मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस देखील पावसाने वाया घालवला. चौथ्या दिवशी एकही चेंडू खेळवला गेला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवसाप्रमाणे चौथा दिवस देखील पावसाने वाया घालवल्यामुळे फॅन्स मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे माजी खेळाडूंनी मात्र सामना इंग्लंडमध्ये खेळवण्याबाबत इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलवर ताशेरे ओढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने ट्विटरद्वारे आयसीसीला टोला लगावला आहे. सेहवाग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, "बॅट्समना देखील व्यवस्थित वेळ मिळाला नाही आणि आयसीसीला सुद्धा..." दरम्यान सेहवागच्या या ट्विटनंतर क्रिकेट फॅन्सने आयसीसीला ट्रोल सोशल मीडियावर ट्रोल करत मीम्स देखील शेअर केले आहेत.


तर दुसरीकडे इंग्लडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने देखील आयसीसीवर हल्लाबोल चढवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना इंग्लडमध्ये ठेवण्याचा हा मोठा मुर्खपणा असल्याचं पीटरसनने म्हटलंय.


केविन पीटरसन म्हणाला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारखा महत्त्वपूर्ण सामना अस्थिर हवामान असलेल्या इंग्लड देशामध्ये आयोजित करायला नको होती. भारत आणि न्यूझीलंडचा हा सामना ड्रॉ होण्याच्या स्थितीत आहे. कारण गेल्या 4 दिवसांमध्ये केवळ 140 ओव्हरचा खेळ झाला आहे.


पीटरसन पुढे म्हणाला, "वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कुठे खेळवायचा याबाबत जर मला निर्णय घ्यायचा असता तर मी दुबईचं नाव सुचवलं असतं." दुबई सगळ्याच दृष्टीने योग्य असल्याचंही पीटरसन म्हणाला.