मुंबई : सध्याच्या घडीला बॉक्स ऑफिसवर Deepika Padukoneची मुख्य भूमिका असणाऱ्या 'छपाक' आणि अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी' या दोन चित्रपटांमध्ये सुरु असणाऱ्या स्पर्धेचीच चर्चा सुरु आहे. एकिकडे 'तान्हाजी'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे 'छपाक' मात्र यामध्ये बऱ्याचदा अडखळताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन, दमदार कथानक असूनही दीपिकाची मुख्य भूमिका असणाऱ्या 'छपाक'च्या वाट्याला अपेक्षित यश आलेलं नाही. तर, ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी'ने चौथ्या दिवशीही कमाईच्या आकड्यांचा सुस्साट वेग कायम ठेवला आहे. 


दोन्ही चित्रपटांच्या कथानकाची प्रेरणा ही सत्य घटनांवर आधारलेली आहे. असं असलं तरीही प्रेक्षकांची पसंती मात्र 'तान्हाजी मालुसरे' यांच्या शौर्यगाथेलाच मिळत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार 'तान्हाजी'ने पहिल्या दिवशी १४.५० कोटी, दुसऱ्या दिवशी १९.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २५.५० कोटी रुपये कमवले. चौथ्या दिवशी या चित्रपटाने १३.५० कोटी रुपयांची कमाई केली. हे आकडे जोडल्यास ७३.२५ कोटी रुपये असा एक मोठा आकडा चित्रपटाला मिळालेलं यश अधोरेखित करत आहे. 



दीपिकाच्या 'छपाक'विषयी सांगावं तर, तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने २० कोटींची कमाई केली. सुट्टीचा या चित्रपटाला काही अंशी फायदा झाला खरा. पण, पुन्हा एकदा या चित्रपटाना गवललेला वेग मात्र कुठेतरी हरवला आणि पुन्हा एकदा 'छपाक'च्या कमाईचा वेग मंदावला. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या चर्चा आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्येही 'तान्हाजी'चीच मोठ्या प्रमाणावर वाहवा होत असल्याचं स्पष्ट होत आहे.