मुंबई : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आज जाहीर होणारी अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं शैक्षणिक प्रवेशासाठीच्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे, अकरावीचे प्रवेश आता लांबणीवर गेले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला जाहीर झाली होती. मुंबईभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून पुढली पावले उचलली जाणार असल्याचे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 



इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ अंतर्गत नियमित प्रवेश फेरी-२ ची गुणवत्ता, निवड यादी (Allotment)  आज जाहीर केली जाणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालय SEBC आरक्षण संदर्भातील आदेशाचे अनुषंगाने यापुढील इयत्ता ११वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. ११वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.