बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनी खलनायकाच्या भूमिका इतक्या चांगल्या साकारल्या आहेत की खऱ्या आयुष्यातही प्रेक्षक त्यांचा राग करतात. रणजीत यांचं नावंही प्रसिद्ध खलनायकांच्या यादीत घेतलं जातं. 80, 90 चा काळ रणजीत यांनी गाजवला होता. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राजेश खन्ना यांच्यासमोर त्यांनी तोडीचा खलनायक उभा केला होता. दरम्यान नुकतंच त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडची अनेक गुपितं उघडली. यादरम्यान त्यांनी दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) यांच्यासह झालेल्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला. "मी स्टुडिओच्या आत गेलो असता, त्यांच्या चित्रपटांमधील  अभिनेत्रींचे मोठे पोस्टर्स लागलेले होते," असं त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज कपूर ज्याप्रमाणे ऑनस्क्रीन बोलायचे, त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अत्यंत मितभाषी होते असं रणजीत यांनी सांगितलं. "ते आत आल्यानंतर मला लगेच 'सॉरी गोली जी' म्हणाले. ते फार सुंदर दिसायचे. ते एकदम गोरे होते. त्यांचे गाल लालबुंद होते. तसंच फिक्या रंगाचे डोळे," अशी त्यांनी पहिल्या भेटीची आठवण सांगितली.


रणजीत यांनी यावेळी राज कपूर यांनी त्यांना सांगितलेल्या काही गोष्टींचाही खुलासा केला. "मेरा नाम जोकर चित्रपटातील अभिनेत्रीचा उल्लेख करत त्यांनी मला फोटोंचा अल्बम दाखवला. नंतर त्यांनी मला सांगितलं की, मी मेरा नाम जोकर चित्रपटातील अभिनेत्रीला मांडीवर बसवून सीन समजवायचो. हे करताना त्यांच्या मनात इतर कोणतीही भावना नव्हती. ते अभिनेत्रीला मांडीवर बसायला सांगताना, पुत्तर म्हणजे मुलगी म्हणून हाक मारायचे".


राज कपूर यांनी दिग्दर्शन केलेल्या 'मेरा नाम जोकरम'ध्ये स्वत: मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्यासह सिमी गरेवाल, ऋषी कपूर, केसेनिया रायबिन्किना, पद्मिनी, मनोज कुमार आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या.


गतवर्षी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत रणजीत यांनी आपल्या भूमिकांमुळे कुटुंबीय कसे नाराज झाले होते आणि जवळपास घरातून बाहेर हाकलण्यापर्यंत पोहोचले होते याबद्दल सांगितलं. आपल्या आईची समजूत काढण्यासाठी त्यांना रेखाची मदत घ्यावी लागली होती. रणजीत यांनी 1971 मधील शर्मिली चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. एका सीनमध्ये त्यांना रेखावर जबरदस्ती करायची असते. हा सीन पाहिल्यानंतर रणजीत यांचं कुटुंब चित्रपटगृह सोडून बाहेर पडलं होतं आणि त्यांना घऱ सोडण्यास सांगितलं होतं. हा किस्सा सांगताना ते म्हणाले होते की, "माझी आई मला म्हणाली होती या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू महिलांचे कपडे फाडतोस, हे कोणतं काम आहे? तिने मला घर सोडून जाण्यास सांगितलं होतं".