Suhani Bhatnagar Death: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या (Amir Khan) सुपरहिट 'दंगल' (Dangal) चित्रपटात लहानपणीच्या बबिता फोगाटची (Babita Phogat) भूमिका निभावणारी सुहानी भटनागरचं (Suhani Bhatnagar) निधन झालं आहे. सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानी भटनागर गेल्या दोन महिन्यांपासून बेडवर होती. तिला एक दुर्मिळ आजार झाला होता. तिच्या पालकांनीच याबद्दल सांगितलं आहे. 'दंगल' चित्रपटासाठी तिची 25 हजार मुलींमधून निवड झाल्याचं सांगताना आपल्याला तिचा फार गर्व आहे अशी भावना व्यक्त केली आहे. 


सुहानीला नेमका काय आजार होता?


सुहानीने वयाच्या फक्त 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मागच्या मंगळवारी सुहानीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 16 फेब्रुवारीला संध्याकाळी तिचं निधन झालं. 17 फेब्रुवारीला तिच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. 


सुहानीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "2 महिन्यांपूर्वी तिच्या एका हाताला सूज आली होती. आम्हाला तेव्हा ते सामान्य वाटलं होतं. पण नंतर तिच्या दुसऱ्या हातालाही सूज आली आणि ती वाढू लागली".


"यानंतर आम्ही अनेक डॉक्टरांकडे जाऊन तिला दाखवलं. पण कोणत्याही डॉक्टरला या आजाराची नेमकी माहिती देता येत नव्हती. जवळपास 11 दिवसांपूर्वी सुहानीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिची चाचणी केली असता डर्मेटोमायोसाइटिस  नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचं आम्हाला कळालं. या आजारावर फक्त स्टेरॉइड्स हाच उपचार आहे. यानंतर तिला स्टेरॉइड्स देण्यात आले. पण यामुळे तिच्या शरिरातील ऑटो इम्यून सिस्टम प्रभावित झाली. तिची प्रतिकारशक्ती कमी झाली," अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


पुढे त्यांनी सांगितलं की, "डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजारातून बरं होण्यासाठी फार वेळ लागतो. पण प्रतिकारशक्ती कमी असल्याने सुहानीला रुग्णालयात संसर्ग झाला. तिची आतडी दुबळी झाली. तिच्या आतड्यात पाणी भरल्याने श्वास घेणं कठीण झालं होतं".


दरम्यान सुहानीच्या आईने सांगितलं आहे की, "मला माझ्या मुलीचा फार गर्व आहे. ती लहानपणापासून प्रिंटसाठी मॉडेलिंग करत होती. दंगल चित्रपटासाठी 25 हजार मुलांमधून तिची निवड झाली होती. ती लहानपणापासून कॅमेरा फ्रेंडली होती. ती सध्या मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम करत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची चित्रपटात काम करण्याची इच्छा होती".


सुहानी भटनागरने आमीर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या दंगल चित्रपटात छोट्या बबिताची भूमिका निभावली होती. सुहानीच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर ती काही जाहिरातींमध्येही झळकली होती. पण नंतर तिने शिक्षणासाठी अभिनय सोडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अभिनयाकडे वळण्याचं तिचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न शेवटी अपूर्णच राहिलं.