मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या कारकिर्दीतील काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करुन गेले आहेत. भाईजान सलमानच्या याच चित्रपटांमधील एक नाव म्हणजे बजरंगी भाईजान. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटातून भारत- पाकिस्तान संबंधांवर एक वेगळा आणि तितकाच भावनिक प्रकाशझोत टाकण्यात आला होता. यामध्ये अभिनेत्री करिना कपूरने सलमानसोबत स्क्रीन शेअर केली होती. या साऱ्यामध्ये चित्रपटाला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती म्हणजे बालकलाकार हर्षाली मल्होत्रा हिने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षाली चित्रपटात साकारलेली 'शाहिदा' म्हणजेच 'मुन्नी' कोणीही विसरु शकलेलं नाही. तिच्या भूमिकेमुळेच चित्रपटाचं कथानक अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं होतं. नुकतीच या चित्रपटाचा चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने चित्रपटाचे कास्टींग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांनी या मुन्नीची म्हणजेच हर्षालीची निवड कशी आणि कोणत्या निकषांवर केली, यावरुन पडदा उचलला आहे. 


'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयीची रंजक माहिती दिली. 'शाहिदा' या पात्रासाठी त्यांनी शेखर कपूर यांच्या 'मासूम' या चित्रपटाचा आधार घेतला होता. या चित्रपटात जुगन हंसराजने साकारलेली भूमिका आणि त्याची निरागसता आजही प्रेक्षकांच्या मनात तशीच कायम टिकून आहे. त्याच निकषांच्या आधारे 'मुन्नी'साठीची शोधाशोध सुरु होती. 


छाब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ते वास्तव्यास येण्यापूर्वी एका कंपनीत कार्यरत होते. ज्या ठिकाणी त्यांचा बऱ्याच लहान मुलंशी संपर्क येत असे. त्यामुळे 'बजरंगी भाईजान'मधील बालकलाकाराची निवड करतेवेळी काही गोष्टी त्यांच्या मनात ठाम होत्या. 'ज्या बालकलाकाराला पाहताच इतर त्याच्या किंवा तिच्या प्रेमात पडतील. अभिनय वगैरे ही पुढची गोष्ट पण निरागसताच महत्त्वाची', असं त्यांनी स्पष्ट केलं. 


'मासूम'मधील जुगल हंसराजने साकारलेल्या भूमिकेचा आधार देत त्याच्या चेहऱ्यावर असणारी निरासता पाहता कोणी त्याचा द्वेष करुच शकत नव्हता. त्यामुळे पाहताक्षणीच निरागस भावांच्या बळावर मन जिंकणाऱ्या बालकलाकाराचीच नवड करण्याचं  ठरवण्यात आलं होतं. 



चित्रपटासाठी काही बालकलाकारांची ऑडिशन घेतल्यानंतर ज्यावेळी हर्षालीवर त्यांची नजर पडली, तेव्हा तिचं दिसणं, अभिनय कार्यशाळेत बसणं हे पाहता अर्ध काम तेव्हाच झालं होतं, असं छाब्रा यांनी स्पष्ट केलं. बालकलाकाराच्या मूळ स्वभावात कोणताही बदल न करता त्यांना तसंच सादर करण्याचा मार्ग छाब्रा यांनी अवलंबला आणि पाहता पाहता 'शाहिदा' म्हणा, 'मुन्नी' म्हणा किंवा हर्षाली म्हणा.... तिने सर्वांचीच मनं जिंकली. आजच्या घडीलाही 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ज्यावेळी 'मुन्नी' सलमानने साकारलेल्या 'पवन'ला 'मामाssss' अशी हाक मारते तेव्हा अनेकांच्याच डोळ्यांतून आसवं घरंगळतात.