`आपण देशासाठी योगदान देण्याचा...`; माल्ल्याने ललित मोदीला केलेला रिप्लाय पाहून भुवया उंचावल्या
Vijay Mallya Reply To Lalit Modi: ललित मोदीने विजय माल्ल्याच्या 69 वाढदिवसानिमित्त दोन फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्यानंतर त्यावर बर्थडे बॉयने रिप्लाय केला.
Vijay Mallya Reply To Lalit Modi: आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी भारतामधून पळ काढल्याचा ठपका असलेला उद्योजक आणि मद्यसम्राट म्हणून ओळख निर्माण करणारा विजय माल्ल्याचा नुकताच वाढदिवस झाला. 18 डिसेंबर रोजी विजय माल्ल्याने त्याचा 69 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या अनेक हिंतचिंतकांनी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. माल्ल्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये इंडियन प्रिमिअर लिगच्या प्रमुख पद भूषवलेल्या ललित मोदीचाही समावेश आहे. ललित मोदीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन विजय माल्ल्याला टॅग करुन एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने विजय माल्ल्याबरोबरचे फोटोही पोस्ट केलेत. मात्र या वाढदिवसाच्या पोस्टला विजय माल्ल्याने केलेला रिप्लाय पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ललित मोदीने शुभेच्छा देताना काय म्हटलं?
"माझा मित्र विजय माल्ल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यात बरेच चढ-उतार येत असतात. आपण आपल्या आयुष्यात असे अनेक चढ-उतार पाहिलेत. ही वेळही निघून जाईल. हे वर्ष तुझ्यासाठी फलदायी ठरो. खूप सारं प्रेम आणि हास्य तुझ्या आयुष्यात असावे अशा शुभेच्छा... माझ्याकडून तुला एक मिठी," असं म्हणत ललित मोदीने विजय माल्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
ललित मोदीने विजय माल्ल्याबरोबरचे दोन जुने फोटो पोस्ट केला आहेत. हे फोटो ललित मोदी इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रमुख पदावर आणि विजय माल्ल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालक म्हणून आयपीएलच्या पहिल्या काही पर्वांदरम्यान फार सक्रीय असतानाच्या काळातला आहे.
विजय माल्ल्याचा रिप्लाय चर्चेत
ललित मोदीने दिलेल्या या शुभेच्छांना विजय माल्ल्याने रिप्लाय दिला आहे. ललित मोदीचे आभार मानतानाच आर्थिक घोटाळ्यांचा ठपका असल्याने दोघांनाही देश सोडून परदेशात पळ काढावा लागल्याचं सूचक संदर्भ माल्ल्याने आपल्या रिप्लायमध्ये दिला आहे. ललित मोदीला रिप्लाय करताना, "माझ्या प्रिय मित्रा, धन्यवाद! आपण देशासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला, तिथेच (त्याच देशात) आपल्याला चुकीचं ठरवण्यात आलं," असं विजय माल्ल्याने म्हटलं आहे.
ललित मोदी 2010 साली भारत सोडून गेला तर विजय माल्ल्याने 2016 मध्ये देश सोडला आहे. सध्या विजय माल्ल्या आणि ललित मोदीमधील हा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र नक्की. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करुन नक्की कळवा.