मुंबई :  विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात काही निर्णय घेण्यात आले आहेत. यात खासगी शाळांच्या शुल्क वाढीबाबत मोठी घोषणा कऱण्यात आली आहे. खासगी शाळा मनमानी शुल्क वाढवतात त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती स्थापन करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ही शुल्क नियंत्रण समिती आठ जिल्ह्यात स्थापन करणार असून माजी जिल्हा न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असणार आहेत पूर्वी उपसंचालकांकडे तक्रारी जायच्या मात्र त्यांचा निपटारा होत नव्हता.


 लोकनियुक्त सरपंच पद्धत रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सध्या सुरू असलेली लोकनियुक्त सरपंच पद्धत रद्द करण्याचं विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलंय. त्यामुळे आता ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजप सरकारने सरपंचांची निवड लोकांमधून करण्याचा घेतलेला निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर बदलला. 


'समृद्धी' जमीन खरेदी आणि चौकशी


समृद्धी महामार्ग जमिनी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्तवीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. समृद्ध महामार्गाची अधिसूचना जारी होण्याआधी या मार्गालगत राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जमीनी खरेदी केल्या. अधिसूचनेनंतर जमीनींच्या किंमती वाढल्या. या जमीनींचा पाच पट मोबदला या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. मात्र या प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांमार्फत झाली असून त्यात काहीही तथ्य आढळलं नसल्याची माहिती राज्य रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तरीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.