शेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक
शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा, हे लिहित असताना, योग्य त्या भाषेचा वापर करा, आपण लिहित असताना, कुणाचाही अनादर होणार नाही, कुणी दुखावलं जाणार नाही, हिंसा पसरणार नाही असं लिहा.
लिखाण राजकीय होणार नाही, याकडेही लक्ष द्या. कारण शेतकऱ्यांसाठी सर्वच पक्ष आता 'सब घोडे बारा टके' आहेत. शेतीवर आज संधी आलीय, शेतकऱ्यांविषयी आपण नाही बोलणार, लिहिणार, बाजू मांडणार तर कोण मांडणार?
शेतकऱ्यांच्या घरी जन्माला येणं पाप नाही, हे जगाला समजावून सांगा, कारण तुम्ही शिक्षण घेत असताना अनेक मर्यादा आर्थिक परिस्थितीमुळे आल्या असतील, त्या आपल्या पुढच्या पिढीच्या नशिबात येऊ नयेत म्हणून लिहा.
हा संप किती टिकेल, याचा विचार करण्यापेक्षा, या काळात आपण आपली बाजू, आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण सर्वांसमोर मांडू.
आज दूध सांडलं जातंय, भाजीपाला फेकला जातोय, फळं चिरडली जात आहेत, यावर टिका होते आहे. कधी नव्हे तो संवेदनशील समाज आता दिसायला लागला आहे, या संवेदनशील समाजाच्या संवेदना आता जागृत झाल्या आहेत, तेव्हा त्यांना पटवून सांगू या, की आम्ही का नाडलो जातोय, पिकतं त्यापेक्षा जास्त खर्च करायला आम्ही गुलाम आहोत का यावर लिहा.
या संपाची एकूण भूमिका किंवा पाठिंबा आपला नसला, तरी या काळात संपाच्या नावाखाली शेतकऱ्यांना कुणी नाव ठेवणार नाही, नको नको ते बोलणार नाही याकडे लक्ष द्या. असं बोलणाऱ्यांना लिहिणाऱ्यांना उत्तर द्या.
या संप काळात शेतकऱ्यांना कुणी काही अन्यायकारक बोलत किंवा लिहित असेल, तर या अशा व्यक्ती कोणत्या पक्ष संघटनेच्या आहेत, याची प्रोफाईल शोधा, माहिती काढा, निरीक्षण करा,आणि पुढच्या काळात अशा संघटनांची भूमिका हीच आहे किंवा नाही, ती आपल्याला परवडणारी आहे किंवा नाही, या विषयी इतर शेतकऱ्यांना सांगा, पटवून द्या. सर्वात महत्वाचे म्हणजे हे एवढं शेअर करा की जास्तच जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.