औरंगाबाद : विदेशवारीचे तिकीट बुक करून पैसे दिले नाहीत म्हणून औरंगाबादेत माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहम्मद अझरुद्दीनच्या स्वीय सहाय्यकाने अझरुद्दीनसह तिघांचे लाखो रुपयांचे विदेशवारीचे तिकीट काढले होते. मात्र त्याचे पैसे दिले नाही म्हणून ट्रॅव्हल्स एजन्सी मालक मोहम्मद शहा याकोब यांनी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद अझरुद्दीन स्वीय सहाय्यक मुजीब खान औरंगाबादचा आहे. औरंगाबादच्या दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून मुजीब खान याने तिकीट बुक केली होती. मुंबई, दुबई ते पॅरिस आणि परत येण्याचे तिकीट होती. एकूण २० लाख ९६ हजार रुपयांची ही रक्कम आहे. मात्र पैसे न दिल्याने अखेर हा गुन्हा दाखल झाला आहे.


तक्रारकर्ता मोहम्मद याची दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी औरंगाबादमध्ये आहे. मोहम्मदने, नेहमी ऑनलाईन पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु कोणतेही पैसे दिले नसल्याचा आरोप लावला आहे. 


मात्र, मोहम्मद अझरुद्दीनने या आरोपांचं खंडण केलं आहे. अझहरने आरोप नाकारत तक्रारदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचं सांगितलं आहे. अझहरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत, या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे करण्यात येत असल्याचं सांगितलं. तक्रारीत करण्यात आलेले आरोप आधारहीन आहेत. या प्रकरणी कायद्याचा सल्ला घेत तक्रारदाराविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा सांगितलं आहे.