मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये असणारा ७१ वर्षीय जुना आर.के स्टुडिओ आता केवळ कागदोपत्री आणि आठवणीतच राहिला आहे. अखेर आर.के स्टुडिओ जमीनदोस्त करण्यात आला. आता रियल इस्टेटमधील प्रसिद्ध 'गोदरेज प्रोपर्ट्रीज' कंपनीने आर.के स्टुडिओची जमीन खरेदी केली आहे. या स्टुडिओची स्थापना १९४८ मध्ये अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांनी केली होती. आर.के स्टुडिओ जमीनदोस्त झाल्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक चित्रपटांचा साक्षीदार असणारा हा स्टुडिओ गेल्या अनेक दिवसांपूर्वी कपूर कुटुंबीयांनी विकण्याचा निर्णय घेतला होता. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेने कमी होतं. त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च मात्र जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. पूर्ण कुटुंबासोबतच्या विचारपूर्वक चर्चेनंतरच हा निर्णय झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 



आर. के स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर 'सुपर डान्सर' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. 


आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचं आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता तो पुन्हा उभा करणं शक्य नव्हतं. 


आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम इथे संग्रहीत ठेवण्यात आले होते. नरगिसपासून तर ऐश्वर्यापर्यंतचे कॉन्च्युम इथे होते. पण आगीमध्ये त्यांचंही मोठं नुकसान झालं होतं.


आरके फिल्म्सने बॉलिवूडला 'बरसात' (९४९), 'आवारा' (१९५१), 'बूट पॉलिश' (१९५४), 'श्री ४२०' (१९५५) आणि 'जागते रहो' (१९५६), 'जिस देश में गंगा बहती है' (१९६०), 'मेरा नाम जोकर' (१९७०), ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा पहिला चित्रपट 'बॉबी' (१९७३), 'सत्यम शिवम सुंदरम' (१९७८), 'प्रेम रोग' (१९८२), 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) यांसारखे जबरदस्त चित्रपट दिले आहेत.