्या एका रहिवाशाला शिवसेनेबद्दल विचारलं असता त्यानं प्रतिप्रश्न केला की, ''शिवसेना हिंदुत्वाची गोष्ट करत असेल तर आमच्याकडे भाजप हा पर्याय आहे, मग आम्ही शिवसेनेला मतदान का करावं?'' 2010 पूर्वी युपीत शिवसेनेसाठी पोषक वातावरण होतं, पण आत्ता नाहीए. 



कारण मुजफ्फरनगर दंगलीनंतर कट्टर हिंदुत्वाची जागा भाजपनं घेतलीय. इथं बाळासाहेब ठाकरेंबद्दल कमालीचा आदर आहे. पण शिवसेना काँग्रेससोबत गेल्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसतेय. बाळासाहेबांनंतर हिंदू हद्यसम्राट म्हणून मोदींकडे पाहिलं जातंय. एका तरुणाचं मत होतं, ''बाळासाहेबांमुळे शिवसेनेची वेगळी ओळख होती. पण त्यांची आता भुमिकाच बदलली. शिवसेना काँग्रेससोबत गेलीय. त्यामुळे शिवसेनेला अजिबात मतदान करणार नाही.'' सेना मुस्लिमांना साथ देत असल्याचा समज इथल्या जाट तरुणांमध्ये झालाय. शिवसेनेनं काँग्रेससोबत जाणं हे युपीतील तरूण मतदारांना रूचलेलं नाही. मात्र जर शिवसेनेला तरबेज खेळी करणं जमलंच, तर समाजवादी पक्षाचा मतदार काही प्रमाणात शिवसेनेकडे वळू शकतो. त्यानं सपाला फटका बसेल पण भाजपचं कोणतंही नुकसान होताना दिसत नाही. 


शेतकरी आंदोलन इफेक्ट..
पश्चिम युपीचा दौरा केल्यानंतर दोन गोष्टी कळाल्या...
१. या निवडणुकीवर शेतकरी आंदोलनाचा कसलाही प्रभाव नाही.


२. राकेश टिकैत यांना राजकारणी म्हणून स्वीकारलं जात नाही.


राकेश टिकैत यांचं नाव मोठं आहे परंतु ते युपीच्या राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही.
त्यांनी दोनदा निवडणूक लढविली. एकदा विधानसभा आणि दुस-यांदा लोकसभा. दोन्ही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. इतकंच नव्हे, तर सहाव्या नंबरवर ते फेकले गेले. शेतकरी आंदोलनात त्यांची लोकप्रियता वाढलीय, हे खऱं असलं तरी, अजूनही राजकीय नेता म्हणून जाट मतदार त्यांना स्वीकारत नाही. त्यांनी ठराविक पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं तरी त्यांचा फरक पडणार नाही. याचं कारण मुस्लिम-जाट यांच्यातील दरी.. जर सपा-काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं तर आपल्याच समाजाचा रोष ओढवून घेण्याची भिती टिकैत यांना आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी विधेयकं मागे घेतल्यामुळे तोही मुद्दा आता मागे पडलाय. मुळात पश्चिम युपी हा शुगर बेल्ट. ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. प्रत्येक घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या गाड्या पाहून इथली सधनता दिसून येते. छोट्या छोट्या गावातही सिमेंटचे रस्ते, पाणी, वीज आहे. केवळ ऊसाचे एमएसपी या मुद्द्यावरून भाजपला अडचणीत आणता येऊ शकते. पण शेवटी एमएसपी पेक्षा जातीय ध्रुवीकरण हाच मुख्य मुद्दा पश्चिम युपीचा असणार आहे.



युपी वेस्ट, भाजप बेस्ट?
वेस्ट युपीत सपा, बसपा, आरएलडी आणि काँग्रेसचं पानीपत झालं. मुजफ्फरनगर दंगल, कैराना मधून हिंदूचं पलायन या मुद्द्यामुळे मागच्या वेळी 'युपी वेस्ट, भाजप बेस्ट' असं चित्र होतं... आता शेतकरी आंदोलनाचं आव्हान आहे. त्यामुळे पुन्हा बेस्ट कामगिरी करण्यात भाजपला कितपत यश मिळतंय का ते पाहावं लागेल. जर पश्चिम युपीत भाजप यशस्वी झाला तर खऱ्या अर्थानं भाजपच्या सत्तेचा सूर्य पश्चिमेकडून उगवला, असं आपण म्हणू शकू.