मुंबई : महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सीईटी परीक्षा (CET exams) घेणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा (MHT CET 2020 exam ) १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतील. अंतिम तारीख, वेळापत्रक, परीक्षा कशा घ्याव्यात याविषयी निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही पहिल्या आठवड्यात इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी बरोबर घेणार आहोत आणि मग उर्वरित परीक्षा घेण्यात येतील, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले. महाराष्ट्रात येत्या १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये सीईटी होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. दरवर्षी साधारणतः मे महिन्यात सीईटी परीक्षा होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे परीक्षा होऊ शकलेली नाही.



दरम्यान, राज्य सरकार सध्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या प्रश्नाचे निराकरण करण्यात व्यस्त आहे. येत्या दोन दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता असून त्यानंतर सीईटीबाबत निर्णय घेण्यात येईल. मला सीईटी आयुक्तांकडून प्रस्ताव आला आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, अंतिम वर्ष परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत बैठक झाली. राज्यातल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि सगळे कुलगुरू यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत अंतिम वर्षाच्या परीक्षा पद्धतीबाबत निर्णय होऊ शकतो. 


ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्याबाबतच्या शासनाच्या आणि कुलगुरूंच्या भूमिकेवर राज्यपाल सकारात्मक आहेत. तसेच सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या भूमिकेलाही राज्यपालांचा पाठींबा आहे, असे सांगितलं जात आहे. काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.


आज राज्यपाल, कुलगुरू आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मिळून एक बैठक होईल. या बैठकीनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होईल, आणि त्यानंतर अहवाल सादर केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.